दिल ढूंढता है फिर वही...

‘Thanks Sujay! you made my day spacial today !’ 
आता भेट तर होईलच. कारण खूप गप्पा मारायच्यात.. पुन्हा नऊ वर्षे मागे जाऊन ‘बॉम्बे ग्यारेज’च्या बस स्थानकावर बसायचंय... पुण्यातल्या रस्त्यांवरून त्याच्या सोबत पायी चालायचंय.. छे ! आठवणींचा स्लाईडशो संपता संपत नाहीय..


   आज ‘सुजय’ भेटला. तब्बल ९ वर्षांनी. हो. तोच ‘सुजय’. सुजय सुनील डहाके. ‘शाळा’चा दिग्दर्शक. आणखी काही सांगायला हवेच का? ‘शाळा’मुळे ‘सुजय डहाके’ मराठी मनामनात जाऊन पोचलाय. पहिल्याच कलाकृतीला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराने अन् घवघवीत यशाने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचलाय. ‘शाळा’मुळे ‘सुजय’ला मराठी चित्रपटसृष्टीत एक वलयांकित स्थान प्राप्त झालेय. तो ‘सुजय’, माझा नऊ वर्षांपूर्वीचा ‘क्लासमेट’ आज प्रत्यक्ष भेटला. निमित्त होते ‘अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धे’चे. ‘सुजय’ या स्पर्धेला परीक्षक म्हणून आला होता.. गेली तीन दिवस तो नगरमध्ये होता, पण भेटीचा योग मात्र आज जुळून आला. मध्यंतरी त्याच्या ‘आजोबा’ या आगामी चित्रपटावर एक स्टोरी केली तेंव्हा आम्ही फोनवर बोललेलो.. पण पुण्यात ‘बचलर ऑफ मास कॉम’ सोबत पूर्ण झाल्यानंतर २००५ मध्ये आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्यानंतरची ही पहिलीच भेट!
    दुपारी परिसंवाद होता. कार्यक्रमस्थळी पोचल्यावर तो कुठे दिसेना म्हणून मी त्याला फोन केला. “येतोच आहे” असे तो म्हणाला. पाच मिनिटांनी तो आला. मी मागे जाऊन त्याला आवाज दिला. त्याने वळून मला पाहिले. दोघेही ज्जाम खुश झालो. “मह्या, कित्ती वर्षांनी भेटतोयस” म्हणत पुढे येऊन त्याने कडकडून मिठीच मारली. त्याच्या भेटीने मला जेवढा आनंद झाला तितकाच त्या भेटीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरही ओसंडत होता. मी नकळत बोलून गेलो “सुजय, मोठ्ठा झालास रे मित्रा!” त्यावर “कसला रे, अजून तसाच बारीक आहे मी” असे तो म्हणाला. मग “तू क्राईम रिपोर्टर आहेस ना? कसं आहे? काय चाललंय?” वगैरे विचारणा केली. आम्ही बोलत होतो. मध्येच त्याचे एक दोन चाहते येऊन भेटत होते. तिकडे परिसंवाद सुरु व्हायला आधीच उशीर झालेला. म्हणून संयोजक त्याला बोलवायला आले. तेही ओळखीचे होते. तरी सुजयने मी ‘त्याचा’ मित्र असल्याचे त्यांना सांगितले आणि थोडा वेळ मागितला. त्यावेळीही त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. मग मीच “परिसंवादाला उशीर होतोय आपण पुन्हा भेटूच” म्हणून निरोप घेतला. पत्रकारितेत असल्यामुळे बरेचदा अनेक सेलिब्रिटीना भेटण्याचा योग येतो. त्यातल्या अनेकांचा वैयक्तिक चाहता असूनही एक पत्रकार म्हणून मी नेहेमी एक अंतर ठेवत आलोय. गेल्या वर्षी ‘गुलजार’ भेटले तेंव्हाही असेच. तेंव्हाही ते अंतर कायम ठेवले. पण, आज मात्र प्रथमच मला ‘या’ अविस्मरणीय भेटीचा क्षण क्यामे-यात टिपण्याचा मोह आवरला नाही. सुजय आता सेलिब्रिटी असला तरी पाय जमिनीवर असलेला मित्र आहे. आमच्या विनंतीवरून संयोजकांनीच तो क्षण टिपला. मग “मी ‘आजोबा’च्या प्रमोशनसाठी पुढच्या महिन्यात नगरला येतोय तेंव्हा भेटूच”, असे म्हणून तो स्टेजवर गेला.

    परिसंवाद सुरु झाला. रिपोर्टिंग करायचे होते म्हणून मी पहिल्याच रांगेत बसलेलो. सुजयसोबत अभिनेता भरत जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदेही स्टेजवर होते. मी मात्र भारावून सुजयलाच पहात होतो. तो बोलत होता, अन् मी नऊ वर्षे मागे ‘फ्लशबक’ मध्ये गेलो.. त्या दोन तासांच्या कालावधीत आम्ही सोबत घालवलेल्या नऊ वर्षांपूर्वीच्या आठवणींचा स्लाईडशो माझ्या मन:चक्षुंपुढे सरकायला लागला..


