!! श्री !!





हाय एंजल ! :-)

कसा आहेस ?
खूप दिवसांनी 'पत्र' लिहितोय तुला.
असो.

    तर पत्रास कारण की, गेल्या आठवड्यात तुझे सर भेटले नगरमध्ये. अण्णांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यापासून ते इकडेच आहेत. मागच्या गुरुवारी येथे आयोजित केलेल्या एका सभेसाठी ते आले होते. त्या निमित्ताने आमच्या भेटीचा योग आला आणि मग असंख्य आठवणीनी मनात गर्दी केली…

     गम्मतच आहे ना ! म्हणजे बघ ना, आपण सुरुवातीला बोलायचो तेंव्हा तुझ्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असायचा. पण तुझे 'बॉस' असल्यामुळे आणि ते ऑफिसात असल्यामुळे आपल्याला निवांत बोलता यायचे नाही. म्हणून त्यांचा राग यायचा तेंव्हा.. कितीदा तरी त्यांना 'खडूस' म्हणायचो आपण.. नंतर 'लेक सिटी' प्रकरणामुळे त्यांचे नाव पुन्हा कानावर आले. मग एक सच्चा आणि चळवळीत काम करणारा निर्भीड, तत्वनिष्ठ माणूस म्हणून त्यांची ओळख पटली. त्यांना ओळखायला लागल्यानंतरच्या पहिल्या वाढदिवशी फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बोलण्यावरून ते सरळमार्गी असल्याची खात्री पटली. नंतर कधी 'फेसबुक'वर तर कधी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत ते दिसू लागले. मग हळूहळू नंतर त्यांच्याविषयीचे मत बदलले आणि आधी 'खडूस' वाटलेल्या सरांबद्दल नंतर आदर वाटू लागला...
     खुपदा वाटले कि त्यांना प्रत्यक्ष भेटावे. प्रथमच फोनवर बोललो तेंव्हा त्यांनीही भेटीचे निमंत्रण दिलेले. पण, तिथे येउन त्यांना भेटायचे तेव्हा टाळलेच. त्यांना भेटायला का होईना, पण हा आपल्या ऑफिसात मुद्दामून आलाय असे वाटायला नको, म्हणून मग 'परवा' पर्यंत वाट पाहत राहिलो. मध्यंतरीही त्यांचे बरेचदा नगरला येणे झाले. पण, भेटण्याचा योग आला नाही. परवा मात्र त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग जुळला. येथे झालेल्या सभेत त्यांचे प्रोत्साहित करणारे विचार ऐकले आणि त्यांच्याविषयी वाटणारा आदर आणखी दुणावला. सभा संपल्यानंतर एका स्वयंसेवी कार्यकर्त्याच्या घरी ते थोडा वेळ थांबले होते. तेथेच आमची भेट झाली.
     त्यांना पुन्हा माघारी जाण्याची घाई होती. त्यामुळे आमचा संवादही घाईघाईतच झाला. मी ओळख करून देण्यासाठी नाव सांगताच ते म्हणाले, मी ओळखतो तुम्हाला. आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मग मी तुझा मित्र असल्याचे सांगितले तेंव्हा पुन्हा काहीसे आठवल्यागत ते खुश होऊन म्हणाले, ''अर्रे हो ! बरोब्बर'' तू माझ्याबद्दल त्यांना सांगितलेले आठवले असावे बहुधा त्यांना. चालता चालताच आमचा संवाद सुरु होता. अलीकडच्या काळात ढासळत चाललेला पत्रकारितेचा दर्जा, चळवळ, अण्णांचे आन्दोलन अशा विविध विषयांना स्पर्श झाला. निरोप घेताना मी पुन्हा तुझ्याबद्दल बोललो. त्या दिवशी तुझा वाढदिवस असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, ''अर्रे हो. आंदोलनाच्या गडबडीत मी विसरूनच गेलो की. आता निघाल्यावर (तुला) फोन करतो''… मग कारमध्ये बसून ते मार्गस्थ झाले.
     ते गेले. पण मी विचारात पडलो. त्यांनी खरच तुला फोन केला असेल का? मी भेटल्याचे सांगितले असेल का? सांगितले असेल तर तुला काय वाटले असेल? माझा राग तर आला नसेल ना? असे विचार मनात आले. पण मग वाटले कि, तुझ्यामुळेच तर मी त्यांना ओळखायला लागलो ना? असो. खरे तर त्याच दिवशी तुला फोन करून हे सगळे सांगायचे होते.. हेच काय आणखी खूप काही सांगायचे असते. दोघांकडेही फोन आहेत. दोघेही रोज ऑनलाईन असतो. पण या निखळ मैत्रीच्या नात्यातही एक पुसटशी सीमारेषा आहे. ती नाही ओलांडता येत.. आणि ओलांडायची पण नाहीय… म्हणून हा 'पोस्टप्रपंच'. असो.!
    बाकी तु सांग. कसा आहेस? काय सुरु आहे? (हे तुलाच विचारायला लागणार ना रे? म्हणजे आताशा 'तो'देखील ब्लांक होतो तुझ्याबद्दल काही विचारले कि.) बर चल आता. खूप कामं आहेत, मी पळतो. काळजी घे स्वतःची. एकतर्फी का होईना, पण तुझ्याशी संवाद साधायचा एवढाच तर एक मार्ग आहे आता. त्यामुळे मी भेटेन इथेच तुला. चल बाय. काळजी घे.

तुझा मित्र,
……