त्याचे उत्तर ऐकून मी विस्मयचकित झालो. मनोमन त्या मित्राला हात जोडले. त्याच्या दृष्टीने यात विशेष असे काही नसेलही. पण त्या युवतीसाठी मात्र ‘तो देवच होता ना.? तिची भाषा समजून घेणारा सहप्रवासीही नगरचाच होता. कपड्यांचा व्यापारी असल्यामुळे त्याची भारतभर भ्रमंती असते. त्यामुळे त्याला बंगाली भाषा समजत होती. या जागरूक सहप्रवाशांमुळेच तर त्या युवतीची खरी सुटका झाली. नाहीतर बिचारी अबला कुठल्या नरकात ढकलली जाणार होती कुणास ठाऊक...?




    कुठलीही ओळख-पाळख नसताना, कसलेही देणे-घेणे नसताना, खोल गर्तेत बुडणाऱ्याला सहजपणे मदतीचा हात देऊन त्याचा जीव वाचविणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल.?
     देवदूत.? मित्र.कि आणखी काही..तुम्ही काहीही म्हणा. पण ज्याव्यक्तीचा जीव वाचला तीमात्र मदतीचा हात देणाऱ्याला प्रत्यक्ष भगवंतच मानेल. आणि या सगळ्या कृतीचे (म्हणजे एखाद्याचा जीव वाचविण्याचे) श्रेय जर कुणी तिसराच लाटायला पाहत असेल तर 'त्याला' तुम्ही काय म्हणाल.असो त्याला देखील तुम्ही काहीही म्हणा, पण काल घडलेल्या या चमकोगिरीप्रकरणाची सविस्तर हकीकत ऐकलीत तर तुम्ही देखील अचंबित व्हाल..
     त्याचे झाले असे, कि एका वर्तमानपत्रात काम करणारा माझा एक मित्र नेहेमीप्रमाणे नगरला येण्यासाठी रेल्वेने निघाला. श्रीरामपूरहून आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये तो बसला. रेल्वेच्या डब्यात त्याच्यासोबत काही सहप्रवासी देखील होते. रेल्वे सुरु झाली आणि काही वेळाने समोरच्या बाकावर बसलेली एक युवती हेल्प हेल्पम्हणून रडायला लागली. तिच्यासोबत असेलल्या ४० वर्षांच्या इसमाने तिला गप्पबसायला सांगितले. तशी ती आणखीनच रडायला लागली.
     असे बराच वेळ चालल्यानंतर माझ्या त्या मित्राने युवतीसोबत असलेल्या इसमाकडे चौकशी केली. पण नेमका काय प्रकार आहे ते काही केल्या लक्षात येईना. म्हणून माझ्या मित्राने त्या युवतीलाच रडण्याचे कारण विचारले. पण दुर्दैव असे कि तिला मराठी, हिंदी अन इंग्रजी या भाषा येत नव्हत्या. ती बहुधा बंगालीतून बोलत असावी असे माझ्या मित्राने मनाशी ताडले. बराच वेळापासून चाललेला हा प्रकार पाहून दाल में कुच कलाअसल्याचे त्याच्या लक्षात आले. एव्हाना त्या मुलीने रडून रडून अख्खा रेल्वेचा डबा डोक्यावर घेतला होता. तिचा आवाज ऐकून काही सहप्रवासी गोळा झाले. त्यापैकी एकाला बंगाली भाषा अवगत होती. त्याने त्याभेदरलेल्या युवतीशी संवाद साधला. त्यातून मग जो प्रकार सर्वांना कळला तो अक्षरशः धक्कादायकहोता.
   आपल्या सोबत असलेली व्यक्ती आपल्याला पुण्याला वाममार्गाला लावण्यासाठी घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. आपण मुळचे बांगलादेशी असून एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात फसवून आपल्याला कोलकात्याला आणले. तिथे या (सोबत असलेल्या) इसमाच्या ताब्यात देऊन पुण्यातील एका आंटीकडे पोचवायला सांगितले. असे सांगून ती युवती परत रडायला लागली.
     सहप्रवाशांनी त्या इसमाकडे याबाबत विचारणा केली असता तो गोंधळून गेला. सुरुवातीला त्याने उलटसुलट उत्तरे देऊन प्रवाशांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला, परंतु नंतर मात्र तो पोपटासारखा बोलू लागला. आपण फक्तदलाल आहोत आणि या मुलीला कोलकात्याहून पुण्याला पोचवायची जबाबदारी आपल्यावर आहे. पान खाल्लेली एक जाडजूड आंटीरेल्वे स्टेशनवर येईल. तिच्याकडून नोटांनी भरलेली सुटकेस घ्यायची आणि मुलीला तिच्या हवाली करायचे, एवढेच आपल्याला माहित आहे, असे त्याने सांगितले.
     एकूणच सगळ्या प्रकारची कल्पना सहप्रवाशांना आली. त्यांनी त्या मुलीला धीर देत तिच्यासोबतच्या इसमाला चांगलाच बदडून काढला. काहींनी त्याच्या जवळचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो स्वीच ऑफ केला. या मार्गावरून रोजच प्रवास करीत असल्यामुळे माझ्या मित्राकडे आरपीएफ पोलिसांचेदूरध्वनी क्रमांक होते. त्याने या सगळ्या प्रकारची माहिती आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक बैनिप्रसाद मीना यांना दिली. त्यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आपल्या पथकासह नगरच्या रेल्वे स्टेशनवर सापळा रचला.
     दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आझाद हिंद एक्सप्रेसस्टेशनवर आली आणि प्रवाशांनी त्या दलालइसमाला मुलीसह आरपीएफ पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनीही त्या दलालाला चांगलाच खाक्या दाखविला. तोपर्यंत उपनिरीक्षक मीना यांनी या घटनेची माहिती नगरच्या पोलीस अधीक्षकांना दिली होती. त्यांच्या विशेष पथकातील एक महिला उपनिरीक्षक देखील सहकार्यांसह घटनास्थळी येऊन ठेपल्या. मग आरपीएफ पोलिसांनी दलाल व युवतीसोबत असलेल्या सहप्रवाशांचे जाबजबाब घेतले. आणि युवतीची सुटका करून दलालाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
     एव्हाना नगरमधील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील हि घटना समजलेली होती. त्यांनीही घटनास्थळी गर्दी केली. मीदेखील गेलो. तोवर माझा मित्र त्याच्या ऑफिसमध्ये पोचलासुद्धा होता. मी त्याला फोन केला असता जणू काहीच विशेष घडले नाहीय, असा तो बोलला. मी त्याला त्याने किती मोठे पुंण्याचे काम केले’, याची कल्पना दिली. त्यावर तो कमालीच्या थंडपणे उत्तरला कि, ‘काही नाही रे, त्या असहाय्य युवतीच्या जागी माझ्या ओळखीची एखादी कोणी असती तरी मी हेच केले असते ना.? मग त्यात काय आहे एवढे.? तुला तर माहीतच आहे, माझा हा रोजचा प्रवास आहे. खूप अनुभव येतात. त्यामुळे खरेच यामध्ये विशेष असे काहीच नाही.'
     मी कमालीचा विस्मयचकित झालो. मनोमन त्याला हात जोडले. त्या मित्राच्या दृष्टीने यात विशेषअसे काही नसेलही. पण त्या युवतीसाठी मात्र तोदेवच होता ना.? तिची भाषा समजून घेणारा दुसरा सहप्रवासी नगरचाच होता. कपड्यांचा व्यापारी असल्यामुळे त्याची भारतभर भ्रमंती असते. त्यामुळे त्याला बंगाली भाषा अवगत होती. या जागरूक सहप्रवाशांमुळेच तर त्या युवतीची खरी सुटका झाली. नाहीतर ति बिचारी अबला कुठल्या नरकात ढकलली जाणार होती कुणास ठाऊक...असो.
     एव्हाना नगरच्या पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून तिथल्या रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. सायंकाळी उशिरा पुन्हा माहिती घेतली असता ती आंटीकाही मिळाली नाही, असे उत्तर मिळाले. ते तर अपेक्षितच होते म्हणा. कारण दलालाचा मोबाईल स्वीच ऑफ झाल्यावर काय समजायचे ते ती समजली असेलच ना.?
     सायंकाळी मात्र एक अनपेक्षित घटना घडली. काही दिवसांपूर्वी मी क्राइम बीटची जबाबदारी बघत होतो. म्हणून एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मला फोन आला. खूप दिवसांनी फोन आला म्हणून मी आधी थोडा चकित झालो. मग फोन रिसिव्ह करताच त्यांनी दुपारचीचघटना ठळक बातम्या सांगतात तशी मला सांगितली. अगदी त्यांच्या नेहेमीच्याच शैलीत. म्हणजे अगदी बातमीच्या इंट्रोसहित. ती अशी, ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथकातील पोलिसांनी एका बांगलादेशी युवतीची आज सुटका केली.
     मी म्हणालो, ‘ओके. पुढे.?’
    सदर कारवाई रेल्वे पोलिसांच्या मदतीने केल्याचे ते सांगतील, असे उत्तर मला त्यांच्याकडून अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. फक्त दलालाला अटक केल्याचे त्यांनी सांगितले. मग मीच विचारले कि पुण्यात सापळा रचला होता ना.?’ त्यावर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. मी 'बातमी घेतो' असे सांगून फोन ठेवला..!
     असो, तर या गुन्ह्याचा तपास यथावकाश पुढे होईलच. तशी हि घटना काही अगदीच नवीन नाही. पुण्या-मुंबईत तर अशा कितीतरी मुलींची कुंटणखाण्यात  विक्री होते. त्या घटनांचा तपास जसा होतो, तसेच 'यागुन्ह्याचेहि होईल, यात शंका नाही. कदाचित लाल फितीतून सुटका झाल्यावर ती मुलगी तिच्या घरी पोचेलही. पण या घटनेतून एक नवा अनुभव मात्र वाट्याला आला.
     वाममार्गाच्या खोल गर्तेत बुडणाऱ्या मुलीची सुटका करूनही काहीच विशेषकेले नसल्याचे सांगणारा 'तो' मित्र कुठे ? आणि चमकोगिरीकरीत त्या घटनेचे श्रेय लाटणारे हे 'खाकी वर्दी'तले अधिकारी कुठे.त्यांनी श्रेय घ्यावे किंवा नाही, हा मुद्दा आता सोडू. पण निदान या गुन्ह्याचा पुढील तपास व्यवस्थित व्हावा, त्या 'आंटी'सह इतर आरोपिंनाही अटक व्हावी. त्या आरोपिंना कठोर शिक्षा झाली तर तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच त्याचे श्रेय जाईलच ना.? मग आताच हा 'अट्टाहास' कशासाठी.