या कथेचे मूळ लेखक डॉ. सलील कुलकर्णी असून हि कथा 'दैनिक लोकसत्ता' च्या 'चतुरंग' मध्ये प्रकाशित झालेली आहे. मला आवडली म्हणून लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय येथे ती वाचकांसाठी येथे शेअर करत आहे. 

     मनाचं पाखरू कुठल्या दिशेने भरारी मारेल, हे आपल्याला कळत नाही. फार कमी माणसं आपल्या मनाचा हात धरून जाऊ शकतात. ती वाट सोपी नसेलही किंबहुना नसतेच. पण अशी काही ‘वेडी’ माणसंच इतिहास घडवतात. ऊर फोडून दुसऱ्यावर प्रेम करणारी माणसं स्वत:ला विसरतात..

‘मी तुझ्याचसाठी प्राक्तनासही भिडलो
मी तुझ्याचसाठी दैवावरही चिडलो’..
     ‘तो’ हळव्या गहिऱ्या डोळ्यांनी बोलतो, गहिवरतो, एकटक आकाशात बघतो, पुन्हा बोलतो.. तिथे कॉलेज, कॅन्टीन असं काही उरतच नाही.. सारंच कसं उत्कट उत्कट. भोवतालचे सगळे मित्रमैत्रिणी वेडीपिशी होऊन त्यांचं बोलणं ऐकतात आणि ‘ती’ तर खुळी होऊन बघत बसते त्याच्याकडे. म्हणते, ‘किती वेगळा आहे हा! किती खरा, किती निरभ्र..’
‘ती’ भरभरून बोलते त्याच्याविषयी- मैत्रिणींशी, घरच्यांशी.
मैत्रिणी विचारतात, ‘तू प्रेमात-बिमात आहेस की काय?’
ती म्हणते, ‘Please हं! एक माणूस म्हणून नक्कीच आवडतो ‘तो’ मला, पण इतकंच.’
आणि ‘तो’ तर असा विचारही करत नाही.. प्रेम म्हणजे ‘समर्पण’ असं म्हणतो ‘तो’. ‘तो’ सांगतो की जर केलेच प्रेम तर ते शेवटच्या श्वासापर्यंत!
‘ती’ सुंदर दिसते, हे ‘तो’ मान्य करतो, पण बुद्धिमान आणि सुंदर हे विरळाच. दोन्ही एकत्र असलेलं ‘ती’ हे रसायन प्रेमात-बिमात कधीही पडणार नाही, असं ‘तो’ सगळ्यांना पटवून देतो.
’ पहिल्या वर्षीप्रमाणेच दुसऱ्या वर्षीसुद्धा मॅनेजमेंटच्या वर्गात ‘ती’ पहिली आणि ‘तो’ दुसरा येतो. ‘ती’ म्हणते, ‘तो खरं तर साहित्यिकच होणार; पण इतका बुद्धिमान आहे की थोडा अभ्यास करूनही दुसरा नंबर!’
‘तो’ म्हणतो, ‘ती आजच्या युगातील फार मोठी कॉर्पोरेट व्यक्ती होणार..’
     भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी तो दोन महिने वेगळ्या राज्यात जातो आणि ‘ती’ तिच्या वडिलांच्या खासदारकीच्या निवडणूक प्रचारात बुडून जाते.. दोन महिन्यांनंतर भेटीत ‘तो’ म्हणतो, ‘आयुष्याची क्षणभंगुरता पाहिली मी भूकंपग्रस्त भागात.. या वाटेवर आलेला एक दिवस एकदाच येतो.. जे मनात येईल ते व्यक्त करायला हवं त्या त्या दिवशीच.. आणि ‘ती’च्याकडे पाहात म्हणतो, ‘प्रेमात पडलोय तुझ्या हे लांब गेल्यावर कळलं.. सुखात सगळेच आठवतात; पण डोकं सुन्न झाल्यावर वाटलं की, तू हवीस बरोबर.. तरच सावरीन..’
     ‘ती’ म्हणते, ‘मला माणूस म्हणून खूप आवडतोस, पण..’
‘तो’ म्हणतो,
‘तूच तूच सारीकडे, झालो तुझा तुझा
तुझ्या ‘नकारा’ची नको जीवघेणी सजा’
‘ती’ हसते..
