'मंजिले और भी हैं...'


    जगातला सर्वात यशस्वी क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'मास्टर-ब्लास्टर' सचिन तेंडूलकर याने नुकतेच आपले आगामी लक्ष्य 'कसोटीत १५ हजार धावा करणे' असल्याचे सांगितले आहे. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा मनसुबाही त्याने बोलून दाखविला आहे. जोपर्यंत क्रिकेट खेळतोय तोपर्यंत एकदा तरी भारताला विश्वचषक मिळवून द्यायचे त्याचे स्वप्न आहे.
    सचिनने आतापर्यंत १५९ कसोटी सामन्यात ५४.२८ च्या सरासरीने १२ हजार ७७३ धावा केल्या असल्याने त्याला १५ हजार धावांचा टप्पा गाठणे तितकेसे अवघड नाही. जगप्रसिध्द नियतकालिक 'विस्डन क्रिकेटर'ला दिलेल्या मुलाखतीत सचिनने आपले हे स्वप्न सांगितले आहे. क्रिकेटमधील त्याचे आदर्श व भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये १५ हजार धावा केल्याचे पहायचे आहे. त्यामुळेच आपण त्यांची हि इच्छा पूर्ण करणार असल्याचे सचिनने सांगितले आहे.
    सचिनने आपले स्वप्न सांगून एकप्रकारे आपल्या टीकाकारांची तोंडेच बंद केली आहेत. कारण नेहेमी त्याच्या निवृत्तीची वाट पाहणाऱ्यांना त्याने पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे की, निदान कसोटीत १५ हजार धावा केल्याशिवाय तरी मी निवृत्त होणार नाही. तसे पाहता जोपर्यंत चाहते त्याला खेळताना पाहू इच्छितात तोपर्यंत तरी तो खेळणारच. खरोखर 'विक्रमांचा शहेनशहा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनची हि अपेक्षा म्हणजे त्याच्यासाठी 'मंजिले और भी हैं...' असेच दर्शवितात. आतापर्यंतची त्याची कामगिरी पाहता त्याच्यासाठी हे 'लक्ष्य' अजिबात अवघड नसल्याचे दिसून येते. या लेखात सचिनची आकडेवारी मांडण्याचा उपद्व्याप मी करणार नाही. कारण ती त्याच्या चाहत्यांसह जवळपास सर्वांनाच तोंडपाठ आहे. इथे त्याच्यामधल्या खिलाडूवृत्तीचा आणि माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे.
    सचिन आज 'विक्रमादित्य' म्हणून ओळखला जात असला तरी त्याच्या या यशामागे कठीण परिश्रमांची जोड आहे. कारण आगीतून तावून सुलाखून निघाला म्हणून 'सचिन' नावाच्या लोखंडाचं कणखर पोलादात रुपांतर झालं. त्याच्यावर टीका करणारेही अनेक होते, पण टीकाकारांच्या झुंडीकडे त्याने सपशेल कानाडोळा केला. दुसऱ्यावर आपले नियंत्रण नसते हेच खरे. प्रतिसाद दिला तर कोकिळाही शीळ घालते. सचिनही कधी टीकाकारांना तोंड देण्याच्या फंदात पडला नाही. आपल्या नवनवीन विक्रमांनी अन ब्याटनेच त्याने या टीकाकारांची तोंड बंद केली. अपयशातही तो तितक्याच ताठपणे उभा राहिला. नाहीतर दुखापतग्रस्त झाल्यानंतर अनेक क्रिकेटपटूना क्रिकेटला रामराम ठोकावा लागलेला आहे. पण सचिनने मात्र त्यातूनही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली.
    द्वेष-मत्सरापासून तर नेहमी चार हात लांब रहाणेच त्याने पसंत केले. नाहीतर आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यात जसे कांगारू फलंदाज पटाईत आहेत, तसे त्यालाही करता आले असते, पण सचिन तसा नाही. विजय व विक्रमांचा आनंद जितक्या संयमाने तो घ्यायला शिकला तितक्याच संयमाने त्याने अपयशही पचविले. कुणी चांगला म्हटल्याने तो चांगला किंवा वाईट म्हटल्याने वाईटही ठरला नाही. म्हणूनच अलीकडे कांगारू फलंदाजांनी एका सर्वेक्षणात आपल्या आवडीच्या श्रेष्ठ फलंदाजामध्ये सचिनच्या नावाला नापसंती दर्शविल्यानेही त्याला काहीच फरक पडला नाही.
    अलीकडेच आलेल्या 'आयपीएल' सामन्यांच्या प्रकारांमुळे क्रिकेटपटूना कमी श्रमात लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग सापडला आहे, त्यामुळे अनेकांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त्याही स्वीकारल्या. पण सचिन यातला नाही. जिकडे भाऊगर्दी आहे तिकडे धावत सुटण्यापेक्षा, आहे त्यात समाधानी रहाणेच त्याने पसंत केले. कारण पैशासाठी क्रिकेट खेळणाऱ्यातला सचिन मुळीच नाही. 'टी-२०'त सचिन फिट बसत नाही, अशी टीका करणाऱ्यांनाही त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून 'आयपीएल'च्या दुसऱ्या सत्रात चांगलेच प्रत्तुत्तर दिले. 'टी-२०' क्रिकेट म्हणजे नाष्टा आहे तर कसोटी म्हणजे आहार आहे, असे सांगून त्याने कसोटीचे महत्वही विषद केले. आहाराशिवाय जगणे अशक्य असल्याचे सांगून त्याने आपण जोर्यंत आवड आहे तोपर्यंत खेळतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
    'मंजिले और भी हैं..' म्हणणाऱ्या सचिनचा कसोटीत १५ हजार धावा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावो, तसेच त्याच्या कारकिर्दीत भारताला विश्वचषकाचा गवसणी घालता येवो, हीच सदिच्छा...!
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या