'त्या' प्रसंगाची रुख-रुख...


   आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात. ज्यावेळी नेमकं काय करावं कळत नाही. आपल्याला नेमकी परिस्थिती ठावूक नसते, अन ती जाणून घेऊन काही करण्याइतपत वेळही नसे. त्यामुळे आपण बघ्याची भूमिका घेतो. आपल्या या भूमिकेचा नकळत कोणाला फटका बसला आणि भविष्यात पुन्हा तो प्रसंग आठवला कि मग वाईट वाटत. 'त्या क्षणी आपण असं करायला हवं होत.' किंवा 'तसं केलं असत तर किती बर झालं असत' असं सारखं वाटत राहत. पण वेळ कधीच निघून गेलेली असते. मग उगाचच मनाला चूट-पुट लागून राहते...! 'तो' प्रसंग आठवला कि मन खात राहात. काल माझही असच झालं... किंबहुना अजूनही 'तो' क्षण आठवला कि स्वताचीच चीड येते. मी असा कसा वागलो तेच कळत नाही. अपराधीपणाची भावना हेच मोठ दुखः..!


   त्याच झालं असं. काल शनिवार होता. नेहेमीप्रमाणे मी शनी-शिंगणापूरला गेलो. मात्र काल शनी-आमावस्या असल्यामुळे माझ्यासोबत आणखी 2 मित्र आले होते. भाविकांचीही नेहेमीपेक्षा थोडी जास्तच गर्दी होती. गावात प्रवेश केला आणि ''महेश नमस्ते. आज पायी आलात वाटते.'' असा आवाज कानी पडला. मी आवाजाच्या दिशेने पहिले तर सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब माने दृष्टीस पडले. पोलिसांच्या जीपमध्ये बसून ते एका माणसासोबत काहीतरी बोलत होते. मला पाहिले म्हणून त्यांनीच आवाज दिला होता. मी त्यांच्याकडे जाऊन दर्शनासाठी आल्याचे सांगितले. तर जवळ उभ्या असलेल्या माणसाकडे बघत म्हणाले, ''बघा तुम्ही म्हणता ना शनी-शिंगणापूरात चोरी होत नाही ? हा घ्या पुरावा.'' मी काही न समजल्याने त्या माणसाकडे पाहिले.
''याचे पाकीट मारलेय कोणीतरी.''- मानेंनी खुलासा केला.
''काय ? म्हणजे कसे काय ?'' मी विचारले.
     माझी उत्सुकता फारशी ताणून न धरता मानेंनी उत्तर दिले, "कोणीतरी पाकीट मारले हो. असे नेहेमीच होत असते पण तुम्ही लोक मान्य करत नाही. हे घ्या उदाहरण."
मानेंनी हे मुद्दाम मला सांगितले. त्यालाही कारण होते.

    गेल्या आठवड्यात शनी-शिंगनापुरात '३५ हजारांची चोरी' झाली होती. हरियाणातून आलेल्या भाविकांचा ३५ हजारांचा मुद्देमाल त्यांच्यासोबतच आलेल्या एका भामट्याने लंपास केला होता. हि घटना माझ्या शनी-शिंगणापुरातील एका मित्राने मला मोबाईल वरून कळवली. माझा दृष्टीने हि मोठी 'बातमी' होती, कारण सहसा ( सहसा काय कधीच) शनी-शिंगणापुरात चोरी होत नाही, असा सर्वांचा समज (किंवा श्रद्धा ) आहे. आणि झालीच तर त्या चोराला लगेचच शिक्षाही होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि गुलशन कुमारच्या 'सूर्यपुत्र शनिदेव' या चित्रपटानेही हे ठासून सांगितले. या चित्रपटामुळेच रात्रीतून 'शनी- शिंगणापूर' जगाच्या नकाशावर आले. या गावातील घरांना दरवाजे नाहीत, कारण लोकांच्या संपत्तीचे रक्षण शनिदेवच करतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांची/भाविकांची गर्दी वाढत गेली. आणि अवघ्या ४-५ वर्षात शनी-शिंगणापूरचा कायापालट झाला. छोटेसे गाव कायमचे गजबजून गेले.
     मला आठवतंय... लहानपणी चैत्री पाडव्याला आणि शनी-आमावस्या असेल तर येथे मोठी यात्रा भरायची. परिसरातून लोक सहकुटुंब शनिदेवाच्या दर्शनासाठी यायचे. तेंव्हा हा परिसर फारसा विकसित नव्हता. वर्षातून यात्रेचे हे ३ दिवस सोडले तर अगदी निर्मनुष्य असायचा हा परिसर. सभोवताली दाट झाडीही होती. त्यावेळी दर्शन घेताना मन प्रसन्न होऊन जायचे. आता खूप बदल झालाय... असो. तर याठिकाणी 'चोरी होत नाही' हे लहानपणापासून ऐकत आलेलो. पण माझ्या दादाची चप्पल मात्र दोन-तीनदा गेलीय बरे येथून. आई म्हणायची ''जाऊ देत.. देवाच्या दारात काही हरवले तर चांगले असते.'' पण मला प्रश्न पडायचा, चप्पल हरवेल कशी? ती सजीव थोडीच आहे? असो यामुळेच कि काय म्हणा पण शनी-शिंगणापुरात '३५ हजारांची चोरी' झाल्याचे ऐकून मीही चकित झालो होतो.
    त्या मित्राच्याच मोबाईलवरून मी ज्यांचा मुद्देमाल चोरीस गेला त्या भाविकांसोबत बोललो. आणि खरेच ते लुबाडले गेल्याचे लक्षात आलावर त्यांना पोलिसांत जायचा सल्लाही दिला. त्या मित्रालाही त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात पाठवले. पण पोलीस त्यांची फिर्याद नोंदवून घेईनात. म्हणून मी सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब माने यांना फोन करून गुन्हा दाखल करून घेण्याची विनंती केली. त्यावेळी ते पोलीस ठाण्याच्या बाहेर होते पण त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करून घ्यायला सांगितले. अन ''ही बातमी'' दुस-या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली...! (माझ्या " आश्चर्यम: शनि-शिंगणापुरात चोरी" या ब्लॉगमध्ये याबाबत लिहिले आहे.) त्यावेळी मानेंनी मला सांगितले होते कि, ही घटना नवीन नाही. शनी-शिंगणापुरात रोज अशा कितीतरी लहान-मोठ्या चोऱ्या होतात. पण कोणी त्याबाबत फिर्याद दाखल करायला येत नाही. कोणी पोलीस ठाण्याचा पत्ता विचारलाच तर त्याला शनी-देवाचा महिमा सांगून पोलिसात जाण्यापासून परावृत्त केले जाते. स्थानिक पुढा-यांचाही यात बरेचदा हस्तक्षेप होतो. गुन्हा दाखल झाला तर नाहक गावाची बदनामी होईल, भाविकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होईल आणि 'आर्थिक गणित' कोलमडेल, असा त्यामागचा हेतू...!
     असो, ...म्हणून आज माने मला सांगत होते 'हा घ्या पुरावा'.!