     मग कृष्णधवल चित्रपट रंगीत होऊन जातो. ‘ती’ म्हणते, ‘इतकी माणसं पाहिली मी पण ‘तू’ किती संपूर्ण वाटतोस.. वाटतं आता काही नको..’ प्रत्येक स्वप्नसुद्धा त्याचं होऊन जातं.. वि. स. खांडेकरांपासून ते कुसुमाग्रज, बोरकर आणि गालीबपासून गुलजापर्यंत सारं काही जणू या दोघांवरच लिहीत होते असं सगळे मित्र-मैत्रिणी म्हणतात.. कॉलेजमधल्या प्राध्यापकांसह सगळेच म्हणतात, ‘हे आजचं सर्वात गुणवान, आदर्श जोडपं.’
‘तो’ म्हणतो, ‘कशासाठी देवाने इतकी र्वष लांब ठेवलं आपल्याला. आता जाणवतंय की, हे नातं गेल्या कित्येक जन्मांचं आहे.’
‘ती’ म्हणते, ‘प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रहर तुझे डोळे दिसतात घरभर आणि मग लाजते मी उगाचच..’
मग निसर्ग, सृष्टी, कविता, कागदावर उतरतात फक्त तिच्यासाठी आणि ‘ती’ तर प्रत्येक श्वासच करून टाकते त्याच्या नावाचा.
’ तो म्हणतो, ‘असं वाटतं, फक्त साहित्यातच रमून जावं.. नको नफ्यातोटय़ाची गणितं.’
‘ती’ म्हणते, ‘खूप वेगळा विचार करतोस, म्हणूनच तर आवडतोस.’
‘तो’ म्हणतो, ‘मी नशीबवान आहे की मला तू भेटलीस.’
‘ती’ मिठीत शिरते.
     ‘तो’ पहिला कवितासंग्रह प्रकाशित करतो आणि त्याचं प्रत्येक छोटं कामही फक्त आणि फक्त ‘ती’ करते.
कुणीतरी म्हणतं, ‘अगं त्याचं तुझ्याआधीसुद्धा कोणावर तरी..’
‘ती’ चिडते, ओरडते. म्हणते, ‘तो भूतकाळ होता.. तो चुकला होता.. आता तो फक्त माझा आहे.’
‘ती’ म्हणते, ‘बाबा म्हणाले, परदेशात जाऊन शिका- म्हणजे आपण दोघंही बरं का!’
‘तो’ म्हणतो, ‘अगं, आता मला नको गं पुन्हा ती गणितं. आता माझ्या गप्पा आकाशाशी, पक्ष्यांशी आणि हृदयाशी.. पण तू जा, लवकर परत येशील ना?’
तिच्या डोळ्यात पाणी..
‘ती’ म्हणते, ‘जाण्यापूर्वी एकदा घरच्यांशी भेट घडवूया?’
‘तो’ म्हणतो, ‘आपलं नातं जन्मोजन्मीचं, पण तू म्हणशील तसं ठरवूया.’
’ एअरपोर्टवर ‘ती’ म्हणते ‘काय रे हे.. नाहीच ना भेटलो आपण सगळे एकत्र.’
‘तो’ म्हणतो, ‘नंतर कायम एकत्रच आहोत ना मग?’
‘ती’ म्हणते, ‘नाही जाऊ शकणार रे तुला सोडून.’
‘तो’ म्हणतो, ‘रोज जपीन तुझी प्रत्येक आठवण माझ्या हृदयाच्या तळाशी आणि वाट बघीन तुझ्या हाकेची.’
‘ती’ ओक्साबोक्शी रडत निघते आणि ‘तो’ सुन्न होऊन कोऱ्या कागदाकडे बघत म्हणतो, ‘माझी कविता दूर गेली..’
 ‘ती’ तिच्या धावपळीतसुद्धा दोन देशांमधला वेळेचा फरक लक्षात घेऊन रोज फोन करते. ‘तो’सुद्धा तिच्याकडे फोटोकडे पाहत कवितेत बुडून जातो. विरह.. विरह म्हणजे काय याचं जणू जिवंत काव्यच ‘तो’ आणि ‘ती’ अनुभवतात.
’ एक दिवस ‘तो’ विचारतो, ‘खरंच आठवण येते ना माझी..’
‘ती’ म्हणते, ‘असं का विचारतोस? सोडून येऊ का शिक्षण?’
‘तो’ हसून म्हणतो, ‘नाही गं, पण..’
एक दिवस ‘ती’ म्हणत, ‘इतक्या गडबडीतसुद्धा आठवडय़ात दोनदा तरी बोलतोच ना आपण आणि तुला मित्रांबरोबरच्या पार्टी-गप्पा आणि.. कळतंय ना? हे सगळं कमी करशील ना? तू किती वेगळा होतास रे! होशील ना अगदी तसाच माझ्यासाठी..’
