बुधवार, ९ मे, २०१८

आठवणीतली गाणी : मेरे नैना सावन भादो..


ध्यंतरी एका फेसबुक ग्रुपवर एका लेखिकेची शंकर जयकिशन आणि भैरवी रागावर आधारित गाण्यांची पोस्ट वाचण्यात आली. तसं सिनेमा आणि गाण्यांचे पडद्यामागचे किस्से भारीच असतात. कारण प्रत्येक सिनेमा आणि गाण्याच्या निर्मितीच्या वेळी काही गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळे ती गाणी त्यातील कलाकार, गायक, संगीतकार, दिग्दर्शक किंवा निर्मिती प्रक्रियेतील इतर घटकांच्या कायमची लक्षात राहतात. असे किस्से एेकायला विशेष आवडतं मला.. कारण त्यातून अशी गाणी किंवा सिनेमे आपल्याही मनात घर करुन राहतात. ही गाणी आपोआप आठवणीतली गाणी बनून जातात...

सुप्रसिद्ध निवेदक व कलाकार अनु कपूर, अमीन सयानी यांसारखे निवेदक नामांकित, आघाडीच्या एफएम व काही म्युजिक चॅनल्सवर जेव्हा असे पडद्यामागचे किस्से सांगतात. शिवाय ते ज्या प्रकारे सांगतात, ते तर भारीच. मी वाचलेल्या फेसबुक पोस्टमध्ये शिवरंजनी रागाचा उल्लेख आलेला होता. खरं तर वैयक्तिक सांगायचं तर शास्त्रीय संगीत हा माझ्या आकलनासाठी जड विषय. पण आपण नेहमी एेकत आलेलो, आपल्याला अावडलेली अनेक गाणी ही कुठल्या रागांवर आधारित आहेत, किंवा होती, हे माझ्या कधीही गावी नव्हते. आज अशीच एक आठवण शेअर करतोय..

माझे सख्खे छोटे मामा मुंबईच्या शिरोडकर शिक्षण संस्थेतून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तिथे ते मराठी आणि इतिहास विषय शिकवायचे. पएा सिनेमा, गाणी, आणि संगीत म्हणजे त्यांचं जीव की प्राण. त्याविषयी त्यांचं अवांतर वाचन आणि ज्ञानही अफाट व सखोल आहे. ते स्वतः लतादीदी आणि महंमद रफिंचे निस्सीम चाहते आहेत. त्यांची कित्येक गाणी अजूनही त्यांच्या ओठांवर रुळलेली अाहेत. तर या सिताराम मामांच्या आणि माझ्या गाण्यांच्या चॉईसही बहुतांशी सेम सेम आहेत. असेच एकदा आम्ही सोबत असताना राजेश खन्ना आणि हेमा मालिनीचा 'मेहबुबा' हा सिनेमा टीव्हीवर सुरू होता. या सिनेमाचं कथानक जितकं गूढ आणि उत्कंठावर्धक आहे, तितकीच त्यातली गाणीही कर्णमधूर व अवीट आहेत.

या सिनेमात 'मेरे नैना सावन भादो..' हे गाणं दोन वेळा पूर्ण आणि मध्ये मध्ये काही ओळींचं आहे. या गाण्याबद्दल मामांनी त्यावेळी सांगितलेली आठवण अशी... की हे गाणं शिवरंजनी रागावर आधारित आहे. मी म्हणालो कसं काय? हे तर साधं सरळ साेपं गाणं आहे, यात राग कुठून आला? माझा भाबडा प्रश्न त्यांना साहजिक होता कारण मला शास्त्रीय संगीताचं कसलही ज्ञान नव्हतं. आणि अजूनही नाहीय. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे क्लासिकलच गाणं आहे. गंमत अशीय की ते गायलंय लता दीदी आणि किशोर कुमारने. किशोर कुमारने एकही क्लासिकल गाणं गायलेलं नव्हतं. किंबहुना त्यांना येतंच नव्हतं. दिग्दर्शक शक्ती समंथ यांना मात्र ते किशोरजी यांच्याच आवाजात हवं होतं. स्वतः किशोरजी यांनी तेवढं गाणं रफी साहेबांकडून गाऊन घ्या, अशी विनंती केली. पण दिग्दर्शक त्यांच्या निर्णयावर ठाम होते.

