'अलबेला सजन आयो रे..’ हे उस्ताद राशिद खान यांचं पाहिलेलं अन् ऐकलेलं पहिलंवहिलं गाणं. तेव्हापासूून या माणसाने काळजात घर केलं ते कायमचं. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटासाठी विक्रम गोखले यांच्याकरिता त्यांनी आवाज दिलेला. तेव्हापासून आजतागायत अगणित वेळा हे गाणं ऐकलंय..

या वर्षाची पहिली पहाट उजाडत असताना जमलेल्या मैफिलीतही अहिर भैरवी रागावर आधारित असलेलं हेच गाणं ऐकलं. अगदी परवा मध्यरात्री मित्रांसोबत लाँग ड्राईवला गेलो तेव्हा 'ट्रान्स म्युझिक' ऐकता ऐकता सर्वांकडून 'अलबेला सजन'ची फर्माईश आली, म्हणून पुन्हा एकदा ऐकलं.

हे गाणं जितक्या वेळा ऐकलं तितक्या वेळा अंंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. हा आवाज जवळचा वाटला.. उस्ताद राशिद खान आपले वाटले. त्यांच्या आवाजात नेमकं काय होतं शब्दात सांगता येणार नाही पण त्यांना पुन्हा पुन्हा ऐकत रहावंं वाटायचं.. ‘अलबेला सजन’ फक्त ऐकू येत नाही तर काळजात घुसतं. त्यांनी जे गायलंय ती अनुभूती शब्दात व्यक्त करणं अशक्यंय.

पुढे चार-पाच वर्षांनी 'आओगे जब तुम ओ साजना.. अंगना फुल खिलेंगे..' म्हणत ‘जब वी मेट’ मध्ये तेे पुन्हा भेटले. या गाण्याने तर वेड लावलं. काही गाणीं तुम्हाला प्रेमात पाडतात. रिपीट मोडवर महिनोंमहिने ते एकच गाणं आपण ऐकत रहातो. तरीही बोर होत नाही. उलट पुन्हापुन्हा ऐकत असताना ते गाणं आपल्यात मुरत जातं. तसंच याही गाण्याचं होत गेलं. ही जादू देखील उस्ताद राशिद खान यांचीच. 

‘नैैना तेरे कजरारे है, नैनोंपे हम दिल हारे है.. अंजाने ही तेरे नैैनो ने, वादे किए कई सारे है..’ या ओळी असो की ‘चंदा को ताकूँ रातों में, है ज़िन्दगी तेरे हाथों में.. पलकों पे झिलमिल तारें हैं, आना भरी बरसातों में..’. उस्ताद राशिद खान यांचा भारदस्त आवाज काळजाला हात घालतो. सिनेमात अभिनेत्रीच्या वाट्याला आलेली वेदना गाण्यात दिसते, तर उस्ताद यांच्या आवाजात ती थेट काळजात आरपार जाते..

आश्चर्य म्हणजे ही गाणी आवडली तेव्हा फक्त गायकाचं नाव ऐकलेलं. त्यांना पाहण्याचा योग, निमित्त, कारणही कधी आलं नाही. पुढे यु-ट्युबवर त्यांना पाहिलं. अन् फारसं कळत नसूनही शास्त्रीय संगीत ऐकावसं वाटलं. उस्तादांच्या आवाजातलं ‘मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा..’ हे गाणंही ‘लता’ व ‘किशोरदां’इतकंच काळजाला घरं पाडतं. अगदी अलीकडे ‘मी वसंतराव’मध्ये त्यांनी ‘मारवा’ गायलं.

उस्ताद राशिद खान यांच्या बहुतांश मैैफिली ‘युट्युब, गाना डॉट कॉम, विंक म्युजिक’वर उपलब्ध आहेत. कित्येक रात्री त्यांनी मंत्रमुग्ध केल्यात.. पण हा मंत्रमुग्ध करणारा शास्त्रीय संगीतातील स्वर आज कायमचा हरपला. शास्त्रीय गायकीच्या विश्वात कायम तळपत राहणारा तारा निखळला. ‘पद्मभूषण’ उस्ताद राशिद खान वयाच्या ५५ व्या वर्षी हे जग सोडून गेले..

आजारी असूनही त्यांच्या दिनचर्येत कोणताही बदल झालेला नव्हता. हॉस्पिटलमध्ये ते रियाज करायचे असं डॉक्टरांनी सांगितलंं. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीवर प्रेम करावं तर असं आणि इतकं, हेही जाता जाता शिकवून गेले. 

शास्त्रीय संगीतातलंं त्यांचं योगदान मोठं असलं तरी ज्या गाण्यांमुळे उस्ताद आपले वाटले त्या इथे नमूद केलेल्या दोन-तीन गाण्यांच्या मैफिलीत ते अखेरपर्यंत असतील. तेे नसले तरी त्यांचा आवाज कायम कानात घुमत राहिल. उस्ताद राशिद खान यांना भावपूर्ण आदरांजली. 🙏