पुत्र व्हावा 'राजु' जैसा..!

गेल्या आठवड्यात 'दिव्य मराठी'त प्रसिद्ध झालेल्या या स्टोरीला चार वर्षे पूर्ण झाली. फेसबुक मेमरीजमध्ये ती दिसल्याने एका मित्राने व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर शेअर केली. त्यामुळे सकाळपासून फोन यायला लागले. स्टोरी छान केलीयेस रे, पण आजच्या अंकात कुठे दिसत नाहीय. एकेकाला स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा हे सगळं लिहून काढायचा खटाटोप केला..

ही चार वर्षांपूर्वीची (जानेवारी २०१४) गोष्ट आहे. त्याच्या दोन वर्षे आधी (ऑगस्ट २०१०) मी 'लोकमत'मध्ये होतो. आणि त्याच्या कित्येक वर्षे आधीपासून, लहानपणापासून पेपरात फोटो ओळींमध्ये छाया : राजू शेख हे नाव वाचायचो. तेव्हापासून या व्यक्तीबद्दल प्रचंड कुतुहल व आदर होता. 

'लोकमत'मध्ये काम करताना त्यांच्यासह साजिद-वाजीदही ओळखीचे झाले. प्रेस फोटोग्राफीमध्ये या बाप-लेकांनी जी ओळख निर्माण केली, ती अद्वितीयच आहे. पण दिलात माणुसकी जीवंत असलेला माणूस म्हणूनही यांचा वेळोवेळी प्रत्यय आला. ईद-निमित्त शिरकुर्मा घ्यायला घरी जायचो. त्यामुळे संपुर्ण फॅमिली ओळखीची झाली. 

पण २०१२ मध्ये मी दिव्य मराठीत आलो. अन भेटीगाठी कमी झाल्या. तरीही ऋणानुबंध मात्र आधीइतकेच घट्ट होते. पण कामाच्या व्यापात अडकल्याने कुठेतरी फिल्डवर साजिद-वाजीद भेटायचे. आत्ता एक-दोन आठवड्यांपूर्वी साजिदचा वाढदिवस झाला. तसाच चार वर्षांपूर्वी होऊन गेलेला होता. 

त्या वाढदिवशी त्याला फोनवर शुभेच्छा दिल्या. आपण इतरांना सहज म्हणतो तसं त्यालाही 'पार्टी कब देगा' म्हणालो. तो हो-हो म्हणाला. अन फोनवरचा विषय तिथंच संपला. एक दोन दिवसांनी एका कार्यक्रमाची फोटो व बातमी द्यायला तो कार्यालयात आला. 

तेव्हा वाढदिवसाची पार्टी नाही दिली, म्हणून मी त्याला पुन्हा सहज छेडले. तेव्हा त्याने सांगितलं 'दादी की मौत हुई इसलिये हमने इस साल जनमदिन नहीं मनाया।" मीही सहजच बोलून गेलेलो असल्याने तो विषय तिथंच सोडला.

पण एक दोन दिवसांनी एका कार्यक्रमाच्या रिपोर्टिंगला गेलो तेव्हा अब्बा (राजु शेख सर) भेटले. मी लोकमत सोडलं, तेव्हापासून तेही फिल्डवर कमीच दिसायचे. त्यामागे त्यांच्या नाजूक तब्येतीचं कारणही होतं. कारण अब्बांना त्यावेळी मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं होतं. 

मग सर्वांनीच त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. अन धावपळ कमी करायला लावली. पण नेमके त्या कार्यक्रमाचे फोटो काढायला ते आले, अन आमची भेट झाली. त्यांच्या डोक्यावर हिवाळ्यात घालतात ती लोकरीची विणलेली टोपी होती. बऱ्याच महिन्यांनी भेटल्याने आम्ही बाजुला जाऊन एकमेकांची विचारपूस केली.

अब्बांनी टोपी काढली तेव्हा त्यांनी पूर्णपणे टक्कल केल्याचं दिसलं. मला वाटलं आजारपणामुळे केलं असेल. पण बोलण्याच्या ओघात त्यांनी 'आईचं निधन' झाल्याचं सांगितलं. मला कळेना. प्रेस फोटोग्राफरच्या आईचं निधन झालं तर ही बातमी पेपरला कशी नाही आली? अन अब्बा मुस्लिम असुनही त्यांनी टक्कल का केलं? 

विचारलं तर त्यांनी 'आई हिंदु होती' असं सांगितलं. अजुन चौकशी केली तर अब्बांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचं बालपण सांगितलं.. बालपणीच सख्खी आई अल्लाला प्यारी झाली. आशा टॉकीज परिसरात बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासोमर भाड्याच्या पत्र्यांच्या खोलीत ते राहायचे. शेजारी राहणाऱ्या, मुलबाळ नसलेल्या सुलोचना आजींनी त्यांना पोटच्या लेकरासारखा जीव लावला. 