हे गाणं सिनेमात दोनदा आहे. त्यामुळे शेवटी असा तोडगा निघाला की, आधी हे गाणं लता दिदींकडून गाऊन घ्यायचं. 'ते ऐकून ऐकून जसंच्या तसं मी म्हणेन' असे किशोरजी म्हणाले. त्याप्रमाणे दोन्ही गाणी कंपोज झाली. अन अशा प्रकारे किशोरजी यांनी त्यांचं पहिलंवहिलं क्लासिकल गाणं गायलं. माझ्या व्यक्तीगत माहितीनुसार बहुधा हे किशोरजींनी गायलेलं एकुलतं एक क्लासिकल गाणं असावं.. त्यांना स्वतःला विश्वास नव्हता की, हे गाणं रसिक स्वीकारतील की नाही.. पण हे गाणं प्रचंड हिट ठरलं. इतकंच नाही तर अनेकांनी त्याबद्दल किशोरजी यांचं विशेष कौतुक केलं. कारण किशोरजी यांचं आजवरची गाणी कुठल्याच शास्त्रीय प्रकारात बसणारी नव्हती. तरीही ते हिट होते, त्यांची गाणी लोकांनी डोक्यावर घेतलेली होती. 

मामांनी माझं शंकानिरसन करताना शिवरंजनी रागावर असलेली आणखी काही गाणी मला सांगितली. 'एक दुजे के लिये' मधलं 'तेरे मेरे बीच में, कैसा है ये बंधन' हे गाणंही याच रागावर आधारित आहे, असं ते म्हणाले. हे गाणंही सिनेमात दोनदा आहे. एकदा लतादिदी व एसपी बालसुब्रमण्यम या जोडीच्या आवाजात, तर एकदा एसपी बालसुब्रमण्यम यांच्या एकट्याच्या कातर, मनात काहूर उठवणाऱ्या आवाजात.

मामांनी सांगितलेला हा किस्सा मला कायमचा लक्षात राहिला. त्यातली सत्यता किंवा संदर्भ मी पडताळून पाहिले नाही. तशी गरजही कधी वाटली नाही. पण एक मात्र खरंय की, मला स्वतःला देखील लता दिदींपेक्षाही किशोरजी यांच्या आवाजातलं 'मेरे नैना सावन भादो' अधिक आवडत आलंय. तितकंच 'तेरे मेरे बीच में' त्यांच्या आवाजातील ती आर्तता प्रचंड जीवघेणी आहे. गाणं संपेपर्यंत कोणीतरी काळीज चिरतंय असं वाटत राहतं. शास्त्रीय संगीत आणि कुठलं गाणं कुठल्या रागावर आधारित आहे, हे अजूनही कळत नाही मला. पण मोठ्या लांबलचक दमात एक ओळ असलेलं गाणं ऐकलं की शिवरंजनी राग आठवतो. 

रविवार, १८ मार्च, २०१८

सफरनामा..रोज सकाळी घरातून निघून हायवेवरुन ऑफिसला येतो आणि रात्री परत जातो. ३२ किलोमीटरचं अंतर. आधी मोटारसायकलवर, अन आता कारने. नऊ वर्षांमध्ये एवढाच फक्त बदल. प्रवास सुरु झाला की म्युझिक असतं सोबतीला. क्वचित कधी फोनवर बोलत येतो. रस्ता कधी संपतो कळत नाही. रोजचा रस्ता तोच असतो. मीही तोच असतो. समोरुन येणारी किंवा मला ओलांडून पुढे निघून जाणारी वाहनंही तीच, म्हणजे तशीच असतात. येतात. जातात. समोरची काच म्हणजे जग दिसणारी फ्रेम. 