     मी भानावर येऊन त्या भाविकाकडे पाहिले. तो मानेंकडे पाहत होता. अंगात प्यांट-शर्ट आणि हातात घडी केलेला टॉवेल, अशा वेशात तो मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत होता.
      मी त्याला विचारले, 'काय हो, तुमचे पाकीट चोरीला गेलेय का?' त्याने माझ्याकडे न पाहता फक्त होकारार्थी मान हलवली.
      माने म्हणाले, 'पाहिलंत.. अन तुम्ही म्हणता शनी-शिंगणापुरात चोरी होत नाही.' मीही विचारात पडलो होतो. तोवर पुढे गेलेल्या मित्रांनी मला आवाज दिला. म्हणून मी मानेंचा निरोप घेऊन पुढे चालू लागलो.
     ५-६ पावलं चाललो असेल तोवर मानेंची जीप मागून येऊन पुढे निघून गेली. मी मागे वळून पाहिलं तर तो भाविक पडलेला चेहरा करून मानेंच्या जीपकडे पाहत होता. मी न राहवून परत त्याच्याकडे गेलो.
''तुमचे पाकीट खरेच चोरीला गेलेय का?' मी विचारले.
त्याने पुन्हा होकारार्थी मान हलवली.
'तुम्ही कुठून आलात?' मी पुन्हा प्रश्न केला.
'परभणीहून' एवढे बोलून तो गप्प बसला.
मीच विचारले, 'तुम्ही कुठल्या गाळ्यावर पूजा घेण्यासाठी थांबला होतात?'
'८ नंबर' असे सांगून तो रडायला लागला.
काय करावे मला कळेना. 'तुमच्या पाकिटात किती पैसे होते?' मी म्हणालो.
त्याने फक्त २ बोटे केली. 'दोनशे?' मी विचारले. त्याने नकारार्थी मान हलवली.
'मग दोन हजार?' असे विचारल्यावर त्याने होकारार्थी मान हलवली.
      पण तो रडायचा थांबेना अन मलाही काय करावे ते सुचेना. पुन्हा मित्रांनी आवाज दिला म्हणून मी निघालो. पण परत त्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आला म्हणून मागे बघितले. तो तिथेच उभा राहून डोळे पुसत होता. मी परत त्याच्याकडे गेलो अन म्हणालो, "तुम्ही चिंता करू नका. तुमचे पाकीट आपण शोधून काढू." पण त्याचे अश्रू थांबेनात. मित्र थांबलेले म्हणून मी त्याला म्हणालो, "तुम्ही १० मिनिट थांबा, मी आलोच दर्शन घेऊन". त्याने होकारार्थी मन हलवली. अन मीही निघालो.
   दर्शन झाले.. पण तो माणूस काही डोळ्यापुढून जात नव्हता. आज थोडे घाईतच निघालो अन तो माणूस बसला होता तिथे आलो, पण त्याचा मात्र आता तिथे पत्ता नव्हता. इकडे-तिकडे बघितले पण तो दिसेना. शेजारी दुकानात चौकशी केली पण काही उपयोग झाला नाही. तोवर मागून मित्रही येऊन पोचले. कुणाला शोधतोय असे विचारल्यावर मी त्या माणसाबद्दल सांगितले. 'जाऊ देत' म्हणून त्यांनी निघायची घाई केली. माझा मात्र पाय निघवेना. 'तुम्ही व्हा पुढे, मी नंतर येतो' म्हणालो तर 'आता एवढ्या गर्दीत कुठे शोधणार आहेस त्याला ?' असे म्हणून मित्र रिक्श्यामध्ये जाऊन बसले. २-५ मिनिट उभा राहिल्यानंतर माझाही नाईलाज झाला. मीही रिक्षाकडे गेलो आणि घरी आलो.