    घरचा विरोध पत्करून मी पुण्यात ‘मास कॉम’ला घेतलेला प्रवेश.. तिथे भेटलेले ‘सुजय’, ‘महांतेश्वर’.. त्यांचा कल ‘फिल्म प्रोडक्शन’कडे तर माझा ‘जर्नालिझम’कडे.. विचारांमध्ये, करिअरच्या आवडीनिवडीत विरोधाभास असला तरी आमच्यात छान मैत्री झाली.. इतकी की त्यांच्या एखाद्या ‘स्क्रिप्ट’वर तासंतास गप्पा रंगत.. अन् मी सोबत बसून ऐकत असे.. कधी ‘बॉम्बे ग्यारेज’च्या बस स्थानकावर तर कधी कॉर्पोरेशनच्या बस स्थानकावर.. गप्पा रंगायच्या तसे त्यांच्या सिगारेट मागून सिगारेट संपायच्या.. मी ओढत नसलो तरी बरेचदा सिगारेटचे सुट्टे पैसे मलाच द्यावे लागायचे.. तेंव्हा ज्जाम राग यायचा.. पण हाच सुज्या (तेंव्हा आम्ही त्याला ‘सुज्या’ म्हणायचो) म्हणायचा.. “दे मह्या दे”.. आणि महान्तेश म्हणायचा, “अरे जेंव्हा आम्ही मोठे दिग्दर्शक होऊ, तेंव्हा तूच लोकांना सांगशील, कोणे एके काळी यांचे सिगारेटचे बॉयलर माझ्या पैशांनी पेटत होते”.. आणि माझ्याकडे बघून ते दोघे एकमेकांना टाळ्या देत हसायचे.. कधी चिंचवडला पवनेकाठी झाडाखाली बसून, कधी सुजयच्या घरी, तर कधी महान्तेशच्या घरी त्यांचे ‘स्क्रिप्ट’चे लिखाण चालायचे..

   त्यावेळच्या ‘अल्फा महाकरंडक’मध्ये आम्ही केलेली एकांकिका.. त्या एकांकिकेची तयारी.. डेक्कनला रानडेच्या कट्ट्यावर बसून मारलेल्या गप्पा.. एकांकिकेच्या तालमीला झालेल्या गमतीजमती आणि भांडणेही.. ‘माझ्या’ वाट्याला आलेला ‘लीड रोल’ आपल्याला मिळावा असे त्याचे मागणे.. पण नंतर आपला अभिनय ‘वाईट’ असल्याचे मान्य करीत ‘तूच तो छान करशील’ म्हणून मला सांगणे अन् माघार घेणे... ‘व्हिक्टरी’, ‘प्रभात’, ‘वेस्ट एंड’ला सोबत पाहिलेले सिनेमे.. हॉलीवूडला ‘मनोज नाईट श्यामलन’ म्हणून याचा आम्ही केलेला ‘सुजय डे डहाके’.. अखेरच्या दिवसांत आम्ही मिळून बनवलेला ‘५०० रुपयांचे जग’ हा ‘लघुपट’.. त्याचे शुटींग.. मग ‘‘मह्या, तू फिल्म प्रोडक्शनला का नाही येत?’’ म्हणून त्या दोघांनी घातलेली गळ... पण ‘पत्रकारिताच करायची’ या निर्णयावर ठाम राहून मी घेतलेला निरोप.. मग काही वर्षांनी सुजय ‘शाळा’ काढतोय कळाले.. त्याच्या गुणवत्तेवर विश्वास होताच.. ‘शाळा’ पाहिल्यावर त्याला भेटूनच बोलायचे ठरवले.. पण राहून गेले.. ‘शाळा’ प्रदर्शित झाला आणि दुसऱ्याच आठवड्यात त्याचाच फोन आला.. नगर जिल्ह्यातील एका मुलाने ‘शाळा’ यु ट्यूबवर अपलोड केलाय.. त्याच्याविरुध्द आम्ही ‘सायबर क्राईम’चा गुन्हा नोंदवलाय, त्याविषयी बोलणे झालेले.. आणि मग काही दिवसांनी ती बातमी झळकली.. ‘शाळा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची.. त्याक्षणी एवढा अभिमान वाटला म्हणून सांगू की.. आणि आज थेट त्याची प्रत्यक्ष भेटच..!

    परिसंवाद संपल्यामुळे आमच्या ‘आठवणींचा स्लाईडशो’ही तात्पुरता पॉज झाला..

   मला पुन्हा स्टेजच्या मागे येईस्तोवर तो भरत आणि केदारसोबत निघून गेलेला. पुन्हा संध्याकाळी त्याच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण होते. पण ‘डेडलाईन’चे भूत मानगुटीवर असल्याने मलाही निघून यावे लागले. संध्याकाळी आम्हा दोघांचा फोटो त्याला पाठवला. त्यावर ‘पुढच्या महिन्यात पुन्हा येईन तेंव्हा नक्की भेटू’ म्हणून त्याचा मेसेज आला..

    ‘Thanks Sujay ! you made my day spacial today !’ आता भेट तर होईलच. कारण खूप गप्पा मारायच्यात.. पुन्हा नऊ वर्षे मागे जाऊन ‘बॉम्बे ग्यारेज’च्या बस स्थानकावर बसायचंय... पुण्यातल्या रस्त्यांवरून त्याच्या सोबत पायी चालायचंय.. छे ! आठवणींचा स्लाईडशो संपता संपत नाहीय..
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या