शिर्डीतील वाढती गुन्हेगारी



     गेल्या आठवड्यात 'पाप्या शेख' या गुंडाने पाटणी व गोंदकर या दोघा तरुणांचा आपल्या २० साथीदारांच्या मदतीने खून केला. रात्री अकरा वाजता दोघांना उचलून नेले. हिंदी चित्रपटातील व्हिलनप्रमाणे १७ जण रात्रभर दोघांना मारत होते. त्यांच्या वेदना ऐकून गुंडांना आनंद होत होता. नंतर त्यांचे मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आले.या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरला. जगाला 'श्रद्धा आणि सबुरी'चा संदेश देणा-या बाबांची शिर्डी गुन्हेगारीच्या विळख्यात सापडली आहे. हि गुन्हेगारी कशी आणि कुणाच्या मदतीने फोफावली त्याचे वास्तवदर्शी चित्रण 'लोकसत्ता'चे जेष्ठ बातमीदार अशोक तुपे यांनी यांनी केले आहे. १८ जूनच्या अंकात ते प्रसिध्द झाले आहे. हे 'वृत्त-विश्लेषण' जसेच्या तसे...
     
     केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शिर्डीतील साई मंदिराच्या बाहेरील सुरक्षेबद्दल पंधरा दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती. ‘गुंडा’बद्दल श्रद्धा आणि सबुरी बाळगणाऱ्या पोलिसांनी त्याचीही फारशी दखल घेतलेली नसल्याचेच आता उघड झाले. भडकलेल्या टोळीयुद्धातील मुडदे पडणे अद्याप बंद झालेले नसून राज्याच्या गृहविभागाच्या अब्रूचे पुरते धिंडवडे निघाले आहेत.
     साईबाबा मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे की नाही हे गृहविभागाने जाहीर केलेले नाही, देशात कुठेही बॉम्बस्फोट झाले की शिर्डीत रेड अलर्ट जाहीर केला जातो. मंदिर सुरक्षेसाठी आतापर्यंत शेकडय़ाने बैठका झाल्या, पण आता गुंडांच्या टोळ्यांमधील वैमनस्यातून होणारा गोळीबार, अंमली पदाथार्ंची तस्करी, गावठी पिस्तुलांच्या विक्रीचे बनलेले केंद्र, खंडणीची वसुली, किरकोळ कारणावरून केला जाणारा खूनखराबा यामुळे भाविक अक्षरक्ष: गॅसवर आहेत.
     पोलिसांकडून हप्त्यापोटी गुंडाना अभय मिळत असल्याने गुन्हेगारी बोकाळली आहे. धार्मिक पर्यटन विकासाच्या बाजारगप्पा मारणारांना भक्तांच्या सुरक्षेचे घेणे-देणे नाही. रचित पाटणी व प्रवीण गोंदकर या दोघा तरुणांची किरकोळ कारणावरून गुंडाच्या २० जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केल्यानंतर आता राज्य सरकारला जाग आली आहे. उद्या (शनिवारी) राज्याचे पोलीस महासंचालक अजित पारसनीस शिर्डीत येत असून त्यांनी शांतता, सुव्यवस्था व मंदिर परिसराच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बैठक आयोजित केली आहे.
     साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज सरासरी पन्नास हजारांहून अधिक भाविक येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी साईबाबा संस्थानने ७०० कर्मचारी तैनात केलेले असून राज्य सरकारने एक पोलीस अधिकारी दिला आहे. मंदिराच्या आत संस्थानची, तर बाहेर शिर्डी पोलीस ठाण्याची सुरक्षा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शिर्डी हे खिसेकापूंचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनले आहे. भाविकांचा खिसा कापला गेला की सुरक्षारक्षकांकडे तक्रार होते, त्याला पोलीस ठाण्यात नेले जाते, तेथे फिर्याद घेण्याऐवजी केवळ तक्रार लिहून घेतली जाते. भाविक पुन्हा तक्रारीचा पाठपुरावा करीत नाही. लाखो रुपयांच्या खिसे कापण्याचा धंदा राजरोस चालतो.
     पाप्या शेख या गुंडाने या व्यवसायात आपले साम्राज्य उभे केले आहे. देशभरातून आलेल्या खिसेकापूंना पाप्याची परवानगी घेऊनच खिसा कापावा लागतो. त्यातून पन्नास टक्के रक्कम पाप्या घेतो. स्थानिक गुंडाची पन्नासजणांची टोळी हा धंदा करते. दररोज पाप्या खिसे कापून मिळालेल्या पैशाचे वाटप करतो. काही सुरक्षारक्षक व पोलिसांशी त्याचे लागेबांधे आहेत. सुरक्षा अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांवर आता लोक ‘हप्तेखोरी’चे राजरोस आरोप करत आहेत. सहा टोळ्या कार्यरत असूनही त्यांना पकडले गेलेले नाही. आता त्यांच्यामध्ये टोळीयुद्ध सुरु झाले असून एकमेकांवर गोळीबार करून मुडदे पाडले जात आहेत.