या फ्रेममध्ये रोज त्याच-त्याच किंवा कधीतरी नवनव्या गोष्टी नजरेस पडतात. म्हणजे रस्त्यावरचे खड्डे. बाजूची शेती. घरं. हॉटेलं. एखाद्या गावाचं बसस्टँड. त्यावरचं अतिक्रमण आणि वाहनांची गर्दी. एक टोलनाका. तेथील माणसं. ऊन. वारा. पाऊस. अंधार. स्पीड ब्रेकर्स. वगैरे वगैरे.

धड गावही नाही अन दाट वस्तीही नाही, असा एक नाका. म्हणजे एका गावाकडे जाणारा फाटा. त्या फाट्यावर असलेल्या काही टपऱ्या. हॉटेलं नाहीत टपऱ्याच. कारण तेथे असलेली गिऱ्हाईकं म्हणजे अत्यंत गरीबीतली, कष्ट उपसणारी. रस्त्याकडेच्या स्टोन क्रशरवर, बांधकाम साईट्सवर कामगार म्हणून, भंगाराच्या दुकानात, पेट्रोल पंपावर साफसफाईच्या कामाला असलेली ही माणसं. त्या टपऱ्यांवरचा चहा, क्रीमरोल, वडा, पाव,मिसळ खाऊन तृप्तीचा ढेकर देणारा हा वर्ग. हे रोजचंच चित्र. त्यातलीच एक टपरी. तिथली जाडजूड खाष्ट बाई. एक गोरीपान शाळकरी मुलगी. हे नऊ वर्षांपूर्वीचं चित्र.

येस्स. ही मुलगीच कारण होतं दररोज नित्याने आणि नकळत तिकडे नजर जाण्याचं. खरं तर आठ वर्षांत कधी तिथे (मुद्दामून) थांबलोही नाही. अन् मुद्दामूनच आपल्याकडे लक्ष जावं म्हणून हॉर्न वाजवणं किंवा सावकाश नजर टाकत जाणंही नाही. तरीही ही टपरी आली की आपोआप उजवीकडे पाहून एकदा लक्ष जातंच. ती बाई अन ती मुलगी. बहुधा या दोघीच त्या टपरीच्या मालकीणी. ती मुलगीच कारण होतं तिकडे पाहण्याचं. तीच मुलगी व तिचं सौंदर्यच खरं कारण होतं त्या हाटेलात बाजूच्या दोन-चार टपरीवजा हाटेलांपेक्षा अधिक गिऱ्हाईकं यायचं. आणि विनाकारण रेंगाळायचं. नाहीतर होतं तरी काय त्या टपरीवजा हाटेलात? कळकट, मळकट, दमलेले काळवंडलेले चेहरे दररोज लक्ष वेधून थोडी घेतात कोणाचं?

आठ वर्षांत त्या दोघींसोबत कसलाही संवाद नसला, तिथं कधीच थांबणं नसलं तरी या टपरीवजा हाटेलासोबत आणि तेथल्या त्या कमालीच्या सौंदर्यवान मुलीबद्दल एक अनामिक औत्सुक्य निर्माण झालं. अशा रस्त्याकडेच्या कचऱ्यासारख्या जागेत असलेली ती टपरी. दोन बाकं आणि एक दोन खुर्च्या. टपरीतल्या दोरीला लटकावलेल्या गुटख्याच्या पुड्यांच्या माळा. बरण्यांमध्ये ठेवलेली गोळ्या, बिस्किटं. घरापातून ३२ किलोमीटर अंतर कापताना कितीतरी हॉटेलं आहेत. दुकानं आहेत. घरं आहेत. माणसं आहेत. जी तिथंच आहेत. असतात. त्यातलीच ही एक टपरी. यातलं कधी कुणी नसलं तर आपोआप चुकचुकल्या सारखं वाटतं.

