याला 'प्रेम' म्हणायचं का?

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण,
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण,
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम,
पटलि पाहिजे अंतरीची खुण...!

   'ती' बातमी वाचनात आली अन पुन्हा एकदा मनात प्रश्न उभा ठाकला की याला 'प्रेम' म्हणायचे का? बातमीही तशीच होती. 'एकतर्फी प्रेमातून प्रेयसीवर गोळीबार' अशा आशयाची. तसा आशय काही नवीन नव्हता कारण यापूर्वीही तरुणीच्या तोंडावर असिड फेकणे, जीवे मारण्याची धमकी देणे, वारंवार दूरध्वनी करून मानसिक छळ करणे, अशा घटना घडलेल्या आहेत. पण 'या' प्रकाराला प्रेम म्हणायचे का, हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण या प्रकाराला ती व्यक्ती भले प्रेम समजत असेल पण जबाबदारीचे भान बाळगून वृत्त छापण्याची अपेक्षा असलेल्या माध्यमांनी तरी या विकृतीला कसे काय प्रेम म्हणावे?
   प्रेमात कुणी आपल्या जीवलगावर असिड टाकते का? किंवा कुणी समोरच्याला दुखावते का, अन यात कसलं आलं प्रेम? उलट याला एकतर्फी प्रेम म्हणण्यापेक्षा अपेक्षाभंग म्हणता येईल. कारण ती विकृतीच आहे. उलट असल्या प्रकाराला प्रेम म्हणणे म्हणजे 'प्रेम' या संकल्पनेची क्रूर चेष्टा आहे. कारण तसे म्हणणे प्रेम या पवित्र शब्दाचा अपमान आहे.
   याचा अर्थ असा नाही की 'एकतर्फी प्रेम' हि संकल्पनाच अस्तित्वात नाही. 'एकतर्फी प्रेम' हि नुसती संकल्पनाच नाही तर मानवाच्या जीवनाला अनमोल वरदान आहे. कुठलाही मनुष्य सतत कोणत्या ना कोणत्या आशेवर जगात असतो. मग ती आशा कधीकधी एकतर्फी प्रेमही असू शकते. यात आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा नक्कीच असू शकते अन ती गैरही नाही. तसा प्रतिसाद मिळणे हा नशिबाचाच भाग असतो म्हणा, पण हि अपेक्षा एकतर्फी प्रेमाची 'अट' असू शकत नाही. प्रेमात पडताना तरी हा विचार कधी मनात येतो का?
   उदाहरणच द्यायचे झाले तर लोकप्रिय खेळाडू किंवा अभिनेत्यांचे देता येईल. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे लाखो असतात पण त्यांना कधी प्रतिसादाची अपेक्षा असते का? किंवा आपल्याला प्रतिसाद दिला नाही म्हणून त्यातल्या कुणी 'असले' प्रकार केल्याचे एकही उदाहरण नाही. 'तिने' फसविले म्हणून 'तो' असे करतो पण 'त्याने' फसविले म्हणून 'तिने' असले प्रकार केल्याचे ऐकिवात नाही.
   प्रेम करायला 'लायकी' नक्कीच लागते पण तिचे निकष व्यक्तीसापेक्ष असतात. एखाद्या व्यक्तीविषयी आदर, जिव्हाळा, आकर्षण वाटते अन ती व्यक्ती मनापासून आवडतेही, पण प्रेम असेलच असे नाही. म्हणूनच दोन व्यक्तींची मने जुळणे म्हणजे 'केमेस्ट्री' जुळणे असे म्हणतात ना. प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे तो आपल्या प्रेमाचा अपमान समजणे तर साफ चुकीचे. त्यामुळे एखाद्याचा अहंकार दुखावला जात असेलही कदाचित, पण प्रेमात अहंकाराला जागा असते का? उलट प्रेम करणे म्हणजे अहंकार विसरून शरण जाणे. दुसऱ्याला तुमच्यावर अधिकार गाजवायची मुभा देणे. 'व. पु.' म्हणतात तसं 'जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं, कारण प्रेमात अन मरणात 'स्व' उरत नाही.'
   निसर्गनियमानुसार जसं एखाद फुल उमलत तसंच समोरच्याच्या मनात आपल्याविषयी प्रेम उमलावं लागत. ओढून-ताणून जबरदस्तीने ते उमलवायचा प्रयत्न केला तर ते कोमेजून जात. फार तर आपण ते उमलावं म्हणून आपल्या प्रेमाचं खतपाणी त्याला नक्कीच घालू शकतो. तसं पाहिलं तर प्रेम हा काही देण्या-घेण्याचा व्यवहार नसतो. आपण केलं म्हणून समोरच्यानेही ते केलंच पाहिजे हेही चुकीचेच. आपल्या प्रेमाला झिडकारू नये एवढी माफक अपेक्षा नक्कीच असावी, पण आपल्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे त्या व्यक्तीला त्रासही होता कामा नये.
   प्रतिसाद मिळाला नाही तर अस्वस्थ होणे साहजिकच आहे, पण नकार पचवायची ताकदही असायलाच हवी. प्रेमात पडल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा 'न आवडण्याचा' अधिकार मान्य करायलाच हवा. कारण एकवेळ प्रेम लादता येईल पण 'प्रेम करणे' लादता येत नाही. पण सर्वांनाच हा नकार पचवणे कठीण असल्याने काहींचा इगो दुखावला जातो अन त्यातून हे प्रकार घडतात. मग आपल्या इगोसाठी आवडत्या व्यक्तीला त्रास देण्यापेक्षा त्या व्यक्तीसाठी आपला इगो सोडणेच चांगले नाही का? त्यालाच तर प्रेम म्हणतात नां?
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण सगळ्यांनाच हे समजणं आणि त्याहूनही समजाऊन सांगणं खूप अवघडेय..

    उत्तर द्याहटवा