..आणि आता 'डॉक्टर' सूर्यकांत मोहनराव वरकड.

आमचे मित्र, बंधु, प्रभातचे पत्रकार सूर्यकांत मोहनराव वरकड यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विषयातील पीएच. डी. पदवी जाहीर केली आहे. अहमदनगर कॉलेजातील मराठी संशोधन केंद्रातून त्यांनी 'निवडक संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक अभंगांचा अभ्यास' या विषयावरील प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. 

खरं तर त्यांनी प्रबंधासाठी निवडलेला हा विषय.. त्यांची स्वतःची विचारधारा.. अन् त्यांचे आजपर्यंतचे आचरण हे एकच आहे. आणि हा काही योगायोग नाही. आपल्या आजूबाजूला संतांचे पाठ केलेले अभंग घोकून शहाणपण मिरवणारे अनेक जण आहेत. पण त्याप्रमाणे कृती आणि आचरण करणारे विरळच असतात. सूर्यकांत वरकड हे दुसऱ्या प्रकारातले आहेत. 

खरं तर एकीकडे संसार सांभाळत, फिल्डवर पत्रकार म्हणून नोकरी करत ही पीएचडी प्राप्त करणे तशी साधी गोष्ट नाही. ती एक तपश्चर्याच म्हणावी लागेल. आणि ही डॉक्टरेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून असेल तर त्या व्यक्तीबद्दल आणखीनच आदर निर्माण होतो. 

एरवी कोणी डॉक्टरेट मिळवली तर ४-५ ओळींच्या बातमी व पासपोर्ट फोटोशिवाय आम्हाला घेणं नसतं. पण सूर्यकांतभाऊच्या पीएचडीच्या तपश्चर्येला अनेक पदर आहेत. या माणसाला ज्यांनी ज्यांनी जवळून पाहिलंय त्यांनाच ही खरोखर मोठी 'अचिव्हमेंट' असल्याचे माहित आहे. 

एकीकडे संसार, दुसरीकडे वर्तमानपत्रातील बातमीदारीची जबाबदारी (प्राणपणाने आणि मनापासून करणे), अन् तिसरीकडे वेळ येईल तेव्हा हे सगळं सांभाळत भोवती जपलेल्या गोतावळ्याच्या मदतीला धावून जाणे.. या चक्रातून अभ्यासाला वेळ काढत ही डॉक्टरेट मिळवणं, ही निश्चितच मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

सूर्यकांत वरकड. आम्हा सगळ्या मित्रांचा सुर्याभाऊ. हातोळण (ता. आष्टी, जि. बीड) येथून नगरमध्ये आलेला हा माणूस काय-काय नाही ते विचारा. तो सगळाच आहे. तो जिज्ञासू, चिकित्सक वृत्तीने बातम्या वेचणारा शोधपत्रकार आहेच. पण त्याहून अधिक एक ‘संवेदनशील' मनाचा माणूस आहे. 

एकदा सहज रस्त्यात ओळख झाली तेव्हा 'भाऊ' म्हणून संबाेधणारा हा माणूस खरंच आजपर्यंत मोठ्या भावासारखा पाठीराखा म्हणून उभा आहे. पत्रकार म्हणून प्रतिस्पर्धी वर्तमानपत्रात काम करत असलो तरी या माणसाने कोणाशीही, कसलीही स्पर्धा कधीच केली नाही. प्रत्येकाच्या चांगल्या गुणांचे तोंडभरुन कौतुक करणारा हा दिलदार माणूस. 

साधंसुधं गाव सोडून शहरात आला तरी आपल्या गावात एसटी बससेवा सुरु व्हावी, गावाच्या विकासाची वाट सोपी व्हावी म्हणून आपल्या लेखणीतून सतत पाठपुरावा करणारा बातमीदार.. अन् ही सेवा सुरु झाल्यानंतर 'आपण फक्त आपले काम केले', हे सांगून श्रेय नाकारत नामानिराळा होणारा मोठ्या दिलाचा माणूस. 

नसते ताण नको म्हणून आपण ओळखीचे फोन उचलायला, भेटायला टाळतो. अन् हा माणूस हातातलं काम साेडून गावातल्या दोस्तांना भेटायला, गावकऱ्याला गरज आहे म्हणून तेथे हजर होतो. गावातल्या कोणत्याही माणसाचं नगरमध्ये कोणत्याही शासकीय कार्यालयात काम अडले असेल, अन त्याचा फोन आला की हा माणूस जाणार म्हणजे जाणार. आणि ते काम मार्गी लावल्याशिवाय परतणारही नाही. 

