'खाकी वर्दी' असुरक्षित ?

    'कानून के हाथ' बहोत लंबे होते है, इन हाथोंसे मुजरीम कभी बच नही सकता, असे डायलॉग मी लहानपणी चित्रपटात ऐकले होते. लहानपणापासून 'खाकी वर्दी'चे कुतूहल असल्याने ते मनावर कोरले गेलेले आहेत. पण कालच्या घटनेने मात्र माझ्या या समजुतीला तडा गेला. कोण कुठला एक राजकीय कार्यकर्ता येतो काय आणि पोलीस ठाण्याच्या आवारात सर्वांसमक्ष एका कॉन्स्टेबलला धमकावतो काय. हे सगळे पाहून मला आपण नगरमध्ये आहोत कि ‘युपी-बिहार’मध्ये? असा प्रश्न पडला. एकूणच या घटनेतून पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसच सुरक्षित नसल्याचे अधोरेखित झाले. कॉन्स्टेबलला धमकावणाऱ्या 'त्या' मुजोर कार्यकर्त्यावर जी कारवाई व्हायची ती होईलच. पण किमान सध्या सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या पोलिसांची 'प्रतिमा' जपण्याचे काम होईल कि नाही ?

    ‘लॉकअपमधील आरोपींना भेटायला आलेल्या राजकीय पक्षाच्या एका युवक कार्यकर्त्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच एका कॉन्स्टेबला धमकावले. हा प्रकार बुधवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. ‘अंगावरील वर्दी काढ, आणि समोर ये, मग तुला दाखवतो’ असे खुले आव्हान त्या मुजोर कार्यकर्त्याने पोलिसाला दिले. वरून तेथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला उपदेशाचे डोस पाजले. त्या अधिकाऱ्याने मात्र या कार्यकर्त्याला निव्वळ शांत राहण्याची विनंती करीत या प्रकरणावर पडदा पाडला.
   त्याचे झाले असे, पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच पोलिसांची सुमो गाडी उभी होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक वरिष्ठ दर्जाचे अधिकारी न्यायालयीन कामकाजासाठी एका पोलीस कॉन्स्टेबल आणि वाहनचालकासोबत निघाले. चालक सुमोत बसून गाडी रिव्हर्स घेत होता. तितक्यात एक पांढ-या रंगाची मारुती स्विफ्ट कार पोलीस ठाण्याच्या आवारात शिरली आणि सुमोच्या एकदम पाठीमागे येऊन उभी राहिली. त्यामुळे सुमोचालकाला गाडी मागे घेता येईना. म्हणून सुमोत बसलेल्या पोलिस कॉन्स्टेबलने खाली उतरून ‘स्विफ्ट’च्या चालकाला कार मागे घ्यायला सांगितली. पण त्याने कार मागे घेतली नाही. त्या पोलिसाने पुन्हा एकदा कार मागे घ्यायला सागितले. तरीही कार जागची हलली नाही.
   त्यामुळे त्या पोलिसाने पुन्हा एकदा (यावेळी जरबेच्या आवाजात) कार मागे घ्यायला सांगितली. पोलिसाला चिडलेले पाहून कारचा चालकही तावातावाने बाहेर आला. सफेद खादीचे कपडे घातलेला हा चालक एका प्रादेशिक पक्षाचा युवक कार्यकर्ता (याचे काही अवैध धंदे असल्याचेही समजते) आहे. कार मागे घ्यायला सांगणाऱ्या पोलिसावर तो युवक कार्यकर्ता चिडला. ‘मला ओळखले नाहीस का? पोलीस ठाण्यात येना-या सर्वसामान्य माणसांना अशी वागणूक देतात का? तुला कायदा कळतो का?’ असे म्हणत आवाज वाढविला. त्यावर त्या पोलिसाने ‘तुला फक्त गाडी मागे घ्यायला सांगितली, एवढे चिडायला काय झाले?’ असे विचारले. त्यावर चिडून तो युवक कार्यकर्ता पोलिस कॉन्स्टेबलवर धाऊन गेला. ‘मला एकेरीची भाषा वापरतोस. एवढा शहाणा झालास का? आम्ही काय पाकिस्तानातून आलोय का? कोण कुठले पोलीस, बाहेरून येतात आणि आमच्यावर रुबाब गाजवितात.’ असे म्हणत त्याने कॉन्स्टेबललाच अपशब्द सुनावले.
   एव्हाना त्या कार्यकर्त्याचा ‘आव्वाज’ ऐकून वरिष्ठ अधिकारी बाहेर आले. त्यांनी काय झाले म्हणून विचारणा केली. त्यावर पोलिस कॉन्स्टेबलने मी त्याला गाडी मागे घ्यायला सांगितले असा खुलासा केला. त्यावर तो युवक कार्यकर्ता पुन्हा भडकला. ‘अजूनही मला ओळखले नाहीस का?’ असे म्हणत ‘तुझा बक्कल नंबर सांग. मी एसपी’कडेच तक्रार करतो’ अशी धमकीवजा इशारा त्याने दिला. त्या पोलिसानेही बक्कल नंबर आणि नाव सांगत ‘काय करायचे ते कर’, असे सुनावले. त्यामुळे पुन्हा चिडून त्या कार्यकर्त्याने थेट धमकीच दिली. ‘तुला वर्दीचा माज चढलाय. एकदा ही वर्दी उतरव आणि समोर ये. मग बघू कोणात किती दम आहे ते. (वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाहून) याला एकदा माझ्या एरियात नेमणूक द्या, मग याचा बेत पाहतो’ असे धमकावले.
   आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्याला शांत करीत पोलीस कॉन्स्टेबललाच ‘गेट लॉस्ट’ असे सुनावले. त्यामुळे तो कॉन्स्टेबल गुपचूप गाडीत जाऊन बसला. नंतर त्या अधिकाऱ्याने युवा कार्यकर्त्याला गाडी मागे घेण्याची विनंती केली. मग त्या कार्यकर्त्याने ‘स्टाईल’मध्ये आपली कार मागे घेतली आणि दुसरीकडे लावली. त्याच्या कारच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजूला नंबर प्लेटच नव्हती. मागच्या बाजूला असलेल्या काचेवर भगव्या रंगातील वाघाच्या जबड्याचे चित्र मात्र होते. त्यावरून तो कोणत्या पक्षाचा असावा, याचा अंदाज येतो. मग ते वरिष्ठ अधिकारी आपल्या कामासाठी सुमोतून बाहेर निघून गेले.
   ते निघून जाताच हा युवा कार्यकर्ता विजयी अविर्भावात पोलीस ठाण्यात शिरला. सर्वांसमक्ष ‘लॉकअप’मध्ये असलेल्या त्याच्या आरोपी मित्रांना जाऊन भेटला. त्यांच्यासोबत त्याने चार-पाच मिनिटे गप्पा मारल्या. हे करीत असताना पोलीस ठाण्यात असलेल्या एकाही पोलिसाने त्याला अडविण्याचे अगर विरोध करण्याचा बाणेदारपणा दाखवला नाही. मग तो कार्यकर्ता ‘लॉकअप’मधील आरोपींना ‘घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे’ असे सांगत दिमाखात बाहेर आला. जाता-जाता गेटवर असलेल्या पोलिसांनाही त्याने उपदेशाचे डोस पाजले. ‘तुम्हाला मानवी हक्क आयोग कळतो का? कि तो देखील आम्हीच शिकवायचा? आमच्या पोरांना लौकर सोडा. त्यांचा लौकर जामीन करा’, असे सांगितले. ते पोलिस एकदम्म चिडीच्चूप.! मग ज्या ‘स्टाईल’ने हा युवा कार्यकर्ता आला, त्याच ‘स्टाईल’ने पुन्हा कारमधून निघूनही गेला.
    या घटनेत जर युवक कार्यकर्त्याला गाडी मागे घ्यायला सांगणे चुकीचे होते तर त्याला संबधित पोलिसाच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करता आली असती. परंतु तसे न करता सर्वांसमक्ष पोलिसालाच धमकावत त्याने फक्त ‘चमकोगिरी’ केली. आणि पोलीसही फक्त पाहत बसले. तोफखान्याचे निरीक्षक सध्या रजेवर आहेत. जेंव्हा हा प्रकार घडला तेंव्हा प्रभारी निरीक्षकही ठाण्यात नव्हते. त्यामुळे उपस्थित असलेल्या पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. ज्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासमोर हा प्रकार घडला, त्याने फक्त ‘त्याचे (युवक कार्यकर्त्याचे) वागणे चुकीचे होते, मात्र आम्ही शांत बसलो असे समजू नका. एकदा आमच्या टप्प्यात आल्यावर त्याला चांगला धडा शिकवू आणि वर्दीची ताकद दाखवू’ असे म्हणत सारवासारव करण्याचा पर्यंत केला.
    हे सगळे पाहून मला मात्र मी नगरमध्ये आहे कि ‘युपी-बिहार’मध्ये असा प्रश्न पडला. पोलिस ठाण्याच्या आवारात कोणीतरी कार्यकर्ता येतो काय, आणि चक्क पोलिस अधिका-यासमोर कॉन्स्टेबलला धमकावतो काय? एकूणच या घटनेतून पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसच सुरक्षित नसल्याचे अधोरेखित झाले. गुरुवारच्या वृत्तपत्रामध्ये याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. कोणाचे मत होते कि त्या कार्यकर्त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उठणे-बसणे असेल. तो पोलिसांना चिरीमिरी देत असेल... वगैरे-वगैरे. ते काहीही असो. अशा पद्धतीने पोलिस ठाण्यात येऊन 'दादागिरी' करणे चुकीचेच आहे. अलीकडेच वाचनात आले होते कि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल असलेला कायदा आणखी कडक करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिल्या आहेत.  त्या कायद्याचे काय होईल तेंव्हा होइलच. पण किमान सध्या तरी पोलिसांची 'प्रतिमा' जपण्याचे काम होईल कि नाही ? पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसच असुरक्षित असतील, तर तिथे सर्वसामान्यांचे काय सांगावे ?
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. आझाद मैदान हिंसाचार प्रकरणात पोलिसाना मारणे हा गुन्हा नसल्याचा संदेश सरकारनेच दिला आहे

    उत्तर द्याहटवा