चारेक वर्षांपूर्वी त्या परिसरातल्या एका टपरीचालक महिलेचा खून झाल्याची ब्रेकिंग न्यूज कानावर आली. माझी शंका खरी निघाली. ती जाडजूड, चेहऱ्यावरुन खाष्ट वाटणारी महिला एका दारुड्याने कायमची वर पोचवली. रिपोर्टिंग करताना खुपदा क्राईम स्पॉटवर जावंच लागतं. पण यावेळी नाही गेलो. तपासी अधिकारी मित्रच होते. त्यांनीच माहिती दिली. महिलेला दोन मुली व एक मुलगा होता. मोठी मुलगी विवाहित तर मुलगा व्यसनी आणि कधीही घरी न येणारा. त्यामुळे टपरीवर दिसणारी ती गोरीपान मुलगी अन ती महिला दोघीचंच घर. त्याच परिसरात असलेल्या एका कामगारासोबत महिलेचे अनैतिक संबंध होते. त्या कामगारानेच दारुच्या नशेत महिलेला यमसदनी धाडले.

तेव्हापासून ते टपरीवजा हाटेल बंद झालं. मध्ये तीन चार वर्षे निघून गेली. ती मुलगी कुठे गेली असेल, तिचं काय झालं असेल, हे प्रश्न त्या हाटेलाकडं नजर गेली की मनात यायचे. काही सेकंदापुरते. अशाच कितीतरी सेकंदांनी एकत्रित मिळून त्या टपरीवजा हाटेलानं, त्या मेलेल्या महिलेनं अन त्या गोऱ्यापान मुलीनं मनात अनामिक औत्सुक्य निर्माण केलं होतं. पण बंद पडलेल्या त्या टपरीवजा हाटेलानं या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला होता.

आता ती मुलगी कशाला इथं येईल? आली तरी ती कशाला एकटी हाटेल चालवेल? बरं चालवलं तरी ज्या घरात तिच्या आईचं शीर धडावेगळं झालं त्या घरात ती एकटी कशी राहिल? या शंकाही अशाच सेकंदापुरत्या मनात यायच्या. ही मुलगी इथं, या घरात, या बाईच्या पोटी का जन्माला आली असेल? ती एखाद्या चांगल्या घरात असती तर आज कुठं असती? सौंदर्याच्या बळावर नक्कीच तिला चांगला जोडीदार, घर, वैभव मिळालं असतं. असो. आपल्याला काय करायचंय?? चार पाच सेकंदासाठी डोक्यात आलेले हे विचार थोडं पुढे आलं की गायब व्हायचे.

गेल्या आठवड्यात मात्र एक वेगळंच चित्र दिसलं. रस्त्याने ऑफिसला येत असताना कारच्या समोरच्या काचेतून दुरुनच त्या टपरीवजा हाटेलात काही माणसं दिसली. मी कारचा वेग जरा मंदावला. जवळ आल्यावर पाहतो तर ते हाटेल सुरू झालेलं. तिथं तीच गोरीपान मुलगी. पण आता निर्विकारपणे गिऱ्हाईकांना चहाचे कप देत होती. एकटीच. हो. ते हाटेल सुरू झालंय. तेच हाटेल. जिथं ती गोरीपान मुलगी तिच्या तोऱ्यात आईसोबत काम करायची. एक वर्तुळ पूर्ण झालं. ती मुलगी आता युवती झालीय. मध्यंतरी या मुलीचं काय झालं असेल? तिला पुन्हा इथंच का यावं लागलं? इतर सगळे रस्ते बंद झाल्यानंतर तिला इथंच यावं लागलं ना? शेवटी हे टपरीवजा हाटेलच तिचा आधार ठरलं का? नियतीनं तिला पुन्हा तिथंच आणून आपलं वर्तुळ पूर्ण केलं का ?....

त्या टपरीवजा हाटेलानं, आणि त्या मुलीनं गेल्या नऊ वर्षांमध्ये मनात असे असंख्य प्रश्न निर्माण केले. त्यांची उत्तरं शोधण्यासाठी कधीही तिथं थांबलो नाही. किंबहुना थांबावसं वाटलंच नाही कधी. आणि का थांबावं? या प्रश्नांची उत्तरं शोधून काय करणारे मी? अशी कितीतरी माणसं, लोकं रोज दिसतात. त्यांना थोडीच मी रोज भेटतो. घरातून निघून पाऊण तासात ऑफिसात जायचं असतं. वेळ कुणाला आहे ? 