त्या माऊलीने अब्बांना आईची उणीव केंव्हाही भासू दिली नाही. स्वतः धुणीभांडी करुन उदरनिर्वाह करायची. पण मला जेवू-खाऊ घालायला कधीही कसर केली नाही. मानलेला असलो तरी सख्ख्या लेकरासारखी माया केली. आजारी असलो की तिच्या डोळ्याला डोळा नसायचा. 

कदाचित सख्ख्या अम्मीनेही गरिबीमुळे जीव लावून वाढवलं नसतं, इतकं सुलोचना आईने सांभाळलं.. हे सांगताना अब्बा ढसाढसा रडायला लागले. मी त्यांना सावरत दुःखाला आवर घाला म्हणालो. वेगळा विषय काढून त्यांना सावरलं. कार्यक्रम संपल्यावर ऑफिसला आलो, पण अब्बांचा चेहरा डोळ्यासमोरुन जाईना. 

साजिदला फोन लावला अन बोलावून घेतलं. त्याला विचारपूस केली. तर त्यानेही दादीच्या आठवणी सांगितल्या. अन मग दादी देवाघरी गेल्यानंतर तिच्या मागे कोणीच नसल्याने अब्बांनी अन आणखी ओळखीच्या लोकांनी तिचा अंत्यविधी आणि दशक्रिया विधी कसा केला ते सांगितलं. 

मी अब्बाच्या घरी गेलो. तेथे पुन्हा अब्बा, अम्मी, साजिद, वाजीद, हीनाभाभी (वाजिदची बायको) अन शाहरुख यांनी दादीच्या आठवणी सांगितल्या. सुलोचना आजी अखेरपर्यंत त्याच पत्र्याच्या खोलीत राहिल्या, अन तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण अब्बा वारुळाचा मारुती परिसरात राहायला गेले. 

फोटोग्राफी आवडायची म्हणून संधी मिळेल तिथे त्यांनी हौस भागवून घेतली. त्यांची ही हौस पाहून आमदार अरुणकाका जगताप यांनी अब्बांना स्वतःचा एक कॅमेरा भेट दिला. बस्स. अब्बांची फोटोग्राफी सुरु झाली, अन त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पोरांनीही तीच आवड जोपासली अन तेच करिअर निवडलं. 

पोटचा गोळा नसला तरी आत्म्याचं अन जिव्हाळ्याचं नातं असलेल्या राजुचा अन त्याच्या कुटुंबाचा हा प्रवास सुलोचना आजींना समाधानाचा ढेकर द्यायचा. आजीने राजुचा संसार भरल्या डोळ्यांनी पाहिला. राजुच्या घरी आली सगळ्यांकड पाहून आजी तृप्त व्हायची.

साजिद, वाजीद पोरं घरातून बाहेर पडतानाच दादीचा डबा घेऊन निघायचे. आधी दादीचा डबा द्यायचा, अन मग बातमीदारीला निघायचं. पोरांनी या दिनक्रमात कधीही आळस केला नाही, अन खंडही पडला नाही. आईने लेकराला जीव लावला, तर त्या माऊलीला फार फार तर लेक जीव लावतो. (हल्लीचं चित्र विदारक आहे).

पण इथं अब्बाच नाही, सकिना अम्मीनेही तितकाच जीव लावला. सख्खी सासू नव्हती, त्यामुळं सासूरवासाचा प्रश्नच नाही. पण सुलोचनाआई घरी आली की माझी अम्मी घरात असल्यासारखं वाटायचं, असं त्या म्हणाल्या. मला कौतुक यापुढं अधिक वाटलं. ते हिनाभाभीचं. सासू सुनेला, अन सून सासुला पाण्यात पाहणाऱ्या जगात या नातसुनेनेही दादीला किती जीव लावला.

दादीला आवडेल ते जेवण बनवून द्यायचं. न कुरबुर करता.. या दोघींचं वेगळंच मैत्रीचं जग होतं.. मध्यंतरी चोरी झाली तेव्हा दादी या सगळ्यांना तुम्ही पुन्हा गावात राहायला चला म्हणाली. खरं तर यावेळी दादीने असं म्हणणं ही बाब सगळ्यांनी हसण्यावारी नेत खिल्ली उडवली असती. 

पण दादीचा लेकराच्या संसारात किती जीव अडकलाय हे पाहून सर्वांचे डोळे पाणावले.. अब्बा अन घरातला एकेक जण दादीची एकेक गोष्ट, एकेक आठवण सांगत होते.. अन डोळे पुसत होते. मी माझ्या अश्रुधारा मनसोक्त वाहू दिल्या. अल्बममधले आजीचे फोटो पाहताना मला माझी आज्जी आठवत होती..

ऑफिसात आलो. मिटिंगच्या वेळी ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे सरांना ही कहानी ऐकवली. खरं तर ही स्टोरी प्रसिद्ध करण्याचा आग्रह त्यांनीच केला. प्रतिस्पर्धी वर्तमानपत्राचे फोटोग्राफर असल्याने आपण त्यांची स्टोरी कशी करावी, असा प्रश्न मी उपस्थित केला होता. 