     ‘चप्पलचोरी’चा नवा उद्योगही सुरु झाला असून दररोज  हजारो चपला चोरीला जातात. चोरलेल्या जुन्या चपला मुंबईला जातात. तेथे त्यांना फिनिशिंग करून नव्या बनविल्या जातात. परप्रांतीय गुन्हेगार पिस्तुलांची विक्री करतात. तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीचेही केंद्र बनले आहे. त्यामुळे आता भक्तांना अतिरेक्यांनी नव्हे तर गुंडांनी गॅसवर ठेवले आहे. खिसेकापूंनी आता आपले कार्यक्षेत्र श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी व राहाता असे केले असून गुंडांचा नवा ट्रॅग्लर तयार झाला आहे. त्यांच्या टोळ्यांकडे शेकडय़ाने गावठी कट्टे आहेत. पोलिसांना त्याचे सोयरसुतक नाही. शनिशिंगणापूर, वेरूळ- अजिंठा, त्र्यंबकेश्वर येथे शिर्डीहून प्रवासी वाहतूक चालते. हजारो वाहने या उद्योगात आहेत. त्यातून पोलीस खोऱ्याने पैसा ओढत आहेत.
     अधिकारी पोलीस महासंचालकांपासून ते अधीक्षकांपर्यंतचे पाहुणे, मंत्री दर्शनाकरिता शिर्डीत आले की त्यांची बडदास्त ठेवतात. व्ही.आय.पी. कोटय़ातून दर्शन घडवितात. हॉटेलमध्ये जेवणाची-राहण्याची व्यवस्था करतात. त्यामुळे स्थानिक अधिकारी वरिष्ठांच्या गळ्यातील ताईत बनतात. त्यांना हात लावणे अधीक्षकांना कठीण होते. त्यात राजकीय नेत्यांच्या वाडय़ावर हजेरी लावली की राजकीय वरदहस्त मिळतो. त्यामुळे त्यांचा सर्वत्र दबदबा आहे. आता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिर्डीत केलेल्या बेनामी गुंतवणुकीचे व्यवहारही सांभाळण्याचा उद्योग ते करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची दक्षता घेण्यास पोलिसांना फुरसत नाही. बाबांच्या दर्शनासाठी मंत्री व वरिष्ठ अधिकारी आले की सुरक्षेच्या बैठका घेतात, शेकडय़ाने अशा बैठका झाल्या, फार्स अजूनही सुरू आहे.
     गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतीच सुरक्षेच्या प्रश्नावर बैठक घेतली. संस्थान ‘व्हॅन्टेज’ कंपनीची साडेचार कोटींची सुरक्षा यंत्रणा बसवत आहे. पोलीस महासंचालकांनी त्याला संमती दिली आहे. त्यांचे प्रात्यक्षिक चिदंबरम यांच्यासमोर झाले. मंदिराला अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नापेक्षा बाहेरील पाच किलोमीटर परिसरातील सुरक्षा यंत्रणेकडे त्यांनी लक्ष वेधले. पोलीस महानिरीक्षक उद्धव कांबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे त्यांनी त्यासंदर्भात खुलासा मागविला. राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. आता मंजुरीसाठी स्वत: केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी बोलणार आहेत.
     या घटनेला पंधरा दिवस उलटले असताना 'पाप्या शेख' या गुंडाने पाटणी व गोंदकर या दोघा तरुणांचा आपल्या २० साथीदारांच्या मदतीने खून केला. रात्री अकरा वाजता दोघांना उचलून नेले. हिंदी चित्रपटातील व्हिलनप्रमाणे १७ जण रात्रभर दोघांना मारत होते. त्यांच्या वेदना ऐकून गुंडांना आनंद होत होता. त्यानंतर नग्न अवस्थेत त्यांचे मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आले. या घटनेने गावकऱ्यांना संताप अनावर झाला. पोलिसांविरूद्ध आंदोलन झाले. आता सात-आठ गुंडांना अटक झाली. आणखी दहा गुन्हेगार बाहेर आहेत. पाप्या शेखवर नाशिकवर हल्ला झाला. त्यात त्याचा ‘गणेश’चा मुलगा मारला गेला. हल्लेखोर भूषण मोरेची माहिती दिली नाही. या किरकोळ कारणावरून केवळ संशयाच्या आधारे दोघांना मारून टाकण्यात आले. वादग्रस्त पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांना रजेवर पाठविण्यात आले असून त्यांची बदली करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी दिले आहे. गावकऱ्यांच्या दणक्यामुळे वरिष्ठांना जाग आली आहे. 
     बाबांच्या पावनभूमीतील गुंडांच्या साम्राज्याने राज्याच्या पोलीस दलाची अब्रू गेली. ती सावरण्याकरिता आता पोलीस महासंचालक अजित पारसनीस हे शिर्डीत येत आहेत. गुन्हेगारांचे देशव्यापी सिडींकेट उद्ध्वस्त करणे हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या