तुझे डोळा माझी दृष्टी


     नियतीने त्यांच्या आयुष्यात भरभरून फक्त अंधारच दिला असला म्हणून काय झाले.? परंतु जन्माची जोडीदार म्हणून लाभलेल्या त्या दोघींनी मात्र आपल्या अंध पतीराजांच्या आयुष्यात प्रकाशाचा कवडसा निर्माण केला आहे. ही कहाणी आहे पल्लवी गोरख दरंदले व आशा शाम कोकणे या दोघींची. अंध जोडीदारासोबत सुखाचा संसार करून समाजातील डोळस असलेल्यांपुढे एक वेगळा आदर्श या दोघींनी उभा केला आहे.

    पल्लवीचे माहेर नाशिकचे. घरात आई-वडील व एक भाऊ. पल्लवीचे शिक्षण जेमतेमच. लग्नाचे वय झाल्यानंतर आई-वडिलांनी मुलगा पाहायला सुरुवात केली. परंतु पल्लवी उजव्या हाताने अपंग असल्याने तिचे लग्न लौकर जमेना. म्हणून नात्यातल्याच एकाने नगर जिल्ह्यातील (लांडेवाडी, सोनई, ता. नेवासा) गोरख दरंदलेचे स्थळ सुचविले. मुलगा अपंग (अंध) असला तरी स्वत:च्या पायावर उभा आहे, एवढे पुष्कळ होते. सन २००६ मध्ये गोरख अन् पल्लवीचे लग्न झाले.
    गोरखच्या घरात आई-वडील व एक भाऊ. गोरखला वयाच्या ८ व्या वर्षी अंधत्व आले. परंतु त्याला जन्माची जोडीदार म्हणून लाभलेल्या पल्लवीने त्याचा संसार नेटाने सावरलाय. लग्नानंतर दोघांच्या संसारवेलीवर एक फुलही उमलले. मुलगा केतन आपल्यासारखा अपंग नाही, याचा दोघांना कोण आनंद. पल्लवीच्या येण्याने माझ्या आयुष्यात प्रकाश आला, असे गोरख सांगतो. गोरख सध्या ‘साईबन’मध्ये रोपे तयार करण्याचे काम करतोय. अंध सेवा मंडळाच्या सदस्यांसाठीही त्याची धडपड सुरु असते. पल्लवीनेही साईबन मध्ये मोलमजुरीचे काम केले. संसार टिकविण्यासाठी काडी-काडी जमविली. वृध्द सासूलादेखील आता ती सांभाळतेय. गोरखचा भाऊ गावाकडे टपरी चालवीत असला तरी त्याचा मुलगा यांच्याकडेच शिक्षणासाठी राहतोय.
     डोळस मुलींनी अंधांसोबत लग्न करायची तयारी दर्शविली पाहिजे, कारण अंध देखील संधी मिळाली तर आयुष्यात यशस्वी होऊ शकतात, असे पल्लवीला वाटते. तर धर्मपत्नी म्हणून घरात आलेली पल्लवीच आता माझी दृष्टी झाली आहे, असे गोरख सांगतो.
    आशाची कहाणीदेखील काहीशी अशीच. तिचे माहेर औरंगाबादचे (वाळुंज एमआयडीसी) शिक्षण आठवीपर्यंत. लग्नाचे वय झाल्यानंतर तिच्या मामांनी नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील निवडूंगा येथील शाम गोविंद कोकणे याचे स्थळ आणले. मुलाचे घरदार चांगले असून तो एका शाळेत शिपाई म्हणून नोकरीला आहे, असे मामांनी सांगितले. त्यामुळे आशा लग्नाला तयार झाली. परंतु लग्नाची तारीख जवळ आल्यानंतर तिला कळले कि नव-या मुलाला दिसायला थोडे कमी आहे. त्यामुळे आशाने सुरुवातीला या लग्नाला नकार दिला. परंतु तुझ्या नशिबात अंधच असेल तर कशाला नाही म्हणतेस, अशी समजूत तिच्या घरच्यांनी काढली. म्हणून ती लग्नाला तयार झाली. अन् २०० मध्ये त्यांचा विवाह झाला.
     शामच्या घरात आई-वडील, भाऊ अन् बहिण असा परिवार. लग्नानंतर वर्षभराने श्यामची दृष्टी अजूनच कमजोर झाली. त्यात शामचा स्वभाव चिडचिडा असल्यामुळे त्याचे आशासोबत खटके उडू लागले. भांडणाला कंटाळून आशा माहेरी निघून गेली. शामच्या चिडचिड्या स्वभावामुळे त्याचे आता घरच्यांसोबत देखील वाद होऊ लागले. हे वाद विकोपाला जाऊन एकदा घरच्यांनी शामला मारहाण केली. मग शामने आशाला फोन करून ‘माझ्यासाठी परत ये, यापुढे तुझ्यासोबत भांडणार नाही’ अशी विनवणी केली. आणि मग आशा पुन्हा सासरी आली. पण घरातल्या कुरबुरींमुळे थोड्या दिवसांतच त्यांना वेगळे होऊन बाहेर पडावे लागले.
‘प्रेमाची स्वामिनी तू दास्य नव्हे ते,
सेवेचे प्रकट रूप उघड विरहते,
मानबिंदू तोच तुझा सावर दोरी,
महिला तू माता तू आदिम शक्ती’
     या पद्यपंक्तीप्रमाणेच आशाने शामच्या संसाराची दोरी सावरली. अजूनही कधी-कधी त्यांच्यात वाद होतात. पण आता अंध सेवा मंडळाच्या अध्यक्षा कमलाताई आपटे व संभाजी भोर त्यांना वडिलकीच्या नात्याने समजावतात.
     माणूस दृष्टीहीन किंवा अपंग असला तरी समाजाने मात्र त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. त्यामुळे ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात, असा विश्वास पल्लवी दरंदले व आशा कोकणे यांनी व्यक्त केला आहे. आजकाल मुली अपंग, अंध मुलांची स्थळे नाकारतात, हे योग्य नाही. अंध व्यक्तीही माणूसच असते. असा संदेश जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पल्लवी व आशा यांनी आजकालच्या युवतींना दिला आहे. या दोघींच्याही संसाराचा प्रवास समाजातील डोळस व्यक्तींच्या दृष्टीने ‘दीपस्तंभा’सारखा आहे.
    दृष्टीहीन व्यक्तींना समाजात उभे राहताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु आमच्या पत्नीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सुख-दुखा:त साथ देत जगण्याचे बळ त्यांनी आम्हाला दिलं अन् आमच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाशाचा कवडसा निर्माण केला. अशी पत्नी मिळायला जन्मोजन्मीचं भाग्य लागतं, असे गोरख अन् शाम सांगतात.

(ही स्टोरी 'जागतिक महिला दिना'निमित्त दि. ८ मार्च २०१२ रोजी 'दिव्य मराठी'मध्ये प्रसिद्ध झालेली आहे.)
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या