पण माणुसकीचं जिवंत उदाहरण जगलेल्या कुटुंबाला जगासमोर आणणं हे आपलं कर्तव्य आहे. अन आपण ते आणूयात, असं ते म्हणाले. तसं झालं नसतं तर अब्बा आणि त्यांच्या कुटुंबाने जपलेलं माणुसकीचं जिवंत उदाहरण त्यांच्यापुरतं, अन 'ऑफ द रेकॉर्ड'च राहिलं असतं. जगासमोर आलंच नसतं.

मी पुन्हा अब्बांकडे गेलो. आजीचा आणि शेख कुटुंबाचा फोटो मागायला. अब्बांनी प्रसिद्धीच्या झोतात यायचं नाही असं सांगितलं. मी हट्टाने आजीचा फोटो मिळवला. ते अखेरच्या क्षणापर्यंत नको-नको म्हणत होते, पण माझ्या हट्टापुढे हतबल झाले. 

नंतर अमरधामातील पुरोहितांना भेटलो तेव्हा त्यांनीही अब्बा आणि इतर लोकांचं कर्तव्य अधोरेखित केलं. प्रवरासंगमच्या ब्राम्हणाशी मोबाईलवर बोललो, तेव्हा त्यानेही लगेचच ओळखलं. इतकंच नाही तर अब्बांनी पिंडदान केलं तेव्हा त्या पिंडाला काकस्पर्श किती लौकर झाला, हल्लीच्या मुलांपेक्षा राजू कसा, अन किती कृतज्ञ आहे, हे त्याने जसंच्या तसं नमूद केलं.

रविवारच्या अंकात ही स्टोरी आली, अन सकाळपासून अब्बांना फोन सुरु झाले. माणसं फोनवर अब्बाचं कौतुक करायची. ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी फोन केला. 'राजु' म्हणाले, अन ढसाढसा रडायला लागले. अब्बांनीही अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. पंधरा एक मिनिटं दोघंही फोनवर फक्त रडत होती. 

दुपारी अब्बांचा फोन आला. "आयुष्यात कधी नाही तितकं रडवलंस म्हणाले. आजवरच्या कारकिर्दीत नाही आले तेवढे फोन आज सकाळपासून घरात खणखणताहेत" म्हणाले. "खुप मोठं केलं मला.." म्हणून पुन्हा रडायला लागले. इकडं मी निःब्द होतो.

"पोटच्या लेकरासारखं मला तिने जीव लावला. माझ्यावर जीव ओवाळून टाकताना तिचा धर्म कधीही तिच्या आड आला नाही. मग तिची उत्तरक्रिया करताना माझा धर्म तरी मला कसा आड येईल?" हा सवाल तुम्ही विचारला होतात अब्बा. त्याचं उत्तरही तुम्हीच दिल होतं. तुमचं कर्तव्य पार पाडताना, "रक्ताचं नसलं, तरी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, अन हृदयात खोलवर रुजलेलं प्रेमाचं, मायेचं रोपटं जगवायला कसली आली जात अन धर्म ?" 

आज जात-पात, धर्म, भाषा, प्रांत, उच्च, नीच, राष्ट्रवाद, पोकळ अस्मितांच्या, कट्टरतेच्या दगडांच्या भिंती अधिकच कट्टर होताना पाहतोय. क्षुल्लक कारणांमुळे दोन गटात, समुहात टोकाची तेढ निर्माण होते. पण तुमच्यात वाहणारा माणुसकीचा खळाळता झरा प्रचंड आशादायी आहे.

नगरच्या फोटोग्राफी क्षेत्रात तुमच्यासारखे आणखीही जिंदादिल माणसं आहात. आणि खरं तर आमच्यापेक्षा लोकांमध्ये तुम्ही जास्त असल्याने बरेचदा तुमच्यामुळच आमच्यापर्यंत संवेदनशील बातम्या पोचतात. पण तुमच्यासारख्या संवेदनशील फोटोग्राफर किंवा पत्रकारांची बातमी कधी प्रसिध्द होत नाही. 

कारण इथं ब्रँड आडवा येतो. अगदी अलीकडलंच उदाहरण ताजं आहे. आपल्या प्रेस क्लबच्या अध्यक्षांनी रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या महिलेला रुग्णालयात नेलं. पण दुर्दैवाने तिचे प्राण वाचू शकले नाही. अध्यक्षांनी दाखवलेलं प्रसंगावधान सोडाच, पण त्या महिलेच्या मृत्यूच्या सिंगल बातमीलाही (अपवाद वगळता) कुठे जागा मिळाली नाही. 

अन मी या तीनशे शब्दांच्या बातमीत तुमचं मोठेपण कसं जगासमोर मांडू अब्बा..? तुम्ही, तुमचं कुटुंब आकाशाएवढं आहे..! देव तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य देवो. अगदी माझंही. 🙏

'दिव्य मराठी'मध्ये प्रकाशित झालेली मूळ बातमी.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या