पंचपरमेश्वराची 'एक्झिट'


    शेफर्ड यांचा वारसा चालविणारे पंच तयार होणे हि क्रिकेटची गरज आहे. नाहीतर या 'पंचपरमेश्वरा'ने जशी 'एक्झिट' घेतली, तसे पंचही मैदानावरून बाद झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आगळेवेगळे व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणार्या चाहत्यांचा हार्दिक जिव्हाळा कमावणारे शेफर्ड यांनी जगातून जरी 'एक्झिट' घेतली असली तरी क्रिकेटप्रेमींच्या मनातील त्यांचे स्थान ध्रुवताऱ्यासारखे 'अढळ' आहे.

 नागपुरातील दुस-या एकदिवसीय सामन्यात कर्णधार 'माही'च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कांगारू गोलंदाजांवर तुटून पडलेला... विरू, गौतम गंभीर, रैना आक्रमकतेने वडोदऱ्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचा वचपा काढीत होते... अन अशातच ती बातमी येऊन थडकली... प्रसिध्द क्रिकेट पंच डेव्हिड शेफर्ड यांचे कर्करोगाने निधन. अन सामन्यातून लक्षच उडाले.
   दूरदर्शनचा जमाना आल्यानंतर पंचांना परमेश्वर मानण्याचा काळ संपला. पण अशातही कसल्या कृतज्ञतेची अपेक्षा न बाळगता दोन दशकांहूनही अधिक काळ पंच म्हणून जबाबदारी सांभाळत अनेक क्रिकेटरसिकांच्या मनात शेफर्ड यांनी अढळ स्थान मिळविले. भरदार शरीरयष्टीच्या शेफर्ड यांनी १९८३ ते २००५ या एका तपाच्या कारकिर्दीत ९२ कसोट्या अन १७२ एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून काम पहिले. याशिवाय तब्बल १४ वर्षे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ग्लूस्टरशायरचे प्रतिनिधित्वही केले.
    त्यांच्या कारकिर्दीतल्या आकडेवारीपेक्षा इतर शैलींमुळेच ते चाहत्यांच्या मनात घर करून बसले आहेत. नेहमी हसतमुख चेहरा असलेल्या जाडजूड शरीरयष्टीच्या शेफर्ड यांची 'टुणूक उडी' भलतीच लोकप्रिय झाली होती. 'नेल्सन' म्हणजे १११, २२२, ३३३, या पटीतील धावसंख्या धावफलकावर झळकली कि त्यांनी 'टुणूक उडी' मारलीच म्हणून समजा. हा क्षण टिपण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांचे कमेरे आणि प्रेक्षकांच्या नजरांचा रोख त्यांच्या दिशेने वळायचा. त्यांच्या मैदानावरच्या विविध लकबी क्रीडारसिकांना खूप आवडायच्या. मधूनच एका पायावर उभे राहणेही असेच. मैदानावर असताना गैरवर्तनाबद्दल त्यांनी कोणाला तंबी दिल्याचे आठवत नाही. पण पंचगिरीवरच्या त्यांच्या अढळ निष्ठेमुळे म्हणा किंवा क्रिकेटच्या सखोल ज्ञानामुळे क्रिकेटपटूवर त्यांचा चांगलाच दरारा होता.
    'मी कधीही अयोग्य निर्णय दिलेले नाहीत' असे सतत ठणकावून सांगणाऱ्या शेफर्ड यांच्याकडून एकदा मात्र चूक झाली. २००१ मध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानच्या कसोटी सामन्यात त्यांना सकलेन मुश्ताकच्या एकाच षटकातील तीन खराब चेंडू ओळखता आले नाहीत. यातल्या दोन चेंडूवर सकलेनने दोन गाडी बाद केल्याने पाकिस्तानला त्याचा फायदा झाला. सामना संपल्यानंतर आपले चुकले हे शेफर्ड यांच्या लक्षात आले. रामशाश्री प्रभूणेंचा बाणा दाखवत त्यांनी मोठेपणाने आपली चूक तर काबुल केलीच पण प्रायचित्त म्हणून थेट निवृत्तीही जाहीर केली होती. परंतु खेळाडूंनी अन अधिकार्यांनी विनंती केल्याने नंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. खिलाडूवृत्तीचा हा एकच नमुना नव्हता, अशा अनेक घटनांमुळे ते क्रिकेटपटूनच्या आदरास पत्र ठरले.
     तणावात राहून पंचगिरी करण्यापेक्षा ती एक कला म्हणून विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळेच तंत्रज्ञानपूर्वीच्या काळातील त्यांची कारकीर्द खर्या अर्थाने गाजली. त्यांच्यावरील आयसीसीच्या भरवशामुळेच १९९६, १९९९ आणि २००३ अशा सलग तीन विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंच म्हणून काम पाहण्याची संधी त्यांना मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निपक्षपाती समितीचे पहिले पंच म्हणून 'ब्रिटीश एम्पायर ऑर्डर'चा बहुमानही त्यांना मिळाला. कारकीर्दीच्या अखेरच्या कसोटीत विक्रमवीर ब्रायन लाराकडून बातची खास भेटही त्यांना मिळाली.
    क्रिकेट पंढरीतला सच्चा वारकरी म्हणून ओळखल्या जाणार्या मास्टर ब्लास्टर सचिननेही अलीकडेच पंचांवर अधिकाधिक विसंबून राहण्यापेक्षा तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त भर द्यावा, असे मत व्यक्त केले आहे. काळाप्रमाणे असे होईलही कदाचित पण आजकाल सगळ्याच खेळात भरमसाठ पैसा ओतला जात असताना पंचांवरचा दबाव वाढत आहे. त्यामुळे शेफर्ड यांचा वारसा चालविणारे पंच तयार होणे हि क्रिकेटची गरज आहे. नाहीतर या 'पंचपरमेश्वरा'ने जशी 'एक्झिट' घेतली, तसे पंचही मैदानावरून बाद झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आगळेवेगळे व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणार्या चाहत्यांचा हार्दिक जिव्हाळा कमावणारे शेफर्ड यांनी जगातून जरी 'एक्झिट' घेतली असली तरी क्रिकेटप्रेमींच्या मनातील त्यांचे स्थान ध्रुवताऱ्यासारखे 'अढळ' आहे.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या