त्या टपरीवजा हाटेलाकडं पाहून जसं प्रश्नांचं मोहोळ उठतं तसंच हसायलाही येतं स्वतःचं. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं साक्षीदार व्हावं म्हणून पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं. पण मग ही काय स्टोरी आहे? हा काय भविष्यातला इतिहास आहे? त्या टपरीवजा हाटेलात अन तिथल्या माणसांमध्ये कसलं आलंय औत्सुक्य ?  जाऊ देत.. आपल्याला वेळेत सकाळच्या मिटिंगला पोचायचंय..

तुमचंही होतं का असं कधी ?

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

पुत्र व्हावा 'राजु' जैसा..!

गेल्या आठवड्यात 'दिव्य मराठी'त प्रसिद्ध झालेल्या या स्टोरीला चार वर्षे पूर्ण झाली. फेसबुक मेमरीजमध्ये ती दिसल्याने एका मित्राने व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर शेअर केली. त्यामुळे सकाळपासून फोन यायला लागले. स्टोरी छान केलीयेस रे, पण आजच्या अंकात कुठे दिसत नाहीय. एकेकाला स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा हे सगळं लिहून काढायचा खटाटोप केला..

ही चार वर्षांपूर्वीची (जानेवारी २०१४) गोष्ट आहे. त्याच्या दोन वर्षे आधी (ऑगस्ट २०१०) मी 'लोकमत'मध्ये होतो. आणि त्याच्या कित्येक वर्षे आधीपासून, लहानपणापासून पेपरात फोटो ओळींमध्ये छाया : राजू शेख हे नाव वाचायचो. तेव्हापासून या व्यक्तीबद्दल प्रचंड कुतुहल व आदर होता. 'लोकमत'मध्ये काम करताना त्यांच्यासह साजिद-वाजीदही ओळखीचे झाले. प्रेस फोटोग्राफीमध्ये या बाप-लेकांनी जी ओळख निर्माण केली, ती अद्वितीयच आहे. पण दिलात माणुसकी जीवंत असलेला माणूस म्हणूनही यांचा वेळोवेळी प्रत्यय आला. ईद-निमित्त शिरकुर्मा घ्यायला यांच्या घरी जायचो. त्यामुळे संपुर्ण फॅमिलीच ओळखीची झाली. पण २०१२ मध्ये मी दिव्य मराठीत आलो. अन भेटीगाठी कमी झाल्या. तरीही ऋणानुबंध मात्र आधीइतकेच घट्ट होते. पण कामाच्या व्यापात अडकल्याने कुठेतरी फिल्डवर साजिद-वाजीद भेटायचे.

आत्ता एक-दोन आठवड्यांपूर्वी साजिदचा वाढदिवस झाला. तसाच चार वर्षांपूर्वी होऊन गेलेला होता. त्या वाढदिवशी त्याला फोनवर शुभेच्छा दिल्या. आपण इतरांना सहज म्हणतो तसं त्यालाही 'पार्टी कब देगा' म्हणालो. तो हो-हो म्हणाला. अन फोनवरचा विषय तिथंच संपला. एक दोन दिवसांनी एका कार्यक्रमाची फोटो व बातमी द्यायला तो कार्यालयात आला. तेव्हा वाढदिवसाची पार्टी नाही दिली, म्हणून मी त्याला पुन्हा सहज छेडले. तेव्हा त्याने सांगितलं 'दादी की मौत हुई इसलिये हमने इस साल जनमदिन नहीं मनाया।" मीही सहजच बोलून गेलेलो असल्याने तो विषय तिथंच सोडला.