"भाऊ तुम्ही एक काम करा. राजकारणात जा, आरामात निवडून याल", असे टोमणे आम्ही मारायचो. काही वेळा या माणसाला ‘प्रॅक्टिकल’ व्हायचा सल्ला दिला. पण काही उपयोग झाला नाही. ‘आपण जर कोणाच्या कामी पडत असू, आपल्यामुळे एखाद्याचे रखडलेले काम मार्गी लावता येत असेल, तर काय हरकत आहे त्याच्यासाठी आटापिटा करायला’, असं म्हणत हा अवलिया नेटाने अहोरात्र पळत राहिलाय. काय बोलावं अजून?

पीएचडीचा अभ्यास करताहेत हे कळलं आणि त्यांच्या अभ्यासाचा विषय विचारला, तेव्हा आम्ही मित्र त्यांची चेष्टा करायचो. ‘वा रे पठ्ठ्या ! हा माणूसही सगळ्या जगाचा भार वाहणारा संतच आहे, अन याच्या अभ्यासाचा विषयही संतांच्याच कार्यावर आधारलेला.’ जसजसा हा माणूस उलगडत गेला, तसतसं कळत गेलं आपण आपल्या आयुष्यात संत नाही पाहिले, पण सूूर्यकांत वरकड पाहिलाय. 

संतांच्या विचारसरणीवर खरोखर चालणारा, ती आनंदाने जगणारा. आभाळातला नाही, पण हा सूर्य मी जवळून पाहिलाय. समाजातील अनिष्ट प्रथांवर कडाडून तूटून पडणारा, तो फक्त वाचाळवीर नाही, तर सतत स्वत:च्या आचरणातून, लेखणीतून, कृतीतून काव्यातून, पोवाड्यातून खड्या आवाजात उभं अनिष्ट प्रथांविरुद्ध उभं राहणारा, त्याविरुद्ध बोलण्याचं, लिहिण्याचं धाडस करणारा.. प्रत्येकाचं आत्मभान जागृत करणारा व योग्य दिशा दर्शवणारा 'सूर्य' आहे.

एकदा मुलाच्या वाढदिवसाला या माणसाने गावात कविसंमेलन आयोजित केलं. तेव्हा थेट गावी जाऊन जे पाहिलं त्याने अक्षरश: भारावून गेलो. आताशा गावात तमाशा फड, ऑकेस्ट्रा आल्यावरच गर्दी गोळा होते. किर्तनालाही माणसं गोळा करावी लागतात. पण त्या दिवशीचा 'माऊली'चा वाढदिवस म्हणजे जणू काही हातोळणचा गावाचा सण होता. साध्या मातीच्या घरात राहणाऱ्या या माणसाची गावाशी जशी नाळ तुटलेली नाही, तसा गावकऱ्यांनाही या माणसाचा प्रचंड अभिमान आहे. 

समदं गाव त्या कवि संमेलनाला गोळा झालेलं. मोठ-मोठे कविवर्य आलेलेच, पण आपला उद्धव काळापहाड, सागर शिंदे, महेश महाराज यांनीही जान आणली. आणि उत्तरोत्तर ही काव्य-मैफिल रंगत गेली. 'आता खरोखर ही शेवटची कविता', म्हणून मैफिल संपल्याचं जाहीर झालं तरी लोकं उठायला तयार नव्हते. यानंतर भाऊंच्या घरातलं दाळ-बट्टीचं गावजेवण. आम्ही खरोखर तृप्त झालो. हे सगळ्यांच्या नशीबी नसतं. तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात भाऊ. 

गावकऱ्यांचे, मित्रांचे, स्नेहीजनांचे हेच प्रेम सूर्याभाऊंना मिळालेल्या 'प्रेस क्लब'चा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यातही दिसले. आपल्या सूर्यकांताचा पुरस्कार सोहळा याचि देही याचि डोळा पहायला समदे गावकरी पदरमोड करून टेम्पो, गाड्या करुन नगरला आले. आपल्यासाठी गावाहून आलेल्या या सगळ्यांना पाहून सूर्यकांतभाऊंचे डोळे पाणावले. अन आमचेही डोळे भरून आले.

