हा खेळ सावल्यांचा...



 "कितीतरी वेळा असं झालांय.. पण छे ... स्वप्नच ती.. ऐनवेळी जाग येते अन् शेवट हुकतो. साला स्वप्नातही 'त्याची'च दादागिरी. याला काय अर्थ आहे ? मान्य आहे तो 'ग्रेट' आहे. पण, आता संपव ना म्हणा एकदाचं सगळं. सगळेच प्रश्न सुटतील..."



मी - ये. आलास ?
तो - हो.
मी - कसा आहेस ?
तो - ( उगाचंच उसणं स्मित करीत) छान ए..
मी - पण, वाटत नाही..
तो - (गप्पच)
मी - अरे काय झालं बोल ना. मला तरी सांग. कालही काहीच बोलला नाहीस फोनवर. बॅलन्स संपला माझा म्हणून फोन कट झालेला. तू परत केलाही नाहीस.. (तो गप्पच) अरे बोल ना..
तो - (जमिनीकडे पाहत खालच्या आवाजात) काहीच नाही रे...
मी - असं कसं ? सांग ना, काय झालंय ?

तो - (थोडा वेळ शून्यात हरवून. मग, उगाचच अपराध्यासारखा खालच्या आवाजात) त्या कार अॅसिडेंटमध्ये, किंवा त्या गुंडांनी अडवलं तेव्हा रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली असती तर ? किती बरं झालं असतं ना ? सगळेच प्रश्न सुटले असते. थोडे दिवस वाईट वाटले असते काही जणांना. नंतर जो तो आपापल्या आयुष्यात अडकून जातो. (आकाशाकडे पहात) तो पण ना.. का असे खेळ खेळतो कुणास ठावूक? घरात सगळ्यांचं छान चाललंय. आता कसली म्हणजे कसलीच जबाबदारीही नाहीय. छे... कुठे थांबावं तेच कळत नाही कधी कधी..
मी - तुला नेमकं काय म्हणायचंय ?
तो - (त्याच्याच नादात) तुझ्या माझ्यातही कमालीचे अंतर आहे ना? 'काहीही झाले तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना अंतर देणार नाही', हाच एक घट्ट विश्वास आहे. बाकी आपल्या फॅमिलीही कमालीच्या दोन टोकाला आहेत. तुझीही निष्कारण फरपट होतेय माझ्यासोबत ? त्यापेक्षा मीच नसतो तर ? हे प्रश्नच जन्माला आले नसते ना ?
मी - (कावरी बावरी होत) अरे कसले प्रश्न ? काय बोलतोयंस तु ? आणि असे अचानक काय झालंय तुला ?
तो - (अजूनही त्याच तंद्रीत) तुझ्या ममी पपांनाही तुझी काळजी वाटली नसती. तुझं सगळं छान सुरु होतं रे. अजून दोन वर्षांनी तुझ्या घरच्यांनी तुला हवा तसा राजकुमार तुला आणून दिला असता. मीच माझा निर्णय बदलायला नको होता त्यावेळी. तशी कल्पना होतीच मला, हे असेच होईल म्हणून. (थोडा चिडून) पण, फाजील आत्मविश्वास होता ना.. (पुन्हा शून्यात हरवत, मग थोडं स्मित करीत) खरंच ! सगळेच प्रश्न मिटले असते रे. (मग पुन्हा चिडून) पण, साला स्वप्नातही आपल्या नशिबी अंत नाही..
मी - (शंकेखोर नजरेने त्याच्याकडे पहात) म्हणजे ?
तो - (वर पहात) खूप उंचावरुन खाली कोसळावं... अन् आता जमिनीवर पडून ठिकऱ्या ठिकऱ्या होणार.. सुटणार एकदाचं सगळ्यातून.. पण, अचानक दचकून जाग यावी. स्वप्नाच्याच ठिकऱ्या होवून जातात. कुणीतरी अंधारतून खूप गोळ्या झाडतंय.. अंगातून रक्त सांडतंय.. पण, पुढच्या मिनिटाला मांजराच्या पिलाने अंगावर उड्या माराव्यात.. गोळ्या लागलेल्या ठिकाणी गुदगुल्या जाणवतात.. कधी अथांग पाण्यात खोलवर बुडतोय.. नाकातोंडात पाणी जातंय.. श्वास गुदमरतोय.. आता तरी सुटका होईल.. पण, अंगावरच्या ब्लँकेटमुळे दम कोंडून जाग येते.. तो कार अॅसिडेंट जसाच्या तसा.. कितीतरी वेळा झालांय.. पण छे... स्वप्नच ती.. ऐनवेळी जाग येते अन् शेवट हुकतो. (पुन्हा वर पाहत चिडून) साला स्वप्नातही त्याचीच दादागिरी. याला काय अर्थ आहे ? मान्य आहे तो 'ग्रेट' आहे. पण, आता संपव ना म्हणा एकदाचं सगळं. सगळेच प्रश्न सुटतील...
(उठून चालायला लागतो)
मी - अरे थांब. कुठे चाललांय ? थांब ना... (तो माझा आवाज जूण ऐकायलाच येत नाही अशा अविर्भावात चालतोय अजूनही.. की माझा आवाजच त्याच्यापर्यंत पोचत नाहीय.. माझ्या अंगात त्राण का नाहीय ? त्याला थांबवायला हवंय.. कुठे चाललांय तो ? ) अरे थांब ना. प्लीज. असा अर्ध्यातच कुठे सोडून चाललांस... प्लीज...थांब ना.. अरे.. ऐक तर... (मी धडपडतेय.. पण, जागेवरुन हलता येत नाहीय.. आता माझाही जीव कासावीस होतोय.. डोळ्यापुढे अंधार दाटतोय....)

(काही क्षणांनी... कानावर आवाज येतोय.. अंधारात कोण गातंय ?..) 

आभास सावली हा
असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते
असती नितांत भास
हसतात सावलीला
हा दोष आंधळ्यांचा....

(दरदरुन घाम फुटून मला जाग येते. अरे हे काय? गाणं अजूनही ऐकू येतंय.. ओह ! पलिकडच्या खोलीत बाबांनी रेडिओ लावलांय तर..) 

मी - (स्वत:शीच मनातल्या मनात थोडी सुखावलेय ) म्हणजे हे स्वप्न होतं तर...  (पुढच्याच क्षणाला पुन्हा शंका येते) पण हे गाणं स्वप्नातही सुरू होतं का मग ? तो कुठं गेला ? माझा फोन कुठाय ? ...

(रेडिओ अजूनही सुरूच आहे. महेंद्र कपूर गातायेत...) 

रात्रीस खेळ चाले
या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही
हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा...


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या