पण एक दोन दिवसांनी एका कार्यक्रमाच्या रिपोर्टिंगला गेलो तेव्हा 'अब्बा' म्हणजे राजु शेख सर भेटले. मी लोकमत सोडलं, तेव्हापासून तेही फिल्डवर कमीच दिसायचे. त्यामागे त्यांच्या नाजूक तब्येतीचं कारणही होतं. कारण अब्बांना त्यावेळी मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं होतं. मग सर्वांनीच त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. अन धावपळ कमी करायला लावली. पण नेमके त्या कार्यक्रमाचे फोटो काढायला ते आले, अन आमची भेट झाली. त्यांच्या डोक्यावर हिवाळ्यात घालतात ती लोकरीची विणलेली टोपी होती. बऱ्याच महिन्यांनी भेटल्याने आम्ही बाजुला जाऊन एकमेकांची विचारपूस केली.

अब्बांनी टोपी काढली तेव्हा त्यांनी पूर्णपणे टक्कल केल्याचं दिसलं. मला वाटलं आजारपणामुळे केलं असेल. पण बोलण्याच्या ओघात त्यांनी 'आईचं निधन' झाल्याचं सांगितलं. मला कळेना. प्रेस फोटोग्राफरच्या आईचं निधन झालं तर ही बातमी पेपरला कशी नाही आली? अन अब्बा मुस्लिम असुनही त्यांनी टक्कल का केलं? विचारलं तर त्यांनी 'आई हिंदु होती' असं सांगितलं. अजुन चौकशी केली तर अब्बांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचं बालपण सांगितलं..

बालपणीच सख्खी आई अल्लाला प्यारी झाली. आशा टॉकीज परिसरात बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासोमर भाड्याच्या पत्र्यांच्या खोलीत ते राहायचे. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या, मुलबाळ नसलेल्या सुलोचना आजींनी त्यांना पोटच्या लेकरासारखा जीव लावला. आईची उणीव केंव्हाही भासू दिली नाही. स्वतः धुणीभांडी करुन उदरनिर्वाह करायची. पण मला जेवू-खाऊ घालायला कधीही कसर केली नाही. मानलेला असलो तरी सख्ख्या लेकरासारखी माया केली. मी आजारी असलो की तिच्या डोळ्याला डोळा नसायचा. कदाचित सख्ख्या अम्मीनेही गरिबीमुळे जीव लावून वाढवलं नसतं, इतकं सुलोचना आईने सांभाळलं.. हे सांगताना अब्बा ढसाढसा रडायला लागले.

मी त्यांना सावरत दुःखाला आवर घाला म्हणालो. वेगळा विषय काढून त्यांना सावरलं. कार्यक्रम संपल्यावर ऑफिसला आलो, पण अब्बांचा चेहरा डोळ्यासमोरुन जाईना. साजिदला फोन लावला अन बोलावून घेतलं. त्याला विचारपूस केली. तर त्यानेही दादीच्या आठवणी सांगितल्या. अन मग दादी देवाघरी गेल्यानंतर तिच्या मागे कोणीच नसल्याने अब्बांनी अन आणखी ओळखीच्या लोकांनी तिचा अंत्यविधी आणि दशक्रिया विधी कसा केला ते सांगितलं. मी अब्बाच्या घरी गेलो. तेथे पुन्हा अब्बा, अम्मी, साजिद, वाजीद, हीनाभाभी (वाजिदची बायको) अन शाहरुख यांनी दादीच्या आठवणी सांगितल्या.

सुलोचना आजी अखेरपर्यंत त्याच पत्र्याच्या खोलीत राहिल्या, अन तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण अब्बा वारुळाचा मारुती परिसरात राहायला गेले. फोटोग्राफी आवडायची म्हणून संधी मिळेल तिथे त्यांनी हौस भागवून घेतली. त्यांची ही हौस पाहून आमदार अरुणकाका जगताप यांनी अब्बांना स्वतःचा एक कॅमेरा भेट दिला. बस्स. अब्बांची फोटोग्राफी सुरु झाली, अन त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पोरांनीही तीच आवड जोपासली अन तेच करिअर निवडलं. पोटचा गोळा नसला तरी आत्म्याचं अन जिव्हाळ्याचं नातं असलेल्या राजुचा अन त्याच्या कुटुंबाचा हा प्रवास सुलोचना आजींना समाधानाचा ढेकर द्यायचा. आजीने राजुचा संसार भरल्या डोळ्यांनी पाहिला. राजुच्या घरी आली सगळ्यांकड पाहून आजी तृप्त व्हायची.

