आठवणीतली गाणी - मेरे नैना सावन भादो..

ध्यंतरी एका फेसबुक ग्रुपवर एका लेखिकेची शंकर जयकिशन आणि भैरवी रागावर आधारित गाण्यांची पोस्ट वाचण्यात आली. तसं सिनेमा आणि गाण्यांचे पडद्यामागचे किस्से भारीच असतात. कारण प्रत्येक सिनेमा आणि गाण्याच्या निर्मितीच्या वेळी काही गोष्टी घडलेल्या असतात. 


त्यामुळे ती गाणी त्यातील कलाकार, गायक, संगीतकार, दिग्दर्शक किंवा निर्मिती प्रक्रियेतील इतर घटकांच्या कायमची लक्षात राहतात. असे किस्से एेकायला विशेष आवडतं मला.. कारण त्यातून अशी गाणी किंवा सिनेमे आपल्याही मनात घर करुन राहतात. ही गाणी आपोआप आठवणीतली गाणी बनून जातात...

सुप्रसिद्ध निवेदक व कलाकार अनु कपूर, अमीन सयानी यांसारखे निवेदक नामांकित, आघाडीच्या एफएम व काही म्युजिक चॅनल्सवर जेव्हा असे पडद्यामागचे किस्से सांगतात. शिवाय ते ज्या प्रकारे सांगतात, ते तर भारीच. मी वाचलेल्या फेसबुक पोस्टमध्ये शिवरंजनी रागाचा उल्लेख आलेला होता. 

वैयक्तिक खरं सांगायचं तर शास्त्रीय संगीत हा माझ्या आकलनासाठी जड विषय. पण आपण नेहमी ऐकत आलेलो, आपल्याला आवडलेली अनेक गाणी ही कुठल्या रागांवर आधारित आहेत, किंवा होती, हे माझ्या कधीही गावी नव्हते. आज अशीच एक आठवण शेअर करतोय..

माझे सख्खे छोटे मामा मुंबईच्या शिरोडकर शिक्षण संस्थेतून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तिथे ते मराठी आणि इतिहास विषय शिकवायचे. पएा सिनेमा, गाणी, आणि संगीत म्हणजे त्यांचं जीव की प्राण. त्याविषयी त्यांचं अवांतर वाचन आणि ज्ञानही अफाट व सखोल आहे. 

ते स्वतः लतादीदी आणि महंमद रफिंचे निस्सीम चाहते आहेत. त्यांची कित्येक गाणी अजूनही त्यांच्या ओठांवर रुळलेली अाहेत. तर या सिताराम मामांच्या आणि माझ्या गाण्यांच्या चॉईसही बहुतांशी सेम सेम आहेत. असेच एकदा आम्ही सोबत असताना राजेश खन्ना आणि हेमा मालिनीचा 'मेहबुबा' हा सिनेमा टीव्हीवर सुरू होता. 

या सिनेमाचं कथानक जितकं गूढ आणि उत्कंठावर्धक आहे, तितकीच त्यातली गाणीही कर्णमधूर व अवीट आहेत. या सिनेमात 'मेरे नैना सावन भादो..' हे गाणं दोन वेळा पूर्ण आणि मध्ये मध्ये काही ओळींचं आहे. या गाण्याबद्दल मामांनी त्यावेळी सांगितलेली आठवण अशी... की हे गाणं शिवरंजनी रागावर आधारित आहे. 

मी म्हणालो कसं काय? हे तर साधं सरळ साेपं गाणं आहे, यात राग कुठून आला? माझा भाबडा प्रश्न त्यांना साहजिक होता कारण मला शास्त्रीय संगीताचं कसलही ज्ञान नव्हतं. आणि अजूनही नाहीय. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे क्लासिकलच गाणं आहे. गंमत अशीय की ते गायलंय लता दीदी आणि किशोर कुमारने. 

किशोर कुमारने एकही क्लासिकल गाणं गायलेलं नव्हतं. किंबहुना त्यांना येतंच नव्हतं. दिग्दर्शक शक्ती समंथ यांना मात्र ते किशोरजी यांच्याच आवाजात हवं होतं. स्वतः किशोरजी यांनी तेवढं गाणं रफी साहेबांकडून गाऊन घ्या, अशी विनंती केली. पण दिग्दर्शक त्यांच्या निर्णयावर ठाम होते.

हे गाणं सिनेमात दोनदा आहे. त्यामुळे शेवटी असा तोडगा निघाला की, आधी हे गाणं लता दिदींकडून गाऊन घ्यायचं. 'ते ऐकून ऐकून जसंच्या तसं मी म्हणेन' असे किशोरजी म्हणाले. त्याप्रमाणे दोन्ही गाणी कंपोज झाली. अन अशा प्रकारे किशोरजी यांनी त्यांचं पहिलंवहिलं क्लासिकल गाणं गायलं. 

माझ्या व्यक्तीगत माहितीनुसार बहुधा हे किशोरजींनी गायलेलं एकुलतं एक क्लासिकल गाणं असावं.. त्यांना स्वतःला विश्वास नव्हता की, हे गाणं रसिक स्वीकारतील की नाही.. पण हे गाणं प्रचंड हिट ठरलं. इतकंच नाही तर अनेकांनी त्याबद्दल किशोरजी यांचं विशेष कौतुक केलं. 

कारण किशोरजी यांचं आजवरची गाणी कुठल्याच शास्त्रीय प्रकारात बसणारी नव्हती. तरीही ते हिट होते, त्यांची गाणी लोकांनी डोक्यावर घेतलेली होती. मामांनी त्यावेळी मला शिवरंजनी या रागावर आधारित आणखी काही गाणी उदाहरणादाखल सांगितली. 

'एक दुजे के लिये' मधलं 'तेरे मेरे बीच में, कैसा है ये बंधन' हे गाणंही याच रागावर आधारित आहे, असं ते म्हणाले. हे गाणंही सिनेमात दोनदा आहे. एकदा लतादिदी व एसपी बालसुब्रमण्यम या जोडीच्या आवाजात, तर एकदा एसपी बालसुब्रमण्यम यांच्या एकट्याच्या कातर, मनात काहूर उठवणाऱ्या आवाजात.

मामांनी सांगितलेला हा किस्सा मला कायमचा लक्षात राहिला. त्यातली सत्यता किंवा संदर्भ मी पडताळून पाहिले नाही. तशी गरजही कधी वाटली नाही. पण एक मात्र खरंय की, मला स्वतःला देखील लता दिदींपेक्षाही किशोरजी यांच्या आवाजातलं 'मेरे नैना सावन भादो' अधिक आवडत आलंय. 

तितकंच 'तेरे मेरे बीच में' त्यांच्या आवाजातील ती आर्तता प्रचंड जीवघेणी आहे. गाणं संपेपर्यंत कोणीतरी काळीज चिरतंय असं वाटत राहतं. शास्त्रीय संगीत आणि कुठलं गाणं कुठल्या रागावर आधारित आहे, हे अजूनही कळत नाही मला. पण मोठ्या लांबलचक दमात एक ओळ असलेलं गाणं ऐकलं की शिवरंजनी राग आठवतो. 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या