परवा आर. के. लक्ष्मण आले होते नगरमधे. म्हणजे शहरात नाही हो. जिल्ह्यात कुठेतरी येउन गेले. हल्ली त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांचा 'कॉमन Man' आपल्याला भेटत नाही. पण ते येउन गेल्याचे पेपरात वाचले आणि झोपी गेलो. रात्री त्यांचा 'कॉमन Man'च माझ्या स्वप्नात आला. मी विचारले ''कसा आहेस रे बाबा ? सगळे काही ठीक आहे ना ?'' नेहेमीप्रमाणे सुस्कारा टाकत तो उद्गारला, ''ठीक कसले, इथे तर सगळे 'अजब'च आहे...'' मला कळेना, हा असा काय बोलतोय. मग त्यानेच हा खुलासा केला…


    १ ) गेल्या शनिवारी भर दुपारी प्रचंड गर्दीसमोर एका गुंडाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. जेथे खून झाला त्या घटनास्थळापासून पोलिस ठाणे अवघ्या २ किलोमीटर अंतरावर आहे. पण पोलिसांना घटनास्थळ गाठायला तब्बल पाऊण तास लागला. आता खून होऊन ८ दिवस झाले तरी मारेक-यांना अटक झालेली नाही. शिवाय खुनाचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तर इतके तणावग्रस्त आहे की पुन्हा टोळीयुद्ध केंव्हा भडकेल याची शाश्वती नाही. दुसरीकडे या तापलेल्या तव्यावर राजकारणी लोक आपली पोळी भाजायला टपलेले. एरवी अशा गुंडांकडून 'मलिदा' गोळा करण्यासाठी त्यांच्या मागे मागे फिरणा-या पोलिसांना आता हेच आरोपी सापडत नाहीत ?  अजब आहे.!!

   २) अलीकडेच त्याने एक 'बी' ग्रेड संघटना सोडून 'पक्ष'प्रवेश केला. आता पक्ष चालवायचा म्हणजे बक्कळ पैसा पाहिजे. मग तो कोणत्याही मार्गाने आला तरी चालेल. तसा या कामात 'हा' चांगलाच मुरलेला. तरबेज शिका-यासारखे एखादे सावज 'स्कॅण्डल' मध्ये अडकवायचे आणि मग कारवाईचा धाक दाखवून पक्षासाठी 'निधी' जमवायचा, हा याचा नित्याचा उद्योग. त्याकरिता सोबत असलेल्या 'सी' ग्रेड संघटनांना हाताशी धरायचे अन् प्रशासनावर दबाव आणायचा. पण असे किती दिवस चालणार? शेराला सव्वाशेर हा भेटतोच की कधीतरी. मग आपल्याच 'मागण्या' कुठेतरी 'रेकोर्ड' होतात आणि आपसूकपणे दुसऱ्यांना गजाआड करायला निघालेल्या 'खंडणी'बहाद्दरावर गजाआड जायची वेळ येते. पण तरीही पुन्हा 'साव' असल्याचा 'आव' आणून 'मी नाही त्यातला' म्हणायचे. अडचणीत आल्यानंतर 'बोरूबहाद्दरां'ना पाठीशी उभे राहण्यासाठी विनवण्या करायच्या. छे छे छे. !! पण मी म्हणतो, अटकपूर्व जामीन घेतलेला नसताना 'या' आरोपीचा फोन सुरु आहे. कोणत्या तरी कार्यक्रमाला त्याने जाहीर हजेरी लावल्याचा फोटो पेपरमध्ये छापून येतो. मग 'हा' (खंडणी)बहाद्दर पोलिसांना सापडत कसा नाही ?  अजब आहे.!!

     3) अहो साहेब.! सरकार तुमचे, सत्ता तुमची आणि साहजिकच 'दबंग'गिरीही तुमचीच.! तरीही असे वागता ? एकीकडे दुष्काळामुळे जनतेवर उपाशी मरायची वेळ आलीय, अन तुम्ही मात्र 'पुरस्कारांचे सोहळे' साजरे करण्यात मग्न.! अजब आहे.! काहीही म्हणा, पण 'देवस्थान'ने सुरु केलेल्या पाण्याच्या Tanker's वर जाहिरातबाजी छान केलीत हो तुम्ही. अहो, सरकार तुमचे, 'टगेगिरी' तुमची आणि तुम्ही चक्क 'गांधीगिरी' करता ? हे शोभत नाही राव. अहो तुमच्या हक्काचे पाणी मिळणारच की तुम्हाला. त्यासाठी 'टग्या'ला एक फोन फिरवला असतात तरी देखील भागले असते. पण तुम्ही जनतेसाठी (?) रस्त्यावर आलात. तुम्हालाच यावे लागणार, कारण विरोधक आहेतच कुठे तुम्हाला ? आमच्यामुळे पाणी आले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतलीत तुम्ही. वाव्वा ! तुम्हालाच आले राव हे ! आता काय तर म्हणे प्रशासनाला गांभीर्य नाही. म्हणून तुमच्याच राज्यात तुम्हीच मोर्चे काढता ?   हाहाहा अजबच आहे.!!

     ४) काय मेधाताई ? तुम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसलात म्हणे ! हो हो. कारण अजून तरी कुठल्या channel वर किंवा पेपरात ते छापून आल्याचे आम्ही पाहिले अथवा वाचलेले नाही. तसेही तुमची दखल घ्यायला त्यांना वेळ कुठे आहे म्हणा ? आम्ही आपले तुमच्याच चळवळीतील एका कार्यकर्त्याने फेसबुकवर लिहिलेले स्टेट्स वाचले. तुमच्या उपोषणाचा नववा दिवस आहे, असे म्हणत होते ते. त्या 'स्टेटस'वर पडलेला 'प्रतिक्रियांचा पाऊस'ही पहिला आम्ही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे न सगळ्यांना. मग तुम्ही, तुमचे उपोषण, तुमची चळवळ हा किती घाणेरडा प्रकार आहे, हे त्या 'पावसा'मुळे आम्हाला कळाले. आणि बरे का मेधाताई, तुम्हाला प्रसिद्धीची हाव आहे, याचा 'साक्षात्कार'ही आम्हाला याच पावसामुळे झाला. बाकी तुम्ही कशासाठी उपोषणाला बसलात, त्याची दखल अजून कोणी घेतली की नाही, याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. पण आम्ही आपले 'मत' व्यक्त करण्याचा अधिकार मात्र गाजवणार म्हणजे गाजवणार. दुसरे येतेच काय हो आम्हाला ?

खरच, हे सगळे अजबच आहे.!!