गाव करील ते राव काय करील?


     स्थानिक पुढा-यांच्या किंवा शासनाच्या भरवशावर बसले तर विकासकामे पार पडण्यास वर्षानुवर्षे लागतात. सर्वसाधारणपणे छोट्या-छोट्या गावातील ग्रामस्थांना येणारा हा नित्याचा अनुभव. परंतु नेवासा तालुक्यातील घोडेगाव मात्र याला अपवाद ठरले आहे. या गावातील ग्रामस्थांनी (विशेषत: तरुण वर्गाने) नुकत्याच हाती घेतलेल्या सत्कार्यामुळे 'गाव करील ते राव काय करील?' असेच सध्या म्हणावे लागत आहे.


     जागृत देवस्थान 'घोडेश्वरी देवी' हे घोडेगावचे ग्रामदैवत. या देवीचे एक पुरातनकालीन हेमाडपंथी मंदिर गावात आहे. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवात आणि चैत्र कृष्ण पंचमीला तेथे देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो रुपयांची उलाढाल होते. राजकीय दृष्टीकोनातूनही घोडेगावला नेवासा तालुक्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपआवार, जनावरांचा आठवडे बाजार (प्रामुख्याने म्हैस आणि बैलांचा), जवळच असलेले शनीशिंगणापूर, ही घोडेगावची मुख्य ओळख. पण कित्येक वर्षे उलटूनही या मंदिराच्या विकासाला लागलेले ग्रहण मात्र सुटले नाही.
     गावात आणि तालुक्यात अनेकदा राजकीय सत्तांतर झाले. दर निवडणुकीला गावच्या विकासासोबत मंदिराच्या विकासाचाही सूर आळविला गेला, परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी गावातील तरुणाईनेच पुढाकार घेतला आणि १५ फेब्रुवारीला प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली. मात्र हे सत्कार्य करीत असताना वर्षानुवर्षे आश्वासनांचे गाजर दाखविणा-या पुढारी किंवा शासनापुढे या तरुणाईने हात पसरले नाहीत. स्वकष्टातून आलेल्या मिळकती मधील 'खारीचा वाटा' बाजूला काढून त्यातून हे सत्कार्य तडीस न्यायचा या तरुणाईचा मानस आहे.
     'घोडेश्वरी देवी मंदिर विकास समिती'च्या माध्यमातून या मंदिर परिसराचा विकास सध्या सुरु आहे. मंदिराभोवती संरक्षक भिंत, आतील परिसराचे सुशोभिकरण, बगीचा, वाहनतळ आणि प्रवेशद्वार असे या कामाचे स्वरूप आहे. त्यासाठी कमीत कमी सुमारे २० ते २२ लाख रुपयांचा (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. गावातील कुठलेही धार्मिक कार्य (मग ते यात्रोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव) असो, वर्गणी आलीच आणि घोडेगावात तर वर्गणीला तोटाच नाही. एकट्या आठवडे बाजारात लाखो रुपयांची वर्गणी गोळा होते. गावकरी या मार्गाने गेले असते तर मंदिराचे काम केंव्हाच पूर्णत्वास गेले असते.
     पण घोडेगावकरांनी या मंदिराचा विकास करायचा, मात्र त्यासाठी 'बाहेरच्या' लोकांपुढे हात पसरायचे नाही, मदतीसाठी कोणावर सक्ती करायची नाही, असे ठरविले. ज्याची इच्छा असेल तो मदत देईल, या भावनेतून काम सुरु झाले. मंदिराच्या विकासकामात आपापला 'खारीचा वाटा' टाकण्यासाठी इतर ग्रामस्थही मग पुढे आले. कुणी रोख रकमेच्या स्वरुपात, कुणी बांधकाम साहित्याच्या स्वरुपात मदत दिली आणि सत्कार्यात सहभागी झाले.
     बांधकामासाठी लागणारे दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टील, ग्रील, रंग, खिळे, असे साहित्य गोळा झाले. ज्या गावक-यांनी अशी मदत दिली, त्यांची नावे रोज सायंकाळी ध्वनीक्षेपकावरून जाहीर केली जातात. कुणाला 'गुप्तदान' करायचे असेल तर त्याचेही नाव 'गुप्त' देणगीदारांच्या यादीत नोंदविले जाते. ज्यांना यापैकी काही शक्य झाले नाही ते प्रत्यक्ष श्रमदान करायला पुढे आले. एखाद्या दिवशी कामावर कुणी नसले तर गावातील 'तरुणाई' स्वत: उन्हात राबते. त्यामुळे या कामाने आता वेग घेतला असून संरक्षक भिंतीचे काम आता प्रगतीपथावर आहे.
     'घोडेश्वरी देवी'चा यात्रोत्सव २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसे पाहता २० लाख रुपयांची रक्कम काही थोडी नाही. मात्र ग्रामदेवतेवर निष्ठा ठेवून सत्कार्यासाठी पुढे आलेली 'तरुणाई' देखील आपल्या निश्चयावर तितकीच ठाम आहे. लोकसेवकांच्या स्थानिक निधीतून किंवा शासकीय योजनेतून पार पडलेल्या विकासकामांचे श्रेय घेणारी मंडळी आपण पाहतो. परंतु घोडेगावची झपाटलेली तरुणाई मात्र वेगळीच. त्यांना प्रसिद्धी अजिबात नकोय.
     या 'तरुणाई'सोबत संवाद साधला असता, ''आम्हाला एकाच ध्यासाने झपाटलंय, ते म्हणजे ग्रामदेवतेच्या मंदिराचे सुशोभिकरण आणि विकास. त्याकरिता शासकीय योजनेची खैरात किंवा पुढा-यांचा पैसा आम्हाला नको. 'आई घोडेश्वरी'चा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. मनात अढळ आत्मविश्वास आहे आणि हे स्वप्न साकार करण्याची ताकद देखील आमच्या मनगटात आहे.'' असे ते सांगतात. आणखी काय हवे. सत्कार्यासाठी जर गाव एकत्र आले तर अशक्य काय आहे. एकीकडे आजकालच्या युवकांना विकासाचे घेणे-देणे नाही, असा टोमणा मारला जातो. परंतु घोडेगावच्या तरुणांनी मात्र आपल्या कृतीतून परिसरात आणि इतर गावांपुढे नवा आदर्श उभा केला आहे.

(हे सदर आजच्या 'लोकमत' मध्ये प्रकाशित झाले आहे.)
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. आताशी गावकरी तरुण मंडळांच्या लक्षात येऊ लागले कि राजकारण म्हणजे भिजत ठेवलेले घोंगडे विकास करावयाचा ठरला तर समाजकारण करूनच विकास साध्य होईल यातून नक्कीच बरेच काही शिकता येण्या सारखे आहे ( गाव तसं चांगलं पण वेशीला ...... आहे .... ) ठराविक टोप्याना विकास नक्को तर राजकारणात पोळी भाजायची आहे त्यांच्या पासून हे तरुण दूर राहिले तर गावात बरेच विकास कामे होऊ शकतात ... एक आदर्श्य निर्माण होऊ शकतो

    उत्तर द्याहटवा