एकदा सायंकाळी काम उरकल्यावर ‘काय भाऊ आटोपलं का काम?’ या प्रश्नावर दाटून आलेला कंठ ऐकून पुढच्या मिनिटाला ऑफिसखाली हजर झालेला हा माणूस. त्या दिवशी हक्काने डोकं टेकवायला खांदा देत मन मोकळं करु देणारा, तितकंच हक्काने ठणकावून समजून सांगणारा मोठा भाऊ. असंख्य रुपं आहेत या सूर्यकांतची. 

ज्या संतांच्या कार्यावर या माणसाने प्रबंध सादर केला, त्या संतांची शिकवण हा माणूस स्वत: सदोदित जोपासत आलाय. आणखी वेगळं काय सांगायचं. मी आठ दहा दिवस आजारपणामुळे रुग्णालयात होतो तेव्हाही ऑफिसची डेडलाईन न चुकवता तेथून घरी, घरुन जेवणाचा डबा घेऊन मला द्यायला दवाखान्यात, आणि पुन्हा ऑफिसात, अशी तिहेरी कसरत या माणसाने केली. नको नको म्हणत असताना.. 

बरं हे माझ्याच बाबतीत नाही, तर गावातला, ओळखीचा कोणीही नगरमध्ये दवाखान्यात दाखल आहे कळलं, तर त्याच्यासाठीही असाच आटापिटा करणारा हा माणूस. परवडत नसताना अनेकांना रुग्णालयात पैैशांअभावी उपचार थांबवू न देणारा हा माणूस. याचा साक्षीदार असताना भाऊ हे कोणालाही सांगू नका, म्हणणारा हा माणूस.

एक हाडाचा बातमीदार, शोधपत्रकार, संवेदनशील माणूस, साप्ताहिक सुटीला गावाकडे जाऊन काळ्या मातीत राबणारा कष्टकरी शेतकरी, मित्रांच्या मदतीला धावून जाणारा दोस्त, आदर्श मुलगा, पती, पिता, भाऊ, अशी असंख्य नाती मनापासून आणि उत्कृष्टपणे कशी जपायची हे लख्खपणे सांगणारा ‘सूर्य’ हा आहे. 

आणि आता आमचे 'डॉक्टर' सूर्यकांत मोहनराव वरकड. खूप खूप अभिमान आहे भाऊ तुमचा. लिहित राहिलो तर ग्रंथ होईल इतक्या उंचीचा हा माणूस. त्याला शब्दात मांडण्याची माझी पात्रताही नाही. जे जे प्रसंग पाहिले, अनुभवले तेच आठवले तसे लिहेित गेलो. कुठलीही अपेक्षा न ठेवता इतरांसाठी धावणारा हा खरा भास्कर आहे. 

अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी सूर्यकांत भाऊंना मार्गदर्शन केले. आई-बापाचा आशिर्वाद, आमच्या वहिनींची भक्कम साथ, ऑफिसातल्या सहकाऱ्यांची सोबत, अन् सर्वांच्या सदिच्छेच्या बळावर ही पदवी मिळवू शकलो, असे भाऊ सांगतात. 

जेव्हा केंव्हा कोणी समोर रडगाणं गायला सुरुवात केली, तेव्हा या माणसाने एकच सांगितलंय. रडायचं नाई, लढायचं. हे फक्त सांगून नाही, तर लढून अन जिंकूनही दाखवलं. काल दुपारी ही शुभवार्ता समजली तेव्हा दीडेक मिनिटं फोनवर बोललो आपण. पण ते फक्त तेवढं कौतुक पुरेसं नाही. जवळच्या अनेकांना या तपश्चर्येची कल्पना असली तरी तुमचा इथपर्यंतचा प्रवास समोर यायलाच हवा. म्हणून हा पोस्टप्रपंच.

प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस, प्रा. डॉ. शिरीष लांडगे, डाॅ. संदीप सांगळे, डॉ. प्रकाश सूर्यवंशी, प्रा. डॉ. पोपट सिनारे, प्रा. डॉ. महेबूब सय्यद, दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे, आणि मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा मुसळधार वर्षाव सुरु आहे. आणि तो कायम होत राहावा, हीच सदिच्छा. खूप खूप मोठ्ठे व्हा भाऊ.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या