‘तो’ म्हणतो.. ‘हं हं चल, नंतर बोलू!’
’ ती म्हणते, ‘अरे, इतक्या विचित्र वेळेला फोन? आता मध्यरात्र आहे ना भारतात?’
‘तो’ जड आवाजात म्हणतो.. लवकर येथील ना? मला एकटं वाटतंय.’
‘ती’ म्हणते.. ‘तू झोप, मला उद्या युनिव्हर्सिटीत प्रेझेंटेशन आहे.’
‘तो’ म्हणतो.. ‘ओ.के.’
‘ती’ म्हणते, ‘अरे! खूप मोठी बातमी आहे, मला इथे पीएच. डी.साठी स्कॉलरशिप मिळतेय. बाबा म्हणाले, ‘शिक! त्यांना त्यांच्या मतदारसंघात खूप उच्चशिक्षित आमदार हवाय ना!’
‘तो’ म्हणतो, ‘किती र्वष?’
‘ती’ म्हणते, ‘फक्त दोन..!’
‘तो’ म्हणतो, ‘तू आणि राजकारणात..?’
ती म्हणते, ‘अरे, अभिनंदन. तुला मोठा पुरस्कार मिळाला ना, आता तू महाकवी.. टेक केअर.. बाय!’
तो म्हणतो, ‘तू माझ्याशी किती दिवसांत बोलली नाहीस.’
ती म्हणते, ‘मी तुझी आहे.. फक्त तुझी.’
तो म्हणतो, ‘तू अति महत्त्वाकांक्षी झाली आहेस.’
ती म्हणते, ‘मी मनाचं ऐकतेय. तूच तर म्हणतोस आणि तुझी कवितासुद्धा हेच सांगते.’
तो म्हणतो, ‘कविता वेगळी आणि आयुष्य वेगळं.’
‘ती’ म्हणते, ‘तू असा नव्हतास, म्हणून मी तुला होकार दिला.’
तो म्हणतो, ‘मी जिच्या प्रेमात पडलो ‘ती’ तू वेगळी होतीस!’
ती म्हणते, ‘तू मला माणूस म्हणून, कवी म्हणून आजही आवडतोस पण..’
तो म्हणतो, ‘या मार्गावर विराणीच भेटते, मी एकटा होतो आणि..’
‘ती’ ओरडते, ‘स्पष्ट बोल! जरा कवी-पण बाजूला ठेव तुझ्यातलं.’
‘तो’ फोन ठेवतो आणि सुन्न बसून राहतो.
     मित्र-मैत्रिणींमध्ये आधी शंका, मग कुजबूज आणि मग चर्चा सुरू होते, ‘ती’ किती एकटी पडलीये.. तिच्या मनात आजही प्रेम आहे.. ‘तो’ सध्या कवितासुद्धा करू शकत नाही. इतकं अफाट जोडपं.. पण.. आणि..
सगळे आपापल्या कामात व्यग्र होतात.. दर वेळी ‘ती’चा उल्लेख आल्यावर त्याचा उल्लेख होतो आणि त्याची कविता ऐकताना ‘ती’चा. जेवणं, खाणं, पाऊस, वारा, पाणी, समाज, कविता, गाणी, शिक्षण, राजकारण सगळं होतं तसं अगदी तसंच चालू राहतं..
     १५ वर्षांनंतर आमदार श्रीमती ‘ती’च्या हस्ते ज्येष्ठ कवी ‘तो’चा सत्कार समारंभ.. ‘ती’च्या सोबत तिचे सुप्रसिद्ध उद्योगपती पती आणि ‘तो’ आपल्या प्राध्यापिका पत्नीची अभिमानाने ओळख करून देतो.. हस्तांदोलन होते.. सत्कार होतो.. भाषणात ‘ती’ म्हणते, की समाजात अशी वेगळी वाट शोधणारे कमी असतात. ‘तो’ म्हणतो.. आपल्या मनाचा हात धरून जायला हवं.. दोघांनाही.. सगळं ऐकल्या-ऐकल्यासारखं वाटतं.. दोघंही मान डोलावत एकमेकांची भाषणं ऐकतात.. समारंभ संपतो.. दोघं एकमेकांची, घरच्यांची चौकशी करून निरोप घेतात आणि आपापल्या गाडीच्या दिशेने चालू लागतात.. एकदाही मागे वळून न बघता चालत राहतात!