साजिद, वाजीद पोरं घरातून बाहेर पडतानाच दादीचा डबा घेऊन निघायचे. आधी दादीचा डबा द्यायचा, अन मग बातमीदारीला निघायचं. पोरांनी या दिनक्रमात कधीही आळस केला नाही, अन खंडही पडला नाही. आईने लेकराला जीव लावला, तर त्या माऊलीला फार फार तर लेक जीव लावतो. (हल्लीचं चित्र विदारक आहे) पण इथं अब्बाच नाही, सकिना अम्मीनेही तितकाच जीव लावला. सख्खी सासू नव्हती, त्यामुळं सासूरवासाचा प्रश्नच नाही. पण सुलोचनाआई घरी आली की माझी अम्मी घरात असल्यासारखं वाटायचं, असं त्या म्हणाल्या. मला कौतुक यापुढं अधिक वाटलं. ते हिनाभाभीचं. सासू सुनेला, अन सून सासुला पाण्यात पाहणाऱ्या जगात या नातसुनेनेही दादीला किती जीव लावला.

दादीला आवडेल ते जेवण बनवून द्यायचं. न कुरबुर करता.. या दोघींचं वेगळंच मैत्रीचं जग होतं.. मध्यंतरी चोरी झाली तेव्हा दादी या सगळ्यांना तुम्ही पुन्हा गावात राहायला चला म्हणाली. खरं तर यावेळी दादीने असं म्हणणं ही बाब सगळ्यांनी हसण्यावारी नेत खिल्ली उडवली असती. पण दादीचा लेकराच्या संसारात किती जीव अडकलाय हे पाहून सर्वांचे डोळे पाणावले.. अब्बा अन घरातला एकेक जण दादीची एकेक गोष्ट, एकेक आठवण सांगत होते.. अन डोळे पुसत होते. मी माझ्या अश्रुधारा मनसोक्त वाहू दिल्या. अल्बममधले आजीचे फोटो पाहताना मला माझी आज्जी आठवत होती..

ऑफिसात आलो. मिटिंगच्या वेळी ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे सरांना ही कहानी ऐकवली. खरं तर ही स्टोरी प्रसिद्ध करण्याचा आग्रह त्यांनीच केला. प्रतिस्पर्धी वर्तमानपत्राचे फोटोग्राफर असल्याने आपण त्यांची स्टोरी कशी करावी, असा प्रश्न मी उपस्थित केला होता. पण माणुसकीचं जिवंत उदाहरण जगलेल्या कुटुंबाला जगासमोर आणणं हे आपलं कर्तव्य आहे. अन आपण ते आणूयात, असं ते म्हणाले. त्यावेळी बेंडाळे सरांनी आग्रह केला नसता, हा दिलदारपणा दर्शवला नसता तर अब्बा आणि त्यांच्या कुटुंबाने जपलेलं माणुसकीचं जिवंत उदाहरण त्यांच्यापुरतं, अन 'ऑफ द रेकॉर्ड'च राहिलं असतं. जगासमोर आलंच नसतं.

