राधा-कृष्णाच्या ‘अनामिक’ आणि हुरहूर लावणाऱ्या नात्याचं गुढ कित्येक वर्षांपासून अनेकांना पडलेलं आहे. या नात्याबाबत अनेक दंतकथा देखील सांगितल्या जातात. पण ते नातं पूर्णपणे कधी कुणाला उलगडल्याचं आजवर तरी ऐकिवात नाही. मनात असंख्य विचारांचं काहूर उठविणाऱ्या या नात्याचे पदर उलगडणारा एक लेख काही दिवसांपूर्वी वाचनात आला होता. आज सहजच जुनी कागदपत्र चाळताना तो पुन्हा गवसला. लेख वाचला अन ‘व. पुं.’च्या त्या वाक्याची पुन्हा आठवण आली. ‘जिवंतपणी मरण अनुभावायचं असेल तर माणसाने प्रेम करावं. कारण प्रेमात आणि मरणात ‘स्व’ उरत नाही.' राधेने श्रीकृष्णावर असच प्रेम केलं असेल का.? 'राधा-कृष्णा'च्या या अनोख्या प्रेमाबद्दल कुणाला आणखी काही ठाऊक असेल किंवा वाचनात आले असेल तर नक्की 'शेअर' करा.

     
     मला सापडलेल्या या लेखाचे मुळ लेखक कोण ते आता आठवत नाही. मात्र वाचकांसाठी हा लेख इथे ‘कॉपी-पेस्ट’ केला आहे. जसाच्या तसा..

     श्रीकृष्णाचा विचार राधेवाचून करता येत नाही. आणि राधेचाही विचार श्रीकृष्णावाचून करता येत नाही. राधा म्हटली कि श्रीकृष्ण आलाच आणि श्रीकृष्ण म्हटला कि राधा आलीच. भारतीयांच्या मनामनात राधा श्रीकृष्णासमवेत मोठ्या मानाने वावरते आहे. त्याच्या सोबतीने विहार करण्याचे भाग्य तिला लाभलेले आहे. कृष्णासमवेत ती सावलीसारखी उभी आहे. ती खरी भाग्यशाली आहे. कारण ते भाग्य रुक्मिणीला नाही. त्याची धर्मपत्नी असूनसुद्धा.
     ‘राधा श्रीकृष्णाची कोण’ हा प्रश्न आतापर्यंत अनेक विचारवंतांना पडलेला आहे. तिच कृष्णाशी नातं कोणतं ? माता ? प्रेयसी ? भगिनी ? भार्या ? कि सखी ? तिच नाव कृष्णाशी जोडले गेले आहे ते कृष्णावरील अनन्य अशा भक्तीभावामुळे. म्हणूनच ‘राधा-कृष्णा'ची जोडी अजोड आहे. ‘राधा-कृष्ण’ एकच आहेत, राधा हे कृष्णाचच स्रीरूप आहे व कृष्णच राधेचं पुरुषरूप आहे’, अशा आख्यायिका ऐकायला मिळतात.
     राधा-कृष्णाच्या प्रीतीचा वसंत एकदाच आला आणि गेला. पण काहीतरी सतत धमधमते-फुलते मागे ठेऊन गेला. भारतीय पातिव्रत्याच्या कडकडीत सोवळेपणाला कायमचे आव्हान देत, राधेने एकनिष्ठ प्रीतीचे, चांदण्यांनी पूर्ण भरलेले, रंगलेले पूर्ण सौंदर्य उघडे केले. प्रीतीचा लालभडक रंग राधेमुळे सौम्य निळा, रुपेरी झाला. या निळ्या प्रीतीला सामावून घेताना कृष्णाचे व्यक्तिमत्व आकाशाएवढे विस्तारले. रात्रीप्रमाणे ते अतीव मृदू व गुढ झाले. राधा-कृष्णाच्या प्रीतीमुळे भारतीय प्रीतीकथेला नवा कोवळेपणा आला. संसारी भाराने कधीही शिळा न होणारा भाव तिला मिळाला. प्रीतीच्या परिपुर्तीला चिरतारुण्य अपेक्षित असते. ते साधण्यासाठीच या आदर्श प्रेमिकेने जणू श्रीकृष्णाच्या विरहाने स्वतःला बांधून घेतले.
