आश्चर्यम: शनि शिंगणापुरात चोरी..!


  दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आज (२५ ऑक्टोबर) दुपारी नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापुर येथे घडली. 'चोरी न होणारे गाव' अशी जागतिक कीर्ती असलेल्या शनी शिंगणापुरात हि घटना घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे...!


शनिदेवाच्या महिम्यामुळे शानिशिंगणापुरात चोरी होत नाही. अन चुकून झालीच तर त्या चोराला गावाबाहेर जायचा रस्ताच सापडत नाही. तो गावातच घुटमळत राहतो, अन सरतेशेवटी पकडला जातो, अशी या गावातील-परिसरातील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथील घरांना दरवाजे नाहीत. कपाटाला कुलुपे नाहीत. शनिशिंगणापुरची ही 'ख्याती' जगातील एक आश्चर्याची गोष्ट समजली जाते. त्यामुळेच 'शनिदेवाच्या दर्शना'सोबत या गावातील 'दरवाजा नसलेली घरे' पाहण्याची उत्सुकता देश-विदेशातून येणा-या भाविकांमध्ये असते. मात्र 'शनिशिंगणापुरत चोरी होत नाही' या विश्वासाला आजच्या घटनेमुळे तडा गेल्याची चर्चा परिसरात दिवसभर होती.
याबाबत अधिक माहिती अशी, हरियाना राज्यातील गुडगाव जिल्ह्यातल्या बिसवा येथील काही व्यापारी युवक दर्शनासाठी शिर्डीला आले होते. रविवारी रात्री त्यांनी साईसमाधीचे दर्शन घेऊन शिर्डीतच मुक्काम केला. यावेळी त्यांची एका युवकासोबत तोंडओळख झाली. सोमवारी सकाळी हे चौघे युवक दर्शनासाठी शनिशिंगणापुरला निघाले. त्यांची तोंडओळख झालेला युवकही त्यांच्यासोबत शनिशिंगणापुरला निघाला.
महिंद्रा म्याक्स (क्र. एम एच १७ टी ६५०५) या वाहनाने सर्वजण दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शनि शिंगणापुरात आले. येथील हॉटेल वैष्णवी समोरच्या बानकर पार्किंगमध्ये त्यांनी वाहन पार्किंग केले. सर्वजण कपडे जीपमध्येच काढून आंघोळीला गेले. यावेळी त्यांच्यासोबत आलेला 'तो' तरुणही सोबत होता. मात्र त्याने आंघोळ केली नाही. आंघोळ करून हे सर्वजण शनिदेवाच्या दर्शनासाठी गेले. मात्र 'तो' तरुण पुन्हा गाडीजवळ आला. जीपचालक यावेळी गाडीतच बसून होता. पण सर्वजण सोबत असल्यामुळे त्यालाही काही शंका आली नाही.
     'हा' तरुण गाडीत असल्याचे पाहून चालक बिनधास्तपणे चहा प्यायला निघून गेला. अन हीच संधी साधून 'त्या' भामट्या तरुणाने 'हात कि सफाई' दाखविली. हरियाणाहून आलेल्या भाविकांनी काढून ठेवलेल्या कपड्यांची आणि सामानाची त्याने उचकापाचक केली. त्यांच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल, डिजिटल क्यामेरा, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, प्यान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असा एकूण सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन त्याने पोबारा केला.
थोड्या वेळाने दर्शनाहून परतलेल्या भाविकांच्या हि बाब लक्ष्यात आली. मात्र चोरी कोणी केली असा प्रश्न त्यांना पडला. चालकाकडे विचारणा केली असता त्याने तुमचा 'तो' मित्र येथे आला होता, असे सांगितले. तो गाडीत बसलेला असल्यामुळेच आपण बिनधास्तपणे चहा प्यायला गेलो, असेही तो म्हणाला. बराच वेळ वाट पाहूनही 'तो' तरुण परत न आल्याने त्यानेच आपल्याला ठकविल्याची या भाविकांची खात्री झाली.
भांबावलेल्या त्या भाविकांना कोणीतरी पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला. मग त्यांनी सोनई पोलीस स्टेशन गाठून झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनाही सुरुवातीला या घटनेचे आश्चर्य वाटले. मात्र विचारपूस केल्यानंतर खरोखरच 'चोरी' झाल्याची त्यांचीही खात्री झाली. मग त्यांनी रीतसर तक्रारही लिहून घेतली. याबाबत मंजुल सहरावत श्रीसत्यभान सहरावत (वय २४, रा. बिसवा, हरियाना) या भाविकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. हेड कॉन्स्टेबल नागरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. शनिशिंगणापूर व परिसरात मात्र या घटनेची दिवसभर चर्चा सुरु होती.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या