मी पुन्हा अब्बांकडे गेलो. आजीचा आणि शेख कुटुंबाचा फोटो मागायला. अब्बांनी प्रसिद्धीच्या झोतात यायचं नाही असं सांगितलं. मी हट्टाने आजीचा फोटो मिळवला. ते अखेरच्या क्षणापर्यंत नको-नको म्हणत होते, पण माझ्या हट्टापुढे हतबल झाले. अमरधामातील पुरोहितांना भेटलो तेव्हा त्यांनीही अब्बा आणि इतर लोकांचं कर्तव्य अधोरेखित केलं. प्रवरासंगमच्या ब्राम्हणाशी मोबाईलवर बोललो, तेव्हा त्यानेही लगेचच ओळखलं. इतकंच नाही तर अब्बांनी पिंडदान केलं तेव्हा त्या पिंडाला काकस्पर्श किती लौकर झाला, हल्लीच्या मुलांपेक्षा राजू कसा, अन किती कृतज्ञ आहे, हे त्याने जसंच्या तसं नमूद केलं.

रविवारच्या अंकात ही स्टोरी आली, अन सकाळपासून अब्बांना फोन सुरु झाले. माणसं फोनवर अब्बाचं कौतुक करायची. ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी फोन केला. 'राजु' म्हणाले, अन ढसाढसा रडायला लागले. अब्बांनीही अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. पंधरा एक मिनिटं दोघंही फोनवर फक्त रडत होती. दुपारी अब्बांचा फोन आला. "आयुष्यात कधी नाही तितकं रडवलंस म्हणाले. आजवरच्या कारकिर्दीत नाही आले तेवढे फोन आज सकाळपासून घरात खणखणताहेत" म्हणाले. "खुप मोठं केलं मला.." म्हणून पुन्हा रडायला लागले. इकडं मी निःब्द होतो.

"पोटच्या लेकरासारखं मला तिने जीव लावला. माझ्यावर जीव ओवाळून टाकताना तिचा धर्म कधीही तिच्या आड आला नाही. मग तिची उत्तरक्रिया करताना माझा धर्म तरी मला कसा आड येईल?" हा सवाल तुम्ही तेव्हा विचारला होतात अब्बा. त्याचं उत्तरही तुम्हीच दिल होतंत. तुमचं कर्तव्य पार पाडताना, "रक्ताचं नसलं, तरी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, अन हृदयात खोलवर रुजलेलं प्रेमाचं, मायेचं रोपटं जगवायला कसली आलीय जात अन कसला आलाय धर्म ??" आज जात-पात, धर्म, भाषा, प्रांत, उच्च, नीच, राष्ट्रवाद, पोकळ अस्मितांच्या, कट्टरतेच्या दगडांच्या भिंती अधिकच कट्टर होताना पाहतोय. क्षुल्लक कारणांमुळे दोन गटात, समुहात टोकाची तेढ निर्माण होते. पण तुमच्यात वाहणारा माणुसकीचा खळाळता झरा प्रचंड आशादायी आहे.

नगरच्या फोटोग्राफी क्षेत्रात तुमच्यासारखे आणखीही जिंदादिल माणसं आहात. आणि खरं तर आमच्यापेक्षा लोकांमध्ये तुम्ही जास्त असल्याने बरेचदा तुमच्यामुळच आमच्यापर्यंत संवेदनशील बातम्या पोचतात. पण तुमच्यासारख्या संवेदनशील फोटोग्राफर किंवा पत्रकारांची बातमी कधी प्रसिध्द होत नाही. कारण इथं ब्रँड आडवा येतो. अगदी अलीकडलंच उदाहरण ताजं आहे. आपल्या प्रेस क्लबच्या अध्यक्षांनी रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या महिलेला रुग्णालयात नेलं. पण दुर्दैवाने तिचे प्राण वाचू शकले नाही. अध्यक्षांनी दाखवलेलं प्रसंगावधान सोडाच, पण त्या महिलेच्या मृत्यूच्या सिंगल बातमीलाही (अपवाद वगळता) कुठे जागा मिळाली नाही. अन मी या तीनशे शब्दांच्या बातमीत तुमचं मोठेपण कसं जगासमोर मांडू अब्बा..? तुम्ही, तुमचं कुटुंब आकाशाएवढं आहे..! देव तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य देवो. अगदी माझंही. 🙏

'दिव्य मराठी'मध्ये प्रकाशित झालेली मूळ बातमी.