कॉन्फिडन्स हो तो ‘नत्थु’ जैसा


     ‘आपले शरीर हे पंचमहाभुतांनी बनलेले असून आयुष्य हे क्षणभंगुर आहे. त्यामुळे मृत्युची मला अजिबात फिकीर नाही. कधीतरी हा देह मातीतच मिसळणार आहे. पण बुद्धीबळामुळे कॅन्सरविरुध्द लढण्याची जिद्द मला मिळाली. या खेळामुळे संयम, एकाग्रता व सकारात्मक विचार हे गुण आता अंगी बाणले आहेत. आयुष्यात येणाऱ्या किरकोळ अपयशामुळे हताश होणाऱ्या तरुण पिढीने बेहोश होऊन बुद्धिबळ खेळावे, मगच त्यांना लढण्यातला आनंद कळेल’


     गेल्या महिन्यात नगरमध्ये राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे वार्तांकन करण्यासाठी गेलो असता एक ‘वल्ली’ मला भेटली. ‘नत्थु बाबुराव सोमवंशी’ असे त्या ‘व्यक्ती’चे नाव. स्पर्धेच्या उद्घाटनाला थोडा वेळ होता, म्हणून मी सभागृहाबाहेर एका बाकावर बसलो होतो. हे सोमवंशी देखील माझ्या शेजारीच बसलेले होते. स्पर्धेसाठी येणारे बरेच जण त्यांच्या जवळ येत आणि खुशाली विचारत. मी सहज सोमवंशी (हे नाव नंतर संभाषण झाल्यावर मला समजले) यांच्याकडे नजर टाकली. व्यक्ती तशी सर्वसाधारणच. डोक्यावरचे केस पांढरे झालेले अन् चेहरा सुरकुतलेला. मात्र समोरच्या व्यक्तीने तब्येतीची ख्यालीखुशाली विचारली कि त्यावर स्मितहास्य उमटे. त्यावरून अंदाज आला कि हे महाशय बुद्धिबळ स्पर्धेत नेहेमी सहभागी होत असावेत. आणि त्यांचे वय पाहता सगळेजण त्यांची आदराने चौकशी करत असावेत. त्यांनी माझाकडे पाहून देखील स्मितहास्य केले आणि गप्पांना सुरुवात झाली.
     सोमवंशी यांचे एक मित्रही आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नगरमध्ये आलेल्या ‘नत्थु बाबुराव सोमवंशी’ यांचा एक व्यक्ती ते बुद्धिबळपटू म्हणून आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला तोंड देत वयाच्या ५२ व्या वर्षीही बुद्धीबळाच्या पटाशी अतूट नाते जोपासणा-या सोमवंशी यांची जगण्याची जिद्द माझ्यासाठी एक औत्सुक्य ठरले आहे. त्यांच्याकडे पाहून आजूबाजूच्या लोकांनाही जीवन कसे जगावे याचा गुरुमंत्र मिळत आहे. त्यामुळे त्यांना भेटणारा प्रत्येकजण ‘कॉन्फिडन्स हो तो नत्थु जैसा, नही तो ना हो’ असे म्हणताना दिसतो.
     सोमवंशी यांचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील बाळद (ता. पाचोरा). अकरावीत असल्यापासून त्यांना बुद्धिबळाची प्रचंड आवड आहे. सन १९७६ सालापासून ते सातत्याने बुद्धिबळ खेळतात. सध्या त्यांचे आंतरराष्ट्रीय मानांकन १५५५ असे आहे. स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षणाची पदवी घेऊन ते सध्या औरंगाबाद येथील जलविज्ञान प्रकल्प विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत आहेत. लहानपणी आई-वडिलांनी मोलमजुरी करून सोमवंशी भावंडांना शिकविले. बुद्धिमत्ता तल्लख असल्यामुळे इयत्ता चौथी ते सातवीपर्यंतच्या परीक्षेत ते तालुक्यात पाहिले आले. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तर थेट गुणवत्ता यादीत झळकले. या गुणांच्या आधारावर त्यांना औरंगाबादला अकरावीमध्ये प्रवेश मिळाला. औरंगाबादला ते संत तुकाराम मागासवर्गीय वसतिगृहात राहिले. अकरावी सायन्समध्ये असताच त्यांचे मन बुद्धिबळ खेळाकडे आकर्षित झाले. मग औरंगाबादेतील वरिष्ठ बुद्धीबळपटू पोपटभाई पटेल यांच्याकडे त्यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यानंतर विविध स्पर्धांतून खेळायला सुरुवात केली.
