अशीही बातमीदारी...(भाग १)


जाणून बुजून एखाद्याला त्रास देण्यासाठी काही वार्ताहर आपल्या लेखणीचा कसा वापर करतात, याचा आज प्रत्यय आला. निमित्त होते एका बातमीचे...


   जाणून बुजून एखाद्याला त्रास देण्यासाठी काही वार्ताहर आपल्या लेखणीचा कसा वापर करतात, याचा आज प्रत्यय आला. निमित्त होते एका बातमीचे. एका वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर ती झळकली. शिवाय माझाच गावात घडलेली घटना असल्याने आपसूकच तिच्याकडे लक्ष वेधले गेले. 'शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थी जखमी' अशा आशयाचा मथळा असलेली ती बातमी होती.

   जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना बेदम झोडपले. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या उजव्या हाताला जबर मार बसला. मात्र या शिक्षकावर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापिका व काही जबाबदार व्यक्तींनी काहीच कारवाई केली नाही, असा त्या वार्ताहराचा आक्षेप होता. शिवाय बातमीच्या शेवटी 'त्या शिक्षकाला निलंबित करावे' अशी मागणीही केलेली. वरवर पाहता मनस्वी चीड आणणारी हि गोष्ट. विद्यार्थी जबर जखमी होईस्तोवर मास्तर मारतातच का? असा प्रश्न पडून साहजिक त्या शिक्षकाला निलंबितच करावे असे आपल्यालाही वाटेल. पण ज्या 'डेटलाईन' ने हि बातमी आलेली त्या वार्ताहराला मी चांगला ओळखून होतो. त्यामुळे कुतूहलापोटी अधिक जाणून घेण्याचे ठरवले. अन मग खरा प्रकार समजला. तो थोडक्यात असा...
   घोडेगावच्या जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक प्रशिक्षणासाठी दुस-या शाळेत गेलेले. त्यामुळे दुस-या इयत्तेला शिकविणा-या एका शिक्षकावर अतिरिक्त वर्गाची जबाबदारी आली. एका वर्गात ते शिकवीत असताना दुस-या वर्गात गोंधळ सुरु झाला. या शिक्षकांनी मुलांना शांत करण्यासाठी छडीचा वापर केला. हातातील छडीचा प्रसाद त्यांनी जवळ-जवळ सगळ्याच मुलांना वाटला.मात्र एका मुलाच्या हाताला जास्त मार लागला. शाळा सुटल्यानंतर या मुलाने शाळेत झालेला प्रकार घरी सांगितला. मुलाचे वडील मोठे व्यापारी आहेत. त्यांनी ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांकडे तक्रार केली. सदस्यांनी व पालकांनी शाळेत भेट देऊन त्या शिक्षकाला चांगलेच धारेवर धरले. एव्हाना त्या शिक्षकांनाहि झाल्या चुकीचा पश्चाताप झाला होता. त्यांनी सर्वांची माफी मागून मुख्याध्यापिकेकडे लेखी माफीनामा सादर केला. 'असा प्रकार माझ्याकडून पुन्हा होणार नाही' असेहि त्यात लिहून दिले. केंद्रप्रमुखांनी पालकांची अन ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांची माफी मागितली अन या प्रकरणावर पडदा टाकला.
   घटनेला २-३ दिवस उलटले. मात्र गावातील एका वृत्तपत्र विक्रेत्या एजंटने शेजारच्या गावातल्या वार्ताहराला हा प्रकार सांगितला. ज्या मुलाला शिक्षकांनी मारले, त्या मुलाच्या वडिलांना या दोघांनी गाठले, घटनेची माहिती घेतली अन 'वृत्तपत्रात बातमी देऊ' असे सांगितले. मग या वार्ताहर द्वयीने त्या शिक्षकाला गाठले. शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला तर त्या शिक्षकाला निलंबित व्हावे लागते हा 'जीआर'ही त्यांना सांगितला. अन या प्रकारची 'बातमी' आली तर काय होईल, याची कल्पना दिली. भेदरलेल्या त्या शिक्षकाने गयावया करत माफी मागायला सुरुवात केली. त्यावर १० हजार रुपये दिले तर ही बातमी लागणार नाही, असे गणित त्या वार्ताहर दुकलीने मास्तरांना समजावून सांगितले.
   काही महिन्यांपूर्वीच शिक्षक म्हणून रुजू झालेल्या त्या शिक्षकाला हे पटेना. 'हवे तर मी तुम्हाला यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याला कधीही बोट लावणार नाही, असे लिहून देतो' असे म्हणत त्या शिक्षकाने पुन्हा माफी मागितली. मात्र हे दोघे ठाम होते. ठरल्याप्रमाणे त्या वार्ताहराने मस्तपैकी बातमी तयार करून पाठवली. आजच्या अंकात त्या दैनिकात ती लागलीही. 'बातमीचा परिणाम' काय झाला अजून माहित नाही. पण केंद्रप्रमुखांना भेटलो तेंव्हा त्यांनी शिक्षकाच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. त्या वार्ताहर दुकलीमुळे बिचारे मास्तर मात्र दिवसभर भेदरलेल्या अवस्थेत होते.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. त्या शिक्षकाने तक्रार केली तर संबंधित बातमीदाराविरूद्ध नक्कीच कारवाई होईल.

    उत्तर द्याहटवा
  2. अनेक मोठ्या मोठ्या प्रकरणातही हा बातम्यांचा असाच बाजार होतो...... :(

    उत्तर द्याहटवा