     या राधेला कृष्णावाचून काही सुचतच नाही. मोरमुकुटधारी, दीड पायावर उभा राहणारा ‘वेणुधर’ म्हणजे तिचं सर्वस्व. त्याच्या ध्यासात, त्याच्या श्वासात झोकून देण एवढच तिला ठाऊक. ज्याच्यात आपण गुंतत आहोत, त्याच्याशी आपलं काय नातं असा प्रश्न कधी तिला पडला नाही. नव्हे, तिच्या दृष्टीने तो गौण होता. राधा कृष्णापेक्षा वयाने मोठी होती. तथापि वयाचा हा अडसर त्यांच्या प्रीतीच्या आड कधीच आला नाही. लोकापवादाची पर्वा तिने कधीच केली नाही. कृष्णाशी एकरूप होण, त्याच्यात आपलं अस्तित्व विरघळून टाकण, एवढच तिला ठाऊक. तेच तिच्या जीवनाचं उद्दिष्ट होत.
     राधेला 'रासेश्वरी' अस म्हटलं जात ते खरच आहे. राधेसारख कुणी नाचलं नाही. 'तिच्यासारखा नाच अद्याप कुणाला जमला नाही', अस म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कृष्ण ‘खेळिया’ खरा पण खेळता-खेळता तोच तिच्या हातचं खेळणे बनला आणि पुढे तर तिच्या चरणाचा दास झाला. ‘तुझ्यावाचून तरीही अर्धा’ अशी स्पष्ट कबुलीच दिली त्याने तिला. म्हणूनच ‘बिन राधा, कृष्ण आधा’ अस म्हणतात.
    राधा म्हणजे अविरत प्रेमाची धारा. प्रीतीच्या या धारेत विषयवासनेला थारा नाही. या धारेला रोखण कुणालाही शक्य झालं नाही. पुढे वाहते ती धारा आणि विषयवासनेकडून उलट फिरते ती राधा. तथापि राधा हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होऊन बसलं. परंपरेने कृष्णाला द्रौपदीशी जखडून टाकलं आणि व्यावहारिक नीतीची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. पण पुढे पुराणात राधा आली आणि तिने हे सारे बांध फोडले. वय, विवाहबंधन काही काहीच त्यांच्या प्रीतीला अडवू शकले नाही. अति मृदू आणि अति दृढ अस ते 'सखा-सखी'चं नातं होतं. हे नातं हीच प्रेमाची अंतिम आणि असीम अवस्था होतं. उभयंताच्या प्रेमात आडकाठी निर्माण करणारी अनेक कारणे होती. कृष्णेशी संबंध आला तेंव्हा कृष्णाची वृत्ती अनावर झालेली नव्हती. तिच्याशी असलेले त्याचे नाते त्याच्या दृष्टीने सहज आणि अंतिम स्वरूपाचे होते. त्याच्यापुढे त्याला जायचेच नव्हते.
     राधा कृष्णाची कथा ‘रोमिओ-ज्युलियट’, ‘लैला-मजनू’ यांच्या प्रीतीकथेहून सर्वस्वी वेगळी आहे. समाजाचा विरोध होऊन वा कालांतराने मावळून एकतर त्याचं मिलन झालेलं आहे किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे. राधा-कृष्णाच्या प्रीतीत अस काहीच घडण असंभवनीय होत. कारण राधेचं आधीच लग्न झालेलं होत. रायाण-गोपाशी-अनयाशी. त्यामुळे कृष्णाशी आपण विवाहबध्द होऊ शकणार नाही, याची तिला मनोमन कल्पना असावी. कृष्णाशी विवाह करण्यास समाजाने विरोध केला असता तरी तिने तो मानला नसता. परंतु तिचे कृष्णाबरोबरचे संबंध हे ‘सखा-सखी’ पातळीवरचे होते. आणि तिला देखील त्यापुढे जायचे नव्हते. त्यामुळेच तिने आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला नाही.
     आणि राधेने आत्महत्या तरी का करावी ? कृष्णाशी विवाहबध्द होता येत नाही, याबद्दल तिला अतीव दुखः झालं असेल. पण तिने ते अनावर होऊ दिले नाही. अपेक्षाभंगाचं दुख: पचवायला फार मोठ मनोबल लागतं. अशा मनोबलाच्या अभावी ज्यांना जीवन जगण कठीण वाटतं, तेच आत्महत्या करण्याची पळवाट शोधतात. आत्महत्या हे नैराश्य आणि वैफल्यग्रस्त परिस्थितीचं द्योतक आहे.
     कृष्ण मथुरेला गेल्यावर तो परत येण्याची शक्यता नाही, याची तिला पूर्ण कल्पना होती. तरी तो परत येईल, या आशेवर ती त्याची प्रतीक्षा करीत राहिली. पण अश्रू ढाळीत बसली नाही. त्याच्या स्मृतीत जेवढ म्हणून मग्न राहता येईल तेवढ मग्न राहिली. एखाद्याच्या आठवणीत आत्ममग्न असण, हा निरंतर चालणारा प्रवास असतो. त्यातून मिळणारा आनंद अलौकिक असतो. त्यात दुरावलेपनाची भावना असली तरी ती सुसह्य असते.