     नत्थु सोमवंशी यांची मोठी मुलगी एम. डी. रेडिओलॉजिष्ट व छोटी मुलगी एम.बी.बी.एस. आहे. तर मुलगा एम. डी. रेडिओलॉजिष्ट च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. नोकरीच्या निमित्ताने माजलगाव, बीड, लातूर, औरंगाबाद येथे ते राहिले. घर व नोकरी सांभाळून बुद्धिबळाचा छंद त्यांनी मनापासून जोपासला. बारावीच्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व गणिताच्या विनामूल्य शिकवण्या दिल्या. त्यांच्याकडे शिकवणी घेतलेले कितीतरी विद्यार्थी आज डॉक्टर-इंजिनिअर आहेत. पण याचा जरादेखील गर्व सोमवंशी यांना नाही. ज्ञान हे दिल्यामुळेच वाढते, असे ते म्हणतात. गेल्या वर्षी पोटदुखीचा त्रास झाल्याने सोमवंशी यांना दवाखान्यात जावे लागले. डॉक्टरांनी त्यांच्या पोटातील मोठ्या आतड्याला कॅन्सर असल्याचे निदान केले. २२ ऑक्टोबर २०११ या दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेंव्हापासून आतापर्यंत त्यांच्यावर २८ वेळा रेडिएशन व ११ वेळा केमोथेरपी करण्यात आली आहे. मात्र डोक्यावरचे केस गळणे तर सोडाच, हा कॅन्सर माझा केसदेखील वाकडा करू शकणार नाही, असा ठाम विश्वास सोमवंशी बोलून दाखवितात.
     बुद्धिबळाशिवाय वाचनाची त्यांना अफाट आवड आहे. आतापर्यंत ४ हजार पुस्तके त्यांनी वाचली आहेत. त्यापैकी मक्झीम गॉर्कीचे ‘आई’, सलमान रश्दी यांचे ‘स्याटनिक व्हर्सेस’, तस्लिमा नसरीन यांचे ‘लज्जा’ ही पुस्तके त्यांना विशेष आवडली आहेत. ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या पुस्तकामुळे सकारात्मक विचार आपल्यात मुरले, अशी प्रांजळ कबुली ते देतात. अनेकदा इच्छा असूनही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑफिसमधून त्यांना सुट्टी मिळत नाही, मात्र विद्यार्थ्यांना व शेजारच्या मुलांना बुद्धिबळाचे डाव शिकवण्यात ते तासनतास रमतात. ‘आपले शरीर हे पंचमहाभुतांनी बनलेले असून आयुष्य हे क्षणभंगुर आहे. त्यामुळे मृत्युची मला अजिबात फिकीर नाही. कधीतरी हा देह मातीतच मिसळणार आहे. पण बुद्धीबळामुळे मला कॅन्सरविरुध्द लढण्याची जिद्द मला मिळाली. या खेळामुळे संयम, एकाग्रता व सकारात्मक विचार हे गुण आता अंगी बाणले आहेत. आयुष्यात येणाऱ्या किरकोळ अपयशामुळे हताश होणाऱ्या तरुण पिढीने बेहोश होऊन बुद्धिबळ खेळावे, मगच त्यांना लढण्यातला आनंद कळेल’ असे सोमवंशी सांगतात.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. महेश भाऊ मस्त लेख आहे खूप आवडला मला ......
    असेच लेख लिहीत जा .............
    शुभेच्छा ....
    केदार भोपे...

    उत्तर द्याहटवा
  2. अरे व्वा दौलतराव. ब्लॉग विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. छान आहे ब्लॉग. ब्लॉगवरील आगामी लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  3. खेळातून त्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली व हा लेख वाचून
    खूप बरे वाटले.

    उत्तर द्याहटवा