   पण त्या माणसाचा रडवेला चेहरा काही केल्या डोळ्यांपुढून जाईना. पुन्हा बाईक काढली आणि शनी-शिंगणापूर गाठले. थोडा वेळ शोधाशोधहि केली, पण गर्दी वाढत चालली होती त्यामुळे उपयोग नव्हता. न राहवून स. पो. नि. मानेंना फोन करून त्या माणसाबद्दल विचारले. ते म्हणाले त्याला सोनई पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद द्यायला सांगितले आहे, गुन्हा दाखल झाल्यावर बघू. मी नाईलाज झाल्याने पुन्हा माघारी आलो. दिवसभर त्या माणसाचाच विचार डोक्यात घोळत होता. मग मात्र स्वताचाच राग यायला लागला. बिचा-याचे पाकीट चोरीला गेले, होते नव्हते सगळे पैसेही गेले. आता तो परत कसा गेला असेल? त्याने काय खाल्लं असेल ? तो पोलिसात गेला असेल म्हणून दोन-तीनदा पोलीस स्टेशनलाही फोन लाऊन पाहिला, पण तो आलाच नसल्याचे समजले. मग अजूनच वाईट वाटायला लागले. त्याच वेळी मित्रांना घेऊन तो भाविक ज्या दुकानात उतरला होता तिकडे गेलो असतो तर कदाचित काहीतरी उपयोग झाला असता. किंवा मानेंना सोबत घेऊन गेलो असतो आणि त्या दुकानदारालाच 'पोलिसी खाक्या' दाखवला असता तर पाकीट मिळाले पण असते. तेवढ्यासाठी गुन्हाच कशाला दाखल करायला हवा. आणि नसतेच मिळाले पाकीट तर आम्ही पैसे गोळा करून त्याच्या परत जाण्याची सोय केली असती न..?
     त्या भाविकाचे पुढे काय झाले असेल.? तो काय विचार करत असेल ? बिचारा परभणीहून इतक्या लांबून दर्शनासाठी आला होता. शनी-शिंगणापुरात चोरी होत नाही समजून किती विश्वासाने त्याने कपडे दुकानात ठेवले होते. त्याच्या विश्वासाला किती मोठा तडा गेला..! ज्या भामट्याने पाकीट चोरले त्याला भविष्यात शिक्षा होईल कि नाही माहित नाही. पण मानेंना हाताशी धरून त्या दुकानदाराला धडा शिकवला असता तर पुन्हा दुसर्या कुणाचे पाकीट तरी चोरीला गेले नसते. पण आता विचार करून काय उपयोग...?
    दिवसभर चैन पडले नाही. त्या माणसाचे पुढे काय झाले असेल..? हाच विचार मनात घोळत होता. माझच चुकले. त्याच्यापेक्षा दर्शन इतके महत्वाचे होते का? अन थोडा उशीर झाला असता तर काही बिघडले असते का? पण त्याच्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायला नको होता. आपल्या हातून आज मोठे पाप घडले असे वाटायला लागले. माझी अक्कल त्या क्षणी कुठे चरायला गेली होती असे वाटायला लागले. आता विचार करून काहीच उपयोग नाही हे लक्षात आल्यावर तर अजूनच वाईट वाटले. विचार करतच रात्री झोपी गेलो...

   ...पहाटे पहाटे एक स्वप्न पडले. मी मित्रांसोबत शनी-शिंगणापुरला गेलो... सकाळी घडलेलाच प्रसंग... जसाच्या तसा... पण शेवट मात्र चटका लावून गेला... तो माणूस पाकीट चोरीला गेले म्हणून पायीच घरी निघालाय... मीहि त्याच्या मागे चाललोय... अन वेशीबाहेर आलावर त्याने मागे वळून पाहिलं... वेशीकडे बघून हात जोडले... रडत रडतच म्हणाला.. "हे शेवटचं. परत कधीच तुझ्या दर्शनाला येणार नाही.. जगात देव राहिलाच नाही.." अन पुन्हा चालायला लागला... मागे वळून न पाहता...

अलार्म वाजल्याने मला जाग आली.
अजूनही मनात विचारचक्र चाललंय...
तो माणूस खरच असं म्हणाला असेल का ?....
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. कोणाचा विश्वास मोडताना पाहून खरच आपल्या पांढरपेशा मनाला चटका बसतो ..आणि ह्या असल्या प्रसंगाची रुखरुख कधी कधी खूप छळते ...

    उत्तर द्याहटवा