रोज सकाळी घरातून निघून हायवेवरुन ऑफिसला येतो आणि रात्री परत जातो. ३२ किलोमीटरचं अंतर. आधी मोटारसायकलवर, अन आता कारने. नऊ वर्षांमध्ये एवढाच फक्त बदल. प्रवास सुरु झाला की म्युझिक असतं सोबतीला. क्वचित कधी फोनवर बोलत येतो. रस्ता कधी संपतो कळत नाही. 

रोजचा रस्ता तोच असतो. मीही तोच असतो. समोरुन येणारी किंवा मला ओलांडून पुढे निघून जाणारी वाहनंही तीच, म्हणजे तशीच असतात. येतात. जातात. समोरची काच म्हणजे जग दिसणारी फ्रेम. 

या फ्रेममध्ये रोज त्याच-त्याच किंवा कधीतरी नवनव्या गोष्टी नजरेस पडतात. म्हणजे रस्त्यावरचे खड्डे. बाजूची शेती. घरं. हॉटेलं. एखाद्या गावाचं बसस्टँड. त्यावरचं अतिक्रमण आणि वाहनांची गर्दी. एक टोलनाका. तेथील माणसं. ऊन. वारा. पाऊस. अंधार. स्पीड ब्रेकर्स. वगैरे वगैरे.

धड गावही नाही अन दाट वस्तीही नाही, असा एक नाका. म्हणजे एका गावाकडे जाणारा फाटा. त्या फाट्यावर असलेल्या काही टपऱ्या. हॉटेलं नाहीत टपऱ्याच. कारण तेथे असलेली गिऱ्हाईकं म्हणजे अत्यंत गरीबीतली, कष्ट उपसणारी, रस्त्याकडेच्या स्टोन क्रशरवर, बांधकाम साईट्सवर कामगार म्हणून, भंगाराच्या दुकानात, पेट्रोल पंपावर साफसफाईच्या कामाला असलेली ही माणसं. 

त्या टपऱ्यांवरचा चहा, क्रीमरोल, वडा, पाव,मिसळ खाऊन तृप्तीचा ढेकर देणारा हा वर्ग. हे रोजचंच चित्र. त्यातलीच एक टपरी. तिथली जाडजूड खाष्ट बाई. एक गोरीपान शाळकरी मुलगी. हे नऊ वर्षांपूर्वीचं चित्र.

येस्स. ही मुलगीच कारण होतं दररोज नित्याने आणि नकळत तिकडे नजर जाण्याचं. खरं तर आठ वर्षांत कधी तिथे (मुद्दामून) थांबलोही नाही. अन् मुद्दामूनच आपल्याकडे लक्ष जावं म्हणून हॉर्न वाजवणं किंवा सावकाश नजर टाकत जाणंही नाही. तरीही ही टपरी आली की आपोआप उजवीकडे पाहून एकदा लक्ष जातंच. 

ती बाई अन ती मुलगी. बहुधा या दोघीच त्या टपरीच्या मालकीणी. ती मुलगीच कारण होतं तिकडे पाहण्याचं. तीच मुलगी व तिचं सौंदर्यच खरं कारण होतं त्या हाटेलात बाजूच्या दोन-चार टपरीवजा हाटेलांपेक्षा अधिक गिऱ्हाईकं यायचं. आणि विनाकारण रेंगाळायचं. 

नाहीतर होतं तरी काय त्या टपरीवजा हाटेलात? कळकट, मळकट, दमलेले काळवंडलेले चेहरे दररोज लक्ष वेधून थोडी घेतात कोणाचं? ८ वर्षांत त्या दोघींसोबत कसलाही संवाद नसला, तिथं कधीच थांबणं नसलं तरी या हॉटेलासोबत आणि तेथल्या त्या कमालीच्या सौंदर्यवान मुलीबद्दल एक अनामिक औत्सुक्य निर्माण झालं. 

अशा रस्त्याकडेच्या कचऱ्यासारख्या जागेत असलेली ती टपरी. दोन बाकं आणि एक दोन खुर्च्या. टपरीतल्या दोरीला लटकावलेल्या गुटख्याच्या पुड्यांच्या माळा. बरण्यांमध्ये ठेवलेली गोळ्या, बिस्किटं. घरापातून ३२ किलोमीटर अंतर कापताना कितीतरी हॉटेलं आहेत. दुकानं आहेत. घरं आहेत. माणसं आहेत. जी तिथंच आहेत. असतात. त्यातलीच ही एक टपरी. यातलं कधी कुणी नसलं तर आपोआप चुकचुकल्या सारखं वाटतं.

चारेक वर्षांपूर्वी त्या परिसरातल्या एका टपरीचालक महिलेचा खून झाल्याची ब्रेकिंग न्यूज कानावर आली. माझी शंका खरी निघाली. ती जाडजूड, चेहऱ्यावरुन खाष्ट वाटणारी महिला एका दारुड्याने कायमची वर पोचवली. रिपोर्टिंग करताना खुपदा क्राईम स्पॉटवर जावंच लागतं. पण यावेळी नाही गेलो. 

तपासी अधिकारी मित्रच होते. त्यांनीच माहिती दिली. महिलेला दोन मुली व एक मुलगा होता. मोठी मुलगी विवाहित तर मुलगा व्यसनी आणि कधीही घरी न येणारा. त्यामुळे टपरीवर दिसणारी ती गोरीपान मुलगी अन ती महिला दोघीचंच घर. त्याच परिसरात असलेल्या एका कामगारासोबत महिलेचे अनैतिक संबंध होते. त्या कामगारानेच दारुच्या नशेत महिलेला यमसदनी धाडले.

तेव्हापासून ते टपरीवजा हाटेल बंद झालं. मध्ये तीन चार वर्षे निघून गेली. ती मुलगी कुठे गेली असेल, तिचं काय झालं असेल, हे प्रश्न त्या हाटेलाकडं नजर गेली की मनात यायचे. काही सेकंदापुरते. अशाच कितीतरी सेकंदांनी एकत्रित मिळून त्या टपरीवजा हाटेलानं, त्या मेलेल्या महिलेनं अन त्या गोऱ्यापान मुलीनं मनात अनामिक औत्सुक्य निर्माण केलं होतं. पण बंद पडलेल्या त्या टपरीवजा हाटेलानं या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला होता.

आता ती मुलगी कशाला इथं येईल? आली तरी ती कशाला एकटी हाटेल चालवेल? बरं चालवलं तरी ज्या घरात तिच्या आईचं शीर धडावेगळं झालं त्या घरात ती एकटी कशी राहिल? या शंकाही अशाच सेकंदापुरत्या मनात यायच्या. ही मुलगी इथं, या घरात, या बाईच्या पोटी का जन्माला आली असेल? 

ती एखाद्या चांगल्या घरात असती तर आज कुठं असती? सौंदर्याच्या बळावर नक्कीच तिला चांगला जोडीदार, घर, वैभव मिळालं असतं. असो. आपल्याला काय करायचंय?? चार पाच सेकंदासाठी डोक्यात आलेले हे विचार थोडं पुढे आलं की गायब व्हायचे.

गेल्या आठवड्यात मात्र एक वेगळंच चित्र दिसलं. रस्त्याने ऑफिसला येत असताना कारच्या समोरच्या काचेतून दुरुनच त्या टपरीवजा हाटेलात काही माणसं दिसली. मी कारचा वेग जरा मंदावला. जवळ आल्यावर पाहतो तर ते हाटेल सुरू झालेलं. तिथं तीच गोरीपान मुलगी. 

पण आता निर्विकारपणे गिऱ्हाईकांना चहाचे कप देत होती. एकटीच. हो. ते हाटेल सुरू झालंय. तेच हाटेल. जिथं ती गोरीपान मुलगी तिच्या तोऱ्यात आईसोबत काम करायची. एक वर्तुळ पूर्ण झालं. ती मुलगी आता युवती झालीय. 

मध्यंतरी या मुलीचं काय झालं असेल? तिला पुन्हा इथंच का यावं लागलं? इतर सगळे रस्ते बंद झाल्यानंतर तिला इथंच यावं लागलं ना? शेवटी हे टपरीवजा हाटेलच तिचा आधार ठरलं का? नियतीनं तिला पुन्हा तिथंच आणून आपलं वर्तुळ पूर्ण केलं का ?....

त्या टपरीवजा हाटेलानं, आणि त्या मुलीनं गेल्या नऊ वर्षांमध्ये मनात असे असंख्य प्रश्न निर्माण केले. त्यांची उत्तरं शोधण्यासाठी कधीही तिथं थांबलो नाही. किंबहुना थांबावसं वाटलंच नाही कधी. आणि का थांबावं? या प्रश्नांची उत्तरं शोधून काय करणारे मी? 

अशी कितीतरी माणसं, लोकं रोज दिसतात. त्यांना थोडीच मी रोज भेटतो. घरातून निघून पाऊण तासात ऑफिसात जायचं असतं. वेळ कुणाला आहे ? त्या टपरीवजा हाटेलाकडं पाहून जसं प्रश्नांचं मोहोळ उठतं तसंच हसायलाही येतं स्वतःचं. 

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं साक्षीदार व्हावं म्हणून पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं. पण मग ही काय स्टोरी आहे? हा काय भविष्यातला इतिहास आहे? त्या टपरीवजा हाटेलात अन तिथल्या माणसांमध्ये कसलं आलंय औत्सुक्य?  जाऊ देत.. आपल्याला वेळेत सकाळच्या मिटिंगला पोचायचंय..

तुमचंही